विजय मल्ल्यांचा बँकांसमोर तडजोडीचा प्रस्ताव

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 मार्च 2017

शेअर बाजार आणि आर्थिक घडामोडींची अधिक माहिती घेण्यासाठी आमच्या खास अर्थविषयक www.sakalmoney.com या संकेतस्थळाला भेट द्या.

मुंबई : देशातील बॅंकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेऊन फरारी झालेल्या उद्योगपती विजय मल्ल्यांनी कर्जफेडीसाठी बँकांसमोर तडजोडीचा प्रस्ताव ठेवला आहे. आपण बँकांसोबत कर्जफेडीसाठी वन-टाईम-सेटलमेंट करण्यात तयार आहोत असे मल्ल्यांनी नुकतेच ट्विटद्वारे सांगितले आहेत. याआधी स्टेट बँकेसमोर त्यांनी तडजोडीचा प्रस्ताव ठेवला होता

''सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या धोरणानुसार बँका कर्जदारांसमोर कर्जफेडीसाठी वन-टाईम-सेटलमेंट पर्याय ठेवतात. त्यातून शेकडो लोकांचे दावे निकाली काढले जातात. मग बँकांकडून आमचा प्रस्ताव का नाकारला जातो? असा सवाल मल्ल्या यांनी उपस्थित केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने देखील बँकांना सर्व प्रकरण मिटवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मी बँकांसोबत वाटाघाटी करण्यास तयार आहे, असेही ते म्हणाले.

फरार मल्ल्यांनी भारतातून पलायन करून लंडनमध्ये वास्तव्य केले होते. त्यांना परत आणण्यासाठी मंगळवारी ब्रिटनच्या पाचसदस्यीय प्रतिनिधी मंडळाने परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीदरम्यान नवी दिल्ली येथे चर्चा केली. त्यामध्ये ब्रिटन सरकारने फरारी मल्ल्या यांना भारताकडे सोपविण्याचे आश्‍वासन दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीमध्ये ब्रिटनच्या गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशिवाय भारताचे परराष्ट्र मंत्रालय अधिकारी, केंद्रीय अन्वेषणचे अधिकारी, गृह मंत्रालय आणि गुप्तचर विभागाचे अधिकारीही सहभागी झाले होते. या बैठकीमध्ये मल्ल्या यांच्या प्रत्यार्पणाशिवाय इतर मुद्‌द्‌यांवरही चर्चा झाली.