एसबीआयच्या कर्मचाऱ्यांसाठी 'वर्क फ्रॉम होम'ची सुविधा

वृत्तसंस्था
बुधवार, 8 मार्च 2017

घरापासून कार्यालयापर्यंत येण्यासाठी होणाऱ्या प्रवासापासून सुटका मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मोबाइल कॉम्प्युटिंगच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना घरी बसून काम करता येणार आहे.

मुंबई: स्टेट बॅंके ऑफ इंडियाने (एसबीआय) आपल्या कर्मचाऱ्यांना घरी बसून काम करता यावे यासाठी "वर्क फ्रॉम होम' योजना सुरू केली आहे. बॅंकेच्या संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या योजनेला मान्यता देण्यात आली आहे. घरी बसून काम करताना बॅंकेच्या मोबाइल डिव्हाइसच्या माध्यमातून कर्मचारी बॅंकेच्या संपर्कात राहू शकणार आहेत.

घरापासून कार्यालयापर्यंत येण्यासाठी होणाऱ्या प्रवासापासून सुटका मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मोबाइल कॉम्प्युटिंगच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना घरी बसून काम करता येणार आहे. फॉरवर्ड क्रॉस-शेल, विपणन, सीआरएम, सोशल मिडिया मॅनेजमेंट, सेटलमेंट, तक्रार व्यवस्थापन आदी कामे कर्मचाऱ्यांना घरी बसून करता येणार आहेत. बॅंकेचा डेटा सुरक्षित राहण्यासाठी सर्व सक्षम साधने आणि बॅंक सतत नियंत्रण ठेवेल, असे एसबीआयने मंगळवारी एका निवेदनातून जाहीर केले आहे.

सध्या मुंबई शेअर बाजारात एसबीआयचा शेअर 268.5 रुपयांवर व्यवहार करत असून त्यात किरकोळ वाढ झाली आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे रु. 213,729.79 कोटींचे बाजारभांडवल आहे.

शेअर बाजार आणि आर्थिक घडामोडींची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी www.sakalmoney.com ला भेट द्या.

Web Title: Work from home facilityt for SBI employees