माजी जवानांना खाव्या लागतात शिव्या...

pune brt
pune brt

लष्करात असताना भारतीय जवान डोळ्यात तेल घालून मातृभूमिची सेवा करत असताना शत्रूंची झोप उडवितात. पुढे सेवानिवृत्तीनंतर काही जवान उदरनिर्वाहासाठी सुरक्षारक्षकांची नोकरी करतात. मात्र, याच माजी जवानांना आपल्याच लोकांकडून अक्षरशः नको त्या शिव्या खाव्या लागतात... पुण्यातील बीआरटी मार्ग हा एक खरं तर संशोधनाचा मोठा विषय. असो... या विषयात लक्ष न घालता दुसरी समस्या जाणवून घेऊयात...

बीआरटी मार्गादरम्यान अनेक सुरक्षारक्षक उभे असतात. बीआरटीच्या मार्गामध्ये अन्य वाहनधारकांनी प्रवेश करू न देणे हे प्रमुख त्यांचे काम. परंतु, बीआरटी मार्गामधून आम्ही जाणारच अशा अविर्भावात धनधांडगे अथवा स्थानिक आपली वाहने दामटताना दिसतात. या सुरक्षारक्षकांनी त्यांना प्रवेश नाकारल्यास नको त्या शिव्या खाव्या लागतात. अनेकदा मारही खावा लागत असल्याचे एका सुरक्षा रक्षकाने सांगितले. देशाच्या सीमेवर उभे राहून शत्रूराष्ट्राला घाम फोडताना ऊर भरून यायचा. परंतु, आमचेच लोक आम्हाला शिव्या घालतात ना... त्यावेळेस वाईट वाटते. पण... कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा याचबरोबर पुन्हा एकदा देशसेवेचे काम करावे म्हणून अशा प्रकारची नोकरी करतो. परंतु, धनदांडग्यांना हे केंव्हा कळणार? आई-बहिणीवरून आम्हाला चार शिव्या देऊन यांना काय मिळते? कोणासठावूक....

रस्ता तुमच्या बापाचा हाय का?
बीआरटीच्या मार्गामध्ये उभे राहून एक प्रकारची सेवा बजावत असतो. परंतु, अनेकजण बळजबरीने प्रवेश करतात. प्रवेशापासून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तर दररोज कित्येकजण आमचे आई-बाप काढतात. अनेकदा त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. पण... ऐकतील ते धनदांडगे कसले? रस्ता तुमच्या बापाचा हाय का? इथपासून ते आई-बहिणीवरून शिव्या हासाडून पुढे सुसाट निघून जातात. पुढे त्यांच्यावर कोणती कारावाई होती की नाही ते माहित नाही... परंतु, शिव्या देऊन वेगाने वाहन दामटण्यात त्यांना आनंद मिळत असावा... पण... रोज मरे त्याला कोण रडे असे म्हणतात ना? अशी आमची परिस्थिती झाली आहे. दररोज कोण ना कोण शिव्या घालतो अन् निघून जातो. लष्करी नियमाप्रमाणे आम्ही आमची जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करत असतो. पण... कायदा आणि परिस्थितीने आता आमचे हात बांधले गेले आहेत. यामुळे गप्प बसून रहावे लागते.

बीआरटी मार्गात संरक्षण नाहीच...
बीआरटी मार्गामध्ये बारा महिने सेवा बजवावी लागते. सुरक्षा रक्षकांचे उन-वारा-पाऊस यापासून संरक्षण करण्यासाठी कोणतीही सुविधा नाही. बीआरटी मार्गावर कोट्यावधी रुपये खर्च करून हे मार्ग उभारले गेले आहेत. परंतु, सुरक्षा रक्षकांसाठी कोणतीही सुविधा नाही. यामुळे हे सुरक्षा रक्षक पुठ्ठ्यांपासून बनवलेले तात्पुरते शेड उभे करून त्याखाली थांबतात. कारण त्यांच्यापुढे दुसरा कोणता पर्यायच राहत नाही. भर दुपारी पारा चाळीशीच्या वर गेलेला असताना किती वेळ उन्हात उभे राहणार. पुणे-नगर महामार्गावर असलेल्या बीआरटी मार्गातील सुरक्षा रक्षक आपापल्या पद्धतीने पर्याय निवडतात. परंतु, पुढे तारांकीत रांजणगाव एमआयडीसीमध्ये अनेक परदेशी कंपन्या आहेत. या कंपन्यांना भेटी देण्यासाठी परदेशी नागरिक सतत येत असतात. हे नागरिक हे शेड पाहून काय भावना व्यक्त करत असतील? स्मार्ट सीटी हीच का?

