'डाटा'गिरी ग्राहकांच्याच फायद्याची! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 मार्च 2017

प्रमुख दूरसंचार कंपन्यांचे ग्राहक 
एकूण ग्राहक  : ११५ कोटी
एअरटेल : २६ कोटी ४४ लाख
व्होडाफोन : २० कोटी १५ लाख
आयडिया: १९ कोटी २४ लाख
जियो : १० कोटी ७ लाख
बीएसएनएल: ९ कोटी ५६ लाख
डोकोमो: ५ कोटी ४० लाख

दिवस होता १ सप्टेंबर २०१६ चा. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत रिलायन्स जिओचे व्यावसायिक कामकाज सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आणि दूरसंचार क्षेत्रात एकच खळबळ उडाली. त्याआधी पाच-सहा वर्षांपूर्वी चर्चेत आलेल्या स्पेक्‍ट्रम घोटाळ्याला मागे टाकून दूरसंचार क्षेत्राने चांगली प्रगती केली होती आणि आपली प्रतिमा उजळवण्यात ते यशस्वी झाले होते. प्रत्येक क्षेत्रात दूरसंचारचा वाढता प्रभाव दिसत होता. माहितीसाठ्याचा (डाटा) वापरही वाढत होता. त्याचबरोबर टेलिकॉम कंपन्यादेखील आर्थिकदृष्ट्या चांगली प्रगती करत होत्या.

‘फुकट’ची सवय लावली!
मात्र, भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी यांनी आपल्या कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केलेल्या भाषणामुळे सर्व चित्रच बदलून गेले. या भाषणात ते म्हणाले की, डिजिटल इंडियाचे स्वप्न पूर्ण करण्याचे जिओचे उद्दिष्ट आहे. यापुढील आयुष्य हे डिजिटल असणार आहे आणि आपण वेगाने डिजिटल झालो नाही, तर जगाच्या मागे राहू. भारताला जगाच्या मागे राहणे परवडणार नाही. डाटा हा डिजिटल आयुष्याचा प्राणवायू आहे आणि जिओ व्यवसायापेक्षा काहीतरी अधिक आहे. जिओ म्हणजे प्रत्येक भारतीयाचे आयुष्य समृद्ध करण्याची कटिबद्धता आहे. डाटाची मागणी वाढत असताना डाटाची टंचाई दूर करून तो भरपूर प्रमाणात उपलब्ध करून देण्याचे आमचे ध्येय आहे. हे सांगत जिओची सेवा सुरू झाली आणि भारतातील दूरसंचार विश्‍व बदलले. 

‘डाटा’ची भूक वाढली
या घडामोडीमुळे दूरसंचार क्षेत्रातील अनेक कंपन्यांची तारांबळ उडाली. कारण जिओने आपली सेवा वर्षअखेरपर्यंत मोफत देण्याची घोषणा केली. मग काय! फुकट म्हटले की लोक त्यावर तुटून पडतात अन्‌ तसेच घडले. अवघ्या पाच-सहा महिन्यांत जिओने दहा कोटींहून ग्राहक जोडले. सर्वसामान्य भारतीय ग्राहकांना जेवढी व्हॉइस सेवांची गरज असते, तेवढीच डाटा सेवांचीही गरज असते. फेसबुक, व्हॉट्‌सॲप, ट्विटर, बातम्यांचे, गेम्स, ई-मेल हे प्रत्येक वापरकर्त्याच्या जीवनातील अविभाज्य भाग बनले आहेत. आजवर डाटा पॅकेजेसमुळे लोक हे सर्व काळजीपूर्वक वापरायचे, परंतु ‘जिओ’ने तेच पॅकेज फुकट दिल्यावर लोकांच्या डाटा वापराबाबतच्या सुप्त आकांक्षा एकदम बाहेर पडल्या. ग्राहकांनी विशेष करून व्यावसायिकांनी आपली आधीची सिमकार्ड वापरणे बंद केली नाहीत, कारण नंबर बदलणे त्यांना परवडणारे नव्हते. मात्र, ड्युएल सिमच्या युगात डाटासाठी व आउटगोईंग कॉलसाठी त्यांनी रिलायन्स जिओचा वापर सुरू केला. यामुळे स्वाभाविकच इतर दूरसंचार कंपन्यांच्या उत्पन्नावर परिणाम झाला.

