नव्या नोटांचा साठा तयार होता : उर्जित पटेल

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

नोटाबंदीच्या निर्णयानंतर 17 हजार 165 पाचशेच्या नोटा, तर 6 हजार 858 एक हजार रुपयांच्या नोटा अशा केवळ 15.44 कोटी रुपयांच्या नोटा व्यवहारात आणण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेकडे उपलब्ध होत्या.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीच्या निर्णयाची घोषणा करण्याआधी नव्या पाचशे व दोन हजार रुपयांच्या नोटांचा साठा तयार ठेवला होता, अशी माहिती रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी संसदेच्या वित्त व्यवहारसंबंधी स्थायी समितीसमोर दिली. मात्र, गोपनीयतेच्या कारणास्तव रिझर्व्ह बॅंक आणि केंद्र सरकार यांच्यामधील नोटाबंदीसंदर्भातील चर्चेच्या कोणत्याही नोंदी ठेवण्यात आल्या नसल्याचे पटेल यांनी या वेळी सांगितले. 

नोटाबंदीसंदर्भातील "गोपनीयता' लक्षात घेता जनतेला कमीत कमी असुविधा होतील याचा रिझर्व्ह बॅंकेने पुरेपूर प्रयत्न केला. याचसोबत चलनातून रद्द केलेल्या नोटांवरही प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या आल्याचे या वेळी पटेल यांनी सांगितले. मात्र, काही तांत्रिक मुद्यांवर विशेषत: नोटांची मुद्रण क्षमता, बॅंक नोटांचा कागद, शाई, साधनांची उपलब्धता किंवा अपेक्षित पुरवठा, तसेच इतर आवश्‍यक साधनांच्या आवश्‍यकतांविषयी केंद्र सरकारशी टप्प्याटप्प्याने बोलणे सुरू होते. यासंबंधी माहितीचे आदानप्रदान करण्यात आले असल्याचे पटेल यांनी आपल्या लेखी निवेदनात म्हटले आहे. 

नोटाबंदीच्या निर्णयानंतर 17 हजार 165 पाचशेच्या नोटा, तर 6 हजार 858 एक हजार रुपयांच्या नोटा अशा केवळ 15.44 कोटी रुपयांच्या नोटा व्यवहारात आणण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेकडे उपलब्ध होत्या. दरम्यान, नोटाबंदीच्या निर्णयासंबंधीची चर्चा 2016 पासून सुरू असून, रिझर्व्ह बॅंकेचे तत्कालीन गव्हर्नर रघुराम राजन यांनी केंद्र सरकारकडे यासंबंधी केंद्रीय बॅंकेचे म्हणने मांडले होते, असेही पटेल यांनी या वेळी सांगितले. मात्र, राजन आणि केंद्र सरकारमधील चर्चांचा कोणताही दस्तावेज उपलब्ध नसल्याचेही पटेल यांनी या वेळी स्पष्ट केले.