गृहकर्जाची मुदतपूर्व परतफेड करताय?

गृहकर्जाची मुदतपूर्व परतफेड करताय?

तुम्ही तुमच्या गृहकर्जाची मुदतपूर्व परतफेड करण्याचा विचार करीत आहात का? असं असेल तर कर्जमुक्त किंवा ‘ईएमआय’मुक्त होण्याच्या तुमच्या या निर्णयाबद्दल तुमचे अभिनंदन! पूर्वी अशी गृहकर्जाची मुदतपूर्व परतफेड करणे खर्चिक ठरायचे, कारण त्या वेळी बॅंका आणि गृहकर्ज देणाऱ्या संस्था त्यासाठी दंड घ्यायच्या आणि ती प्रक्रियादेखील खूप किचकट असायची. आता मात्र बहुतेक बॅंकांनी आणि संस्थांनी असा दंड घेणे बंद केल्याने आणि संबंधित प्रक्रिया खूप सुटसुटीत केल्याने गृहकर्जाची मुदतपूर्व परतफेड करणे सोपे झाले आहे. अर्थात या संदर्भातील अंतिम निर्णय घेण्यापूर्वी पुढील मुद्द्यांचा विचार करा.

१) कर्ज परतफेडीसाठी एकरकमी मोठी रक्कम वापरल्याने त्यानंतर आर्थिक समस्यांचा सामना तर करावा लागणार नाही ना, याचा तुम्ही विचार करायला हवा. कारण आपण साठवलेली रक्कम एकदम कमी झाल्याने दर महिन्याच्या खर्चांबरोबरच अचानक उद्‌भवणाऱ्या एखाद्या खर्चाची तरतूद करण्यासाठी आपल्याकडे पुरेशी रक्कम शिल्लक राहिली नाही तर काय होईल? याची खात्री नसल्यास कर्जाची पूर्ण परतफेड एकरकमी करण्याचा अट्टहास न धरता तुम्हाला शक्‍य असेल तेवढ्याच रकमेने कर्जाची परतफेड करणे सूज्ञपणाचे ठरेल. 

२) गृहकर्जाची परतफेड करण्यापूर्वी तुमच्यावर अधिक व्याजदराचे इतर कोणते कर्ज नाही ना, याची खात्री करा. वैयक्तिक कर्ज, मोटार कर्ज यांसारख्या कर्जांवरील व्याजाचा दर हा सहसा गृहकर्जावरील व्याजाच्या दरापेक्षा अधिक असतो. अशा वेळी त्या कर्जाची एकरकमी परतफेड करण्याला प्राधान्य द्या.

३) गृहकर्जाची मुदतपूर्व परतफेड केल्यानंतर तुमच्या बॅंक खात्यावर शिल्लक राहणारी ‘ईएमआय’ची रक्कम योग्य ठिकाणी गुंतविण्याचा निर्णय आधीच घ्या; अन्यथा कर्जफेड करण्याचा मूळ उद्देश बाजूला राहू शकतो. उदाहरणार्थ, जी रक्कम पूर्वी ‘ईएमआय’साठी  वापरली जायची ती आता हौसमौज करण्यासाठी वापरली जाऊ  लागली तर आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने ते चुकीचे ठरेल. अशा रकमेतून मंथली रिकरिंग डिपॉझिट, म्युच्युअल फंड एसआयपी यासारखी गुंतवणूक सुरू करा.

४) कर्जाची परतफेड करण्यासाठी आपण कोणती रक्कम वापरणार याचादेखील योग्य विचार करा. उदाहरणार्थ, निवृत्तीची तरतूद म्हणून सुरू केलेल्या पीपीएफ खात्यातील रक्कम कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरणे चुकीचे आहे. तसेच आयुर्विम्याची रक्कम कमी करून कमी झालेल्या विम्याच्या हप्त्याची रक्कम या कारणासाठी वापरणेदेखील चुकीचे आहे. त्याचबरोबर अधिक व्याजदर असलेले वैयक्तिक कर्ज ठेऊन गृहकर्जाची परतफेड करणेदेखील योग्य नव्हे. आपले नेहमीचे खर्च भागवून राहिलेल्या पैशातून; तसेच कमी फायदा देणाऱ्या गुंतवणुकीतूनच अशी परतफेड होणे अपेक्षित असते.

५) गृहकर्जांवरील व्याज आणि हप्ता या दोन्हींना प्राप्तिकरातून सवलत मिळते. गृहकर्जाची पूर्ण परतफेड केली तर ही सवलत आपल्याला मिळणे बंद होते म्हणून तुम्ही जर प्राप्तिकराच्या कक्षेत येत असाल, तर या बाबींचा तुलनात्मक आढावा घेऊनच निर्णय घ्या.

६) तुमच्याकडे काही रक्कम शिल्लक आहे म्हणून कर्जाची मुदतपूर्व परतफेड करणे टाळा. त्याऐवजी अशा रकमेतून अधिक फायदा देऊ शकणारी एखादी नवी गुंतवणूक सुरू करून ‘ॲसेट ॲलोकेशन’ म्हणजेच गुंतवणुकीचा समतोल साधता येईल का, याचा विचार करा.

थोडक्‍यात, आपला कर्जपरतफेडीचा निर्णय भावनिक नसून, आर्थिक आहे ना याची खात्री करा. लक्षात ठेवा, पैशाचे मूल्य काळाबरोबर कमी होत जाते; तसेच हळूहळू आपले उत्पन्नदेखील वाढत जाते. त्यामुळे आज खूप मोठा वाटणारा कर्जाचा हप्ता काही वर्षांनंतर अगदी छोटा वाटू लागतो. म्हणूनच केवळ ‘आपल्या डोक्‍यावर कोणतेही कर्ज नको’ आणि आपल्याकडे काही रक्कम शिल्लक आहे म्हणून गृहकर्जाची मुदतपूर्व परतफेड करणे टाळायला हवे. अर्थात या सर्व मुद्द्यांचा विचार करूनच तुम्ही गृहकर्जाची परतफेड करण्याचा निर्णय घेतला असेल, तर तुमचे पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन! 

कर्ज परतफेडीचा निर्णय भावनिक नसून, आर्थिक आहे ना हे तपासले पाहिजे. आज खूप मोठा वाटणारा कर्जाचा हप्ता काही वर्षांनंतर अगदी छोटा वाटू लागतो. म्हणूनच केवळ ‘आपल्या डोक्‍यावर कोणतेही कर्ज नको’ आणि आपल्याकडे काही रक्कम शिल्लक आहे म्हणून गृहकर्जाची मुदतपूर्व परतफेड करणे टाळायला हवे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com