जबाबदारी कोणाची?
बीआरटी मार्गावर कोट्यावधींचा खर्च करताना सुरक्षा रक्षकांच्या शेडचा विचार केला गेला असता तर या मार्गावर असलेले पुठ्ठ्यांचे विद्रुपीकरण दिसले नसते. एका बाजूला स्मार्ट सीटी म्हणायची अन् दुसरीकडे या सुरक्षा रक्षकांना पुठ्ठ्यांखाली बसवायचे, ही कोणती पद्धत? भर उन्हात थांबून सेवा बजावयाची अन् पु्न्हा धनदांडग्या वाहनचालकाशी भांडण. यामधून एखादी घटना घडली तर जबाबदार कोण? याचा विचार बहुदा कोणी केलेलेचा दिसत नाही.

बीआरटी मार्गात तंत्रज्ञानाचा वापर हवा...
बीआरटी मार्गामधून इतर वाहनांनी प्रवेश करू नये, यासाठी एका बाजूला बांधलेल्या दोरीचे दुसरे टोक या सुरक्षा रक्षकांच्या हातात दिले जाते. अनेकदा खासगी वाहनचालक हे दोरी तोडून पुढे सुसाट निघून जातात. तुटलेल्या दोरीला जोडून दुसरी दोरी बांधली जाते. पुढे-पुढे ती विद्रुप होत जाते... माहिती तंत्रज्ञानाने एवढी प्रगती साधली असताना अशा प्रकारची दोरी कशासाठी? हा प्रश्न उपस्थित राहतो. दोरीऐवजी सेन्सॉर असलेला रॉड ठेवला तर सुरक्षा सरक्षांबरोबर भांडणेही होणार नाहीत आणी अन्य वाहनेही बीआरटीमधून जाणार नाहीत. पण... याकडे लक्ष देणार कोण?

सुरक्षारक्षकांसाठी शेडची उभारणी केल्यास...
सुरक्षा रक्षकांसाठी शेडची उभारणी केल्यास ते स्मार्ट सीटीसाठी योजनेत चांगले दिसेलच. या शेडमध्ये प्राथमिक औषधांची पेटीसह अनेक महत्वाच्या गोष्टी ठेवता येतील. सुरक्षा रक्षकांचे उन-वाऱयापासून संरक्षण होईल. शिवाय, विद्रुपीकरण दिसणार नाही. यावर प्रशासनाने नक्कीच विचार करायला हवा.

पॉलिसी नाही...
बीआरटी मार्गामधून अनेक वाहने अति वेगाने जाताना दिसतात. परंतु, यामार्गामधून जात असताना दुर्देवाने अपघात झाला तर कोणत्याही प्रकारचा विमा मिळत नाही, बहुदा अनेकांना हे माहित नसावे. लाखो रुपयांचे वाहने घ्यायची अन् नियम तोडून सुरक्षा रक्षकांना शिव्या देऊन बीआरटीमधून दामटायची ही कोणती पद्धत? हे नक्कीच जबाबदारपणाचे वर्तन नाही.

बीआरटी मार्गाच्या बाजूला वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या असताना बीआरटीमधून गेलो तर फरक पडतो कुठे? असाही प्रश्न अनेकजण उपस्थित करतील. जमत नसेल तर माजी सैनिकांनी सुरक्षा रक्षकाची नोकरी करू नये, एक ना एक अनेक प्रश्न उपस्थित होऊ शकतात. परंतु, यासाठी काय करायला हवे? काय केल्यास सुधारणा होऊ शकेल? तुमच्याकडे आहे काही उत्तर.... तुमच्या मनात असलेल्या शंका अथवा त्यांची उत्तरे असल्याच प्रतिक्रियांच्या माध्यमातून जरूर मांडा...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com