प्राइस वॉर टिपेला...
व्होडाफोन, आयडिया, एअरटेल या बड्या कंपन्यांबरोबरच टेलिनॉर, एअरसेल, टाटा टेलिसर्व्हिसेस व अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स यांच्या उत्पन्नावर थेट परिणाम दिसून आला आणि मग जोरदार हालचाली सुरू झाल्या. व्होडाफोन आणि आयडिया या दोन बड्या कंपन्यांच्या विलीनीकरणाच्या बातम्या येऊ लागल्या व त्याची पुष्टीही दोन्ही कंपन्यांनी दिली. याच्यात विलीनीकरणासाठी नियामक अडथळे असले, तरी या जिओ त्सुनामीमुळे हे करण्यावाचून गत्यंतर नाही. व्होडाफोन आणि आयडिया एकत्र आल्यास भारतातील सर्वांत मोठी टेलिकॉम कंपनी होईल. त्याचबरोबर एअरटेलने टेलिनॉरचा ताबा घेऊन ग्राहक जोडले आणि आपले स्थान भक्कम करण्याचा प्रयत्न केला. अनिल अंबानींची रिलायन्स इन्फोकॉमदेखील एअरसेल, एमटीएस व टाटा टेलिसर्व्हिसेसशी हातमिळवणी करून तिसऱ्या स्थानावर येऊ पाहात आहे. काहीही असले, तरी रिलायन्स जिओच्या या ‘डाटागिरी’ने या क्षेत्रातील सर्वच परिमाण बदलून टाकले आहे व सर्व कंपन्यांना चांगलाच धक्का दिला आहे. यापुढील वाटचाल ‘शेपअप ऑर बी शिफ्ट आउट’ अशी असणार आहे. याचाच अर्थ ग्राहकांच्या गरजांनुसार आपल्या डाटा पॅकेजेसना आकार द्या, नाहीतर बाहेर फेकले जाल, हाच अलिखित नियम आता सर्व कंपन्यांना लागू होईल आणि ते दिसूनही येत आहे. एअरटेलने नुकतेच रोमिंग फ्रीची घोषणा केली असून, आकर्षक डाटा प्लॅन्सदेखील देऊ केले आहेत, तसेच व्होडाफोननेदेखील प्रिपेड व पोस्टपेड प्लॅनसाठी चांगलीच तयारी केली आहे. एअरटेलने जवळपास जिओच्याच किमतीत रोज एक जीबी डाटा देण्याचा प्लॅन शुक्रवारीच (ता. ३) जाहीर केला आहे. रिलायन्स जिओची मोफत सेवा ३१ मार्च २०१७ ला संपत असून, यामुळे आता इतर कंपन्यांना आशेचा किरण दिसत आहे. यापुढील लढाई टेरिफ प्लॅन व नेटवर्कच्या गुणवत्तेवर असून, पुढील सहा महिने हे सर्वांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. या सर्व गोष्टींमध्ये जमेची बाजू म्हणजे ग्राहक केंद्रस्थानी आला आहे.

पायाभूत सुविधाही महत्त्वाच्या
अर्थात हे सगळं होत असताना कॉल ड्रॉप्स, नेटवर्क कव्हरेज हे सर्व मुद्दे उपस्थित झालेच, पण या अडचणी ग्राहकांनी सर्वच सेवा पुरवठादारांबरोबर अनुभवल्या आहेत. आपल्या पायाभूत सुविधा व नेटवर्क कव्हरेज अधिक भक्कम करण्यासाठी रिलायन्स जिओने ३० हजार कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक करत आपली एकूण गुंतवणूक या क्षेत्रामध्ये २ लाख कोटींच्या वर नेली आहे. आपला प्रभाव भारताच्या कानाकोपऱ्यात नेण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. कंपनीने आधारकार्डवर आधारित सीम ॲक्‍टिव्हेशन याआधीच कार्यान्वित केले आहे, तसेच जिओ प्लॅटफॉर्मवर नवउद्योजकांना चालना देण्यासाठी तब्बल ५ हजार कोटी रुपयांचा स्टार्ट अप फंड ठेवला आहे. त्याचबरोबर सणासुदीच्या काळात टेरिफवर कुठलेही अतिरिक्त शुल्क जिओ आकारणार नाही, असेही सांगण्यात येते. तसेच १ एप्रिल २०१७ पासून जिओने आपल्या प्राइम ग्राहकांना ३०३ रुपयांचा मासिक टेरिफ प्लॅन देऊ केला आहे. यामध्ये ग्राहक अमर्यादित व्हाइस कॉल व एक जीबी डाटा दररोज वापरू शकतात. त्यासाठी त्यांना प्राइम ग्राहक होण्यासाठी  ९९ रुपये भरावयाचे आहेत. रिलायन्स जिओ येण्याआधी इतर कंपन्या महिनाभरात एक जीबी डाटासाठी साधारण ३५० रुपये शुल्क आकारायचे. यावरूनच लक्षात येईल की, यापुढे काय बदल घडणार आहेत.

