का ढासळतोय भारतीय शेअर बाजार?

share market
share market

देशांतर्गत बँकिंग आणि बिगर वित्तीय कंपन्यांना लागलेल्या ग्रहणातून भारतीय शेअर बाजार सावरत असतानाच आज पुन्हा एकदा शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात पडझड झाली. आज सेन्सेक्स 759 अंकांनी घसरून 34,001 वर स्थिरावला तर निफ्टी 225 अंकांच्या घसरणीने 10,234 वर बंद झाला. जागतिक घडामोडी आणि त्यातही प्रामुख्याने अमेरिकेत सुरु असलेल्या घडामोडींमुळे आज भारतीय शेअर बाजाराला दणका बसला. या पार्श्वभूमीवर बाजाराच्या घसरणीला कारणीभूत असणाऱ्या बाबींचा घेतलेला आढावा. 

मागील पाच दिवसांपासून अमेरिकन बाजारात घसरण सुरु आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यापासून सलग पाच सत्रात घसरण होणे असे पहिल्यांदाच होत आहे. काल प्रामुख्याने टेक्नॉलॉजी क्षेत्रातील अॅमेझॉन, अॅपल आणि फेसबुकसारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याने अमेरिकेच्या डाऊ, नॅसडॅक आणि एस अँड पी 500 या निर्देशांकांमध्ये मोठी घसरण झाली. ही घसरण इतकी वाईट होती की अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या घसरणीला फेडरल रिझर्व्हने केलेल्या व्याजदरवाढीला कारणीभूत ठरविले. तसेच, फेडच्या भूमिकेशी आपण असहमत असल्याचे सांगत अमेरिकेची मध्यवर्ती बँक 'क्रेझी' झाल्याचे म्हटले आहे. 

फेडच्या भूमिकेचा भारतावर परिणाम 
मागील काही तिमाहीत फेडने सातत्याने केलेल्या व्याजदरवाढीने गुंतवणूकदारांना दीर्घकालीन कर्जरोखे जास्त आकर्षक वाटू लागल्याने अमेरिकन शेअर बाजारावर देखील त्याचा परिणाम जाणवत आहे. अमेरिकन कर्जरोख्यांच्या व्याजदरात होत असलेली वाढ आणि त्यामुळे मजबूत झालेला डॉलर भारतासहित इतर उभरत्या अर्थव्यवस्थांवर परिणाम करत आहे. ज्याचा प्रत्यक्ष तोटा परकी गुंतवणुकीच्या माध्यमातून होत आहे. परकी गुंतवणूकदारांनी आतापर्यंत या वर्षात 74 हजार कोटींची ($ 10  बिलियन) गुंतवणूक काढून घेतली आहे. तसेच, ट्रेझरी उत्पादनातील वाढीमुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला उभारी येत असल्याने फेडरल रिझर्व्ह आणखी व्याजदर वाढ करण्याची शक्यता आहे. 

देशांतर्गत परिस्थिती आणि रुपया 
भारतीय बाजारपेठेतून बाहेर जाणारी गुंतवणूक, वाढत्या तेलाच्या किंमती आणि रुपयाची होत असलेली घसरण यामुळे चालू खात्यातील तुटीत वाढ होत आहे. सरकार आणि आरबीआयने प्रयत्न करूनही रुपयाची घसरण सुरूच आहे. मसाला बॉण्ड, काही वस्तूंवर केलेली आयात शुल्क वाढ तसेच परकी गुंतवणूकदारांसाठी नियमांमध्ये शिथिलता आणून देखील रुपयाचे मूल्य ढासळत आहे. त्यातच आयएल अँड एफएस सारख्या कंपन्यांच्या डीफॉल्ट्समुळे एनबीएफसी कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेली घसरण यामुळे 39 हजारांजवळ असलेल्या सेन्सेक्सची पीछेहाट होत तो 34 हजारांवर पोचला आहे. 

"आंतरराष्ट्रीय घडामोडींचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम झालेला आहे. अमेरिकन कर्जरोख्यांच्या व्याजदरात वाढ होत असल्याने परकी गुंतवणुकीवर परिणाम होत आहे. याशिवाय, इंधनाचे वाढते दर आणि रुपयाची घसरण हा चिंतेचा विषय आहे. परंतु, भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असल्याने गुंतवणूकदारांनी घाबरण्याचे कारण नाही. तसेच एसबीआयने एनबीएफसींची कर्जे विकत घेण्याचा निर्णय गुंतवणूकदारांसाठी सकारात्मक आहे. मात्र, या आठवड्यात निफ्टीची 10,200 ची पातळी महत्वपूर्ण ठरणार आहे." 
​- किरण जाधव, शेअर बाजार विश्लेषक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com