सरकारी कर्मचाऱ्यांच्या व्यवहारांवर नजर 

पीटीआय
गुरुवार, 6 जुलै 2017

केंद्रीय दक्षता आयागाचे पाऊल; भ्रष्टाचार रोखण्यासाठी उपाययोजना 

नवी दिल्ली : भ्रष्टाचार रोखण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या बॅंकिंग व्यवहारांवर नजर ठेवण्यास केंद्रीय दक्षता आयोगाने सुरवात केली आहे. 

केंद्रीय दक्षता आयागाचे पाऊल; भ्रष्टाचार रोखण्यासाठी उपाययोजना 

नवी दिल्ली : भ्रष्टाचार रोखण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या बॅंकिंग व्यवहारांवर नजर ठेवण्यास केंद्रीय दक्षता आयोगाने सुरवात केली आहे. 

आर्थिक गुप्तचर पथकाकडून सरकारी कर्मचाऱ्यांशी निगडित संशयास्पद बॅंकिंग व्यवहारांचा माहिती नियमितपणे केंद्रीय दक्षता आयोगाला मिळत आहे. काळा पैसा आणि गुन्हेगारी कारवायांशी निगडित संशयास्पद आर्थिक व्यवहारांची माहिती जमा करणे, तिचे विश्‍लेषण करणे आणि ही माहिती सरकारी संस्थांना देण्याची जबाबदारी आर्थिक गुप्तचर पथकावर आहे. काळा पैसा आणि गुन्हेगारी कारवायांशी निगडित दहा लाख रुपये व त्यावरील संशयास्पद व्यवहारांची माहिती जमा करण्यात येते. भ्रष्ट मार्गाने मिळविलेला काळा पैसा बॅंकिंग यंत्रणेत येण्यापासून रोखण्याचा यामागे उद्देश आहे. सरकारी कर्मचाऱ्यांशी खासगी व्यक्तींकडून झालेल्या व्यवहारांचा तपशीलही जमा करण्यात येत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

आर्थिक गुप्तचर पथक संशयास्पद व्यवहारांची माहिती दक्षता आयोगासह सक्तवसुली संचालनालय, केंद्रीय अन्वेषण विभाग, रिझर्व्ह बॅंक, सेबी, राष्ट्रीय तपास संस्था, केंद्रीय आर्थिक गुप्तचर विभाग आणि सर्व राज्यांचे मुख्य सचिव यांना देतो. सर्वोच्च न्यायालयाने काळ्या पैशाच्या तपासासाठी नेमलेल्या विशेष तपास पथकालाही ही माहिती देण्यात येते. अर्थमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील आर्थिक गुप्तचर समितीच्या अंतर्गत हे विशेष तपास पथक कार्यरत आहे. 

केंद्रीय दक्षता आयोगाला संशयास्पद व्यवहारांची मोठ्या प्रमाणात माहिती आर्थिक गुप्तचर पथकाकडून मिळत आहे. त्यानुसार योग्य ती पावले उचलण्यात येत आहेत. 

- टी. एम. भसिन, केंद्रीय दक्षता आयुक्त