दिवस ‘बंडल्ड प्राइसिंग’चे...
कंपन्यांकडून दिला जाणारा ‘बंडल्ड प्राइसिंग’ हा प्रकार ग्राहकांना यापुढे लक्षात घ्यावा लागेल. बंडल्ड प्राइसिंग म्हणजे सर्व सेवा एकत्रितपणे कमी किंवा सवलतीच्या शुल्कात आकारणे. दूरसंचार क्षेत्रासंबंधी बोलायचे झाल्यास बंडल्ड प्राइसिंगमध्ये डाटा, व्हॉइस आणि एसएमएस या तीन प्रमुख सेवा एकत्रितरीत्या टेरिफमध्ये मर्यादित किंवा अमर्यादित स्वरूपामध्ये येतील आणि याच्याचभोवती बहुतेक दूरसंचार कंपन्यांमध्ये चुरशीची स्पर्धा होईल. याचबरोबर ग्राहकांना काही इन्सेंटिव्हही (प्रोत्साहनपर सवलती) दिले जाऊ शकतात. हे सर्व बघत असताना विश्‍लेषक म्हणून एक निरीक्षण महत्त्वाचे ठरते की, जिओमुळे ज्या ग्राहकांनी टूजी सोडून फोरजीवर उडी मारली त्यांना ३०० रुपयांहून अधिक टेरिफ प्लॅन्स परवडतील का? की ते परत आपल्या मूळ टूजी सेवा पुरवठादारांकडे जातील? की थ्रीजीकडे जातील? टेलिकॉम क्षेत्रात ऑटोमेशन वाढत असल्यामुळे नजीकच्या काळात २० ते ३० टक्के रोजगार कपात होऊ शकते, परंतु दीर्घकाळात अनेक नवीन संधी उपलब्ध होतील व असंख्य लोकांना कौशल्यावर आधारित रोजगार मिळू शकेल. प्रत्येकाकडे स्मार्टफोन व डाटा प्लॅन कमी किमतीत उपलब्ध झाल्यास याचा परिणाम ग्रामीण व शहरी भागातील दरी कमी करण्यात होऊ शकेल. रिलायन्स जिओने जरी अन्य कंपन्यांची तारांबळ उडवली असली तरी त्या सर्व दिग्गज कंपन्या आपल्या व्यूहात्मक कौशल्यामुळे टिकून राहतील व ग्राहकांसाठी सोईस्कर व किफायती ठरतील, अशा अनेक योजना आणतील.

भविष्य अधिकच रंजक!
दूरसंचार क्षेत्राचे भविष्य अधिकच रंजक आहे. फेसबुक बेसिक्‍स हे भारतात अयशस्वी ठरल्यानंतर गुगलही आपला प्रोजेक्‍ट लून विकसनशील देशांत आणण्याचा प्रयत्न करीत आहे. यामध्ये जिथे नेटवर्क चांगले नाही, तिथे प्रोजेक्‍ट लूनच्या बलून्समुळे इंटरनेट कनेक्‍टिव्हिटीचा अधिक विस्तार होईल. हे प्रत्यक्षात किती यशस्वी होईल माहीत नाही, परंतु असे अनेक हायटेक उपक्रम आपल्याला पाहायला मिळतील आणि शेवटी याचा फायदा ग्राहकांनाच होईल. फोरजी टेलिकॉमचे भविष्य म्हणजे वॉईस ओव्हर तंत्रज्ञानाने सर्व कॉल्स हे सेल्युलर कॉल्सवरून डाटा कॉल्सवर स्थलांतरित होतील. त्यामुळे व्हॉटसॲप कॉल, स्काईप कॉलिंग, व्हिडिओ कॉलिंगसारखे अनेक नवीन प्रकार उदयास येतील.

