'स्मॉल इज ब्यूटिफुल' 

डॉ. वीरेंद्र ताटके
बुधवार, 12 एप्रिल 2017

थोडी जोखीम स्वीकारून भविष्यातील संभाव्य फायदा पदरात पाडून घ्यायचा असेल, तर आपल्या एकूण गुंतवणुकीपैकी काही हिस्सा अशा फंडांमध्ये 'एसआयपी'द्वारे नियमितपणे गुंतवत राहावा. चांगल्या स्मॉल कॅप फंडामध्ये दीर्घकाळासाठी 'एसआयपी' केल्यास उत्तम फायदा मिळाल्याची उदाहरणे आहेत.

'स्मॉल इज ब्यूटिफुल' अर्थात 'जे लहान ते छान'! हे इतर क्षेत्रांप्रमाणेच उद्योग-व्यवसायाला देखील लागू पडते. अनेक नामवंत अर्थतज्ज्ञसुद्धा छोट्या किंवा लघुउद्योगांचा पुरस्कार करताना दिसतात. छोट्या उद्योगांचे अनेक फायदे असतात. अशा उद्योगांचे खर्च कमी असतात, त्यांच्यामध्ये अंगभूत लवचिकता असते, त्यांची निर्णय घेण्याची प्रक्रिया खूप वेगवान असते; शिवाय अनेक छोटे-उद्योग हे नावीन्यपूर्ण व्यवसायात असतात, शिवाय त्यांना सरकारकडून अनेक सवलतीदेखील मिळत असतात. या सर्व बाबींचा सकारात्मक परिणाम अशा छोट्या उद्योगांच्या फायदा मिळविण्याच्या क्षमतेवर होत असतो. 

शेअर बाजाराचा इतिहास पाहिला तर असे लक्षात येते, की मोठ्या कंपन्यांच्या शेअरच्या तुलनेत चांगल्या छोट्या कंपन्यांचे शेअर लवकर उसळी मारतात. शिवाय फारसा नावलौकिक आणि मोठ्या कामगिरीची पार्श्ववभूमी नसल्याने यापैकी अनेक लघुउद्योग अगदी कमी प्रीमियम रक्कम आकारून प्राथमिक बाजारात त्यांचे 'आयपीओ' आणत असतात. त्यामुळे त्यांचे पीई गुणोत्तर देखील खूप आकर्षक असते. असे शेअर कमी किमतीत उपलब्ध असताना खरेदी केल्यास भविष्यात त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. अर्थात शेअर बाजारातील हजारो शेअरमधून नेमके असे चांगले 'स्मॉल कॅप' कंपन्यांचे शेअर शोधून काढण्यासाठी अचूक अभ्यास गरजेचा असतो, जो सर्वसामान्य गुंतवणूकदारांना शक्‍य होत नाही. त्याऐवजी स्मॉल कॅप म्युच्युअल फंडात नियमितपणे गुंतवणूक करून वेगवेगळ्या क्षेत्रांतील चांगल्या छोट्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा मार्ग सोपा आणि कमी जोखमीचा वाटतो. अर्थात सर्वच स्मॉल कॅप फंड हे त्यांच्याकडील संपूर्ण निधीची गुंतवणूक केवळ स्मॉल कॅप शेअरमध्ये न करता थोडी गुंतवणूक मध्यम आकाराच्या कंपन्यांमध्येदेखील करीत असतात. त्यामुळे अशा फंडांना 'स्मॉल अँड मिड कॅप' फंड म्हणणे अधिक सयुक्तिक ठरते. 

थोडी जोखीम स्वीकारून भविष्यातील संभाव्य फायदा पदरात पाडून घ्यायचा असेल, तर आपल्या एकूण गुंतवणुकीपैकी काही हिस्सा अशा फंडांमध्ये 'एसआयपी'द्वारे नियमितपणे गुंतवत राहावा. चांगल्या स्मॉल कॅप फंडामध्ये दीर्घकाळासाठी 'एसआयपी' केल्यास उत्तम फायदा मिळाल्याची उदाहरणे आहेत. फ्रॅंकलिन इंडिया स्मॉलर कंपनीज फंडात जानेवारी 2007 ते डिसेंबर 2016 या दहा वर्षांच्या कालावधीत दरमहा 10 हजार रुपये 'एसआयपी'द्वारे गुंतविलेल्या एकूण 12 लाख रुपयांचे आजचे बाजारमूल्य अंदाजे 40 लाख रुपये आहे. अर्थात स्मॉल कॅप कंपनांच्या शेअरचा बाजारभाव आणि शेअरची संख्या मोठ्या कंपन्यांच्या तुलनेत कमी असल्याने बाजारातील चढ-उतारांचा त्यांच्यावर अधिक परिणाम होतो. विशेषतः बाजार कोसळताना अशा छोट्या शेअरची वाताहत होऊ शकते. त्यामुळे ही जोखीम लक्षात घेऊनच स्मॉल कॅप फंडात गुंतवणूक करावी आणि आपली सर्व गुंतवणूक त्यामध्ये करणे टाळावे. तसेच आपल्या गुंतवणुकीमध्ये अशा फंडांच्या जोडीला लार्ज कॅप फंड, बॅलन्स्ड फंडदेखील ठेवावेत. 

गेल्या पाच वर्षांत उत्तम कामगिरी केलेले काही स्मॉल कॅप फंड पुढीलप्रमाणे आहेत : डीएसपी ब्लॅक रॉक मायक्रोकॅप फंड, फ्रॅंकलिन इंडिया स्मॉलर कंपनीज फंड, रिलायन्स स्मॉल कॅप फंड, एसबीआय स्मॉल अँड मिड कॅप फंड, कॅनरा रोबेको इमर्जिंग इक्विटीज फंड.

Web Title: Virendra Tatke writes about business and share market