शतदा प्रेम करावे असा गायक 

Arun_Date
Arun_Date

माझ्या कॉलेज जीवनात भावगीतावर प्रेम करायला कोणी शिकवले नाही तर अरुण दाते सारख्या कलाकाराला ऐकताना ते प्रेम आपोआप जडत गेले. गुलाबी दिवस होते ते. कॉलेज मधल्या सगळ्याच मुली सुंदर वाटायच्या इतकेच नाही तर त्या फक्त आपल्याकडेच बघतात असा आभास व्हायचा. मन कातरले असताना मग अरुण दातेंची गाणी अजून जवळची वाटायची. सुरुवात चावट असायची कारण ११ वी मध्ये साधी सरळ दिसणारी मुलगी अचानक २ महिन्यांच्या उन्हाळी सुट्टी नंतर फुलपाखरू झालेली दिसायची तेंव्हा दातेंचे 'दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्यावाचून झुलायचे' हे गाणे आपोआप ओठी यायचे.

छोट्याश्या आणि घसरणाऱ्या TVS ५० मोपेड वर मागे मैत्रिणीला बसवून फिरायला जातानाचा रोमांच अजून आठवतो कारण मैत्रीण कितीही अंतर ठेऊन बसली तरी उतरत्या सीट मुळे नंतर आपोआप जवळ यायची. मग मैत्रिणीसोबत गुपचूप NDA रोड ला फिरायला जातानाचे साहस मोठे वाटायचे. विचारपूर्वक पौर्णिमेच्या दिवशी अशा ठिकाणी फिरायला जाऊन अरुण दातेंचे 'तोच चंद्रमा नभात' दोघांनी मिळून गुणगुणायचे... अहाहाहा.. काय मजा होती. अशावेळी बरोबरच काय आजूबाजूला कोणी कोणी नको असायचे. साथीची परवानगी फक्त अरुण दातेंना होती.

आता ज्याला तरुण पिढी 'ब्रेकअप' म्हणते तसे थोडे नाते बिनसले तरी अरुण दातेंचे 'भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी' गाणे आठवायचे. पावसात एकत्र भिजून सिंहगडावर पोहोचल्यