टाटा स्टील ब्रिटन प्रकल्पात एक अब्ज पौंड गुंतवणार

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

लंडन: टाटा स्टीलने ब्रिटन प्रकल्पांमधील हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या वाचविण्यासाठी तोट्यातील पोर्ट टालबोट प्रकल्पात एक अब्ज पौंडाची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. आठ महिन्यांपुर्वी कंपनीने आपला ब्रिटनमधील व्यवसाय विक्रीची घोषणा केल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांचे भविष्य धोक्यात आले होते. परंतु आता कंपनीने जबरदस्तीने कर्मचाऱ्यांना काढून टाकणार नसल्याचेही सांगितले आहे.

कंपनी आता पुढील पाच वर्षांकरिता पोर्ट टालबोटमधील दोन ब्लास्ट फरनेसचे काम सुरु ठेवणार आहे. याच प्रकल्पात स्टील उत्पादनाला साह्य करण्यासाठी पुढील दहा वर्षांमध्ये एक अब्ज पौंड गुंतवणूक केली जाणार आहे. त्याचप्रमाणे, कंपनीने ब्रिटीश निवृत्तीवेतन योजना बंद करुन नवी योजना आणण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. नव्या योजनेअंतर्गत कंपनीचे 10 टक्के तर कर्मचाऱ्यांचे 6 टक्के योगदान असणार आहे.

"आम्ही ब्रिटन व्यवसायाच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्नशील आहोत आणि कामगार संघटनांशी चर्चा करताना या दिशेने प्रयत्न करण्याचे आम्ही वचन दिले आहे", असे टाटा स्टीलने सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

वर्षाच्या सुरुवातीला टाटा स्टीलने ब्रिटनमधील सर्व प्रकल्पांची विक्री करण्याची घोषणा केली होती. परंतु जुलैमध्ये ही प्रक्रिया रखडली होती. परंतु गेल्या महिन्यात कंपनीने लिबर्टी हाऊसला लेटर ऑफ इंटेन्ट देऊन पुन्हा एकदा विक्री प्रक्रियेला वेग दिला.