प्रमुख दूरसंचार कंपन्यांचे ग्राहक 
एकूण ग्राहक  : ११५ कोटी
एअरटेल : २६ कोटी ४४ लाख
व्होडाफोन : २० कोटी १५ लाख
आयडिया: १९ कोटी २४ लाख
जियो : १० कोटी ७ लाख
बीएसएनएल: ९ कोटी ५६ लाख
डोकोमो: ५ कोटी ४० लाख

रिलायन्स जिओच्या ‘डाटा’गिरीने दूरसंचार क्षेत्रातील सारेच परिमाण बदलून टाकले आहेत. यापुढील काळात ग्राहकांच्या गरजेनुसार आपल्या डाटा पॅकेजेसना आकार द्या, नाहीतर बाहेर फेकले जाल, हाच अलिखित नियम सर्वच कंपन्यांना लागू होईल. या सर्व गोष्टींमध्ये जमेची बाजू म्हणजे ग्राहक केंद्रस्थानी आला आहे.
- डॉ. मिलिंद पांडे, प्रकल्प संचालक, 
एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ टेलिकॉम

भारतातील एकूण 
मोबाईल टॉवर - चार लाख
स्मार्ट फोनवर दिवसभरात घालवला जाणारा सरासरी वेळ - तीन तास
स्मार्ट फोन युजर्सचा २०२१पर्यंत अपेक्षित सरासरी मासिक डाटा वापर - ७ जीबी

'प्राइस वॉर'वर तरुणाई खुश!
देशात जिओमुळे टेलिकॉम कंपन्यांमधील प्राइस वॉर सुरू झाले व याचा सर्वाधिक उपयोग तरुणाईला होतो आहे. सतत ऑनलाइन असणारी, सर्वाधिक डाटाची गरज असलेली ही पिढी दिवसाला एक जीबीपर्यंतचा डाटा देणाऱ्या प्लॅन्समुळे खूष आहे. त्यांच्या या निवडक प्रतिक्रिया...

मोफत सेवा पथ्यावर!
रिलायन्सने मोफत ‘जिओ ४ जी’ सेवा लाँच केल्यानंतर अन्य ग्राहकांच्या तुलनेत कॉलेजगोईंग तरुणांचा उल्लेखनीय प्रतिसाद मिळाला. कॉलेजमधील आवश्‍यक प्रोजेक्‍ट, एखाद्या विषयाची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी; तसेच अवघड शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी इंटरनेट सेवा गरजेचीच वाटत होती. अनेकदा पॉकेटमनीमधून पैसे वाचवून इंटरनेट सेवा घेत होते. ‘जिओ’ने हा प्रश्‍न चुटकीसरशी सोडवला. मोफत सेवा मिळाल्याचा सकारात्मक उपयोग जास्त केला. यानिमित्ताने सुरू झालेले ‘प्राइस वॉर’देखील ग्राहकांच्या पथ्यावर पडणारे आहे. इतर कंपन्यांनीदेखील आपल्या सेवेचा दर कमी केल्यामुळे आम्ही खूष आहोत.
- सोनल पाटेकर  

इंटरनेटची सवय!
मोफत सेवा मिळणार असल्याने ‘जिओ’चे कार्ड खरेदी केले. सुरवातीच्या काळात इंटरनेटचा स्पीड उत्तम होता. मी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असल्याने या सेवेचा अभ्यासासाठी फायदाच झाला. मात्र, सध्या पूर्वीसारखी सेवा मिळत नसल्याचा अनुभव मी घेत आहे. कॉल करतानाही अनेक अडथळे येत आहेत. इंटरनेटची सवय लागल्याने आता खिशातले पैसे खर्च करून अन्य कंपन्यांचे कार्ड घेण्याशिवाय पर्याय नाही. यानिमित्ताने सुरू झालेल्या ‘प्राइस वॉर’चा नक्कीच लाभ होईल, असे वाटते.
- सुप्रिया सावंत  

भविष्यात डाटा चार्जच भरावा लागेल! 
‘जिओ’ने टेलिकॉम क्षेत्रात मोठा बदल घडवून आणला आहे. मोफत ‘४ जी’ इंटरनेटमुळे मोठा ग्राहक वर्ग ‘जिओ’कडे आकर्षित झाला. परिणामी, ग्राहकांना खूष करण्यासाठी इतर कंपन्यांनीही थोडेफार बदल करून ग्राहकांना स्वस्तात काही गोष्टी दिल्या आहेत. ग्राहक टिकविण्यासाठी सुरू झालेले टेलिकॉम कंपन्यांमधील ‘प्राइस वॉर’ सध्या तरी ग्राहकांच्या फायद्याचेच वाटते. जे इंटरनेट वापरत नाहीत त्यांच्यासाठीही कंपन्यांनी आकर्षक प्लॅन आणले आहेत. सध्या आपण डाटा आणि व्हाइस कॉलिंग या दोन्हींसाठी पैसे मोजतो. भविष्यात ग्राहकाला फक्त डाटा चार्जेस भरावे लागतील. 
 - मनोज जाधव    

