टीसीएस बनणार भारताची पहिली 100 बिलियन डॉलर कंपनी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

भारताला लवकरच पहिली 100 बिलियन डॉलर कंपनी मिऴणार आहे. आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टीसीएस ही आता पहिली 100 बिलियन डॉलर भारतीय कंपनी होणार आहे. 

मुंबई : भारताला लवकरच पहिली 100 बिलियन डॉलर कंपनी मिऴणार आहे. आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टीसीएस ही आता पहिली 100 बिलियन डॉलर भारतीय कंपनी होणार आहे. 

टीसीएसची झेप
टीसीएस अर्थातच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीचं भागभांडवल लवकरच 100 बिलियन डॉलरवर पोचण्याची शक्यता आहे. कंपनीचे  आजचे बाजारमूल्य सुमारे 634,155.62 कोटी रुपये आहे. टीसीएसही पहिली भारतीय कंपनी आता 100 बिलियन डॉलरच्या पंक्तीत येणार आहे. टीसीएसच्या शेअरच्या किंमतीत 6.7 टक्क्यांची वाढ झाली आहे. एप्रिल 2012 नंतरची ती सर्वात मोठी वाढ आहे. टीसीएसच्या एका शेअरने आज 3421 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे. टीसीएसने चौथ्या तिमाई निकालांची घोषणा केली त्यानंतर कंपनीच्या शेअरच्या किंमतीत वाढ झाली. 

लवकरच बनणार 100 बिलियन डॉलर्सची कंपनी
त्यातच टाटा समूहाच्या अत्यंत महत्वाच्या टीसीएसने एकास एक बोनस देण्याची घोषणा केली त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये यात गुंतवणूक करण्याचा उत्साह दिसून आला. सद्यस्थितीत टीसीएसचे बाजारमूल्य जवळपास 99 बिलियन डॉलर्सच्या आसपास पोचले आहे. कंपनीच्या एका शेअरची किंमत जेव्हा 3,447 रुपये होईल तेव्हा कंपनीचे एकूण बाजारमूल्य 100 बिलियन डॉलर्स होईल. एका डॉलरचे मूल्य 66.05 रुपये गृहीत धरून ही किंमत काढण्यात आली आहे. 

उज्ज्वल भवितव्य
गेल्या आठवड्यात इन्फोसिसच्या तिमाही निकालांनी गुतंवणूकदार निराश झाले होते. त्याउलट टीसीएसच्या चांगल्या तिमाही निकालांमुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह दिसून आला. बहुतांश जाणकारांच्या मते येत्या आर्थिक वर्षातसुद्धा टीसीएसची कामगिरी उत्तम असणार असून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळेल. 

दिमाखदार प्रवास
टीसीएसच्या आजवरच्या प्रवासाकडे एक नजर

2004 - कंपनीने आयपीयो बाजारात आणला, 850 रुपये प्रति शेअर

2005 - कंपनीचे बाजारमूल्य 10 बिलियन डॉलर झाले

2010 - 25 बिलियन डॉलरपर्यत पोचण्यास कंपनीला चार वर्षं लागली

2013-  कंपनीचे बाजारमूल्य 50 बिलियन डॉलर झाले

2014 - वर्षभरातच 25 बिलियन डॉलरची भर घालत कंपनीचे बाजारमूल्य 75 बिलियन डॉलरवर पोचले.

2018 - घवघवीत नफ्यासह टीसीएस 100 बिलियन डॉलरच्या जवळ पोचली आहे. 

Web Title: TCS Set To Become India’s First $100 Billion Market Cap Company