सोयीनुसार कंपनी निवडणार!
सप्टेंबर महिन्यात ‘जिओ’ने मोफत सेवा सुरू केली, तेव्हाच ‘जिओ’चे कार्ड खरेदी केले. मी विद्यार्थी आहे. मला मोफत इंटरनेट सेवेचा खूप उपयोग झाला. विशेषतः मुलाखतीला जाताना उजळणी करण्यासाठी इंटरनेट उपयुक्त ठरले. सध्या ‘जिओ’ वापरत असलो, तरी भविष्यात ‘प्राइस वॉर’मुळे इतर कंपन्यांनी किमती कमी केल्यास सोयीनुसार कंपनी निवडण्याला प्राधान्य देणार आहे. 
- श्रेयस माने

 

'स्मार्ट फोन'च्या जमान्यात 'नोकिया 3310'ची एन्ट्री! 
माहिती-तंत्रज्ञान युगातील ‘स्मार्ट’ पिढीची गरज ओळखून मोबाईल कंपन्यांनी ‘स्मार्ट मोबाईल फोन’ची निर्मिती केली आणि अल्पावधीतच हा फोन अवघ्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत झाला! ‘स्मार्ट फोन’च्या या जमान्यात आणि ‘आयफोन ७’ची चर्चा असताना कोणे एके काळी नोकियाप्रेमींची धडकन असणारा ‘नोकिया ३३१०’ हा फोन नव्या रंगरूपात लवकरच पुनरागमन करणार असल्याची घोषणा झाली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. तब्बल १७ वर्षांनंतर पुन्हा तोच फोन आणण्याची गरजच काय, येथपासून या फोनचा ग्राहक कोण असेल, याच्या चर्चांना उधाण आले. दुसरीकडे, ५० ते ६० या वयोगटातील ग्राहक १७ वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या पहिल्या-वहिल्या मोबाईलच्या आठवणी जागवत नव्या रूपातील फोनला पाहण्यासाठी उत्सुक आहेत. हा मोबाईल कसा दिसेल, त्याचे डिझाईन पूर्वीप्रमाणेच असेल का, नवी फीचर्स काय असतील, असे असंख्य प्रश्न त्यांना पडले आहेत. अनेकांना सेकंडरी फोन म्हणून फीचर फोनची आवश्‍यकता असते. ‘नोकिया ३३१०’ हा दमदार बॅटरी बॅकअप असणारा फोन असल्यामुळे ‘स्मार्ट फोन युजर्स’ या फोनला सेकंडरी फोन म्हणून स्वीकारतील, या मतावर कंपनी ठाम आहे. 

फोनची वैशिष्ट्ये
    वॉर्म रेड, यलो, डार्क ब्लू आणि ग्रे या रंगात उपलब्ध.
    मोबाईलमधून बॅटरी वेगळी करता येणार.
    १६ जीबी बिल्ट-इन मेमरी, तसेच मेमरी ३२ जीबीपर्यंत वाढवता येणार.
    यूएसबी चार्जरची सोय. हेडफोन, ड्युअल सिम, एफएम रेडिओ.
    २ मेगापिक्‍सेल कॅमेरा आणि एलईडी फ्लॅशची सुविधा. 
    १२०० एमएएच क्षमतेची बॅटरी असल्याने २२ तासांचा टॉकटाइम आणि महिनाभराचा स्टॅन्ड बाय टाइम.
    ‘ब्ल्यू टूथ कनेक्‍टिव्हिटी’ आणि ‘एमपी थ्री प्लेअर’.
    २.४ इंच क्षमतेचा डिस्प्ले आणि २ जी कनेक्‍टिव्हिटी. 
    जुन्या मोबाईलपेक्षा वजनाने हलका.
    सर्वांच्या आवडत्या स्नेक गेमचा समावेश. मल्टिकलरमध्ये गेम उपलब्ध.
    या फोनची किंमत अजून जाहीर केलेली नसली, तरी अंदाजे ३,५०० ते ४,१५० रुपये किंमत असण्याची शक्‍यता आहे. 
    जुलै महिन्यापासून भारतीय बाजारात विक्रीसाठी दाखल.

Web Title: telecom companies offering various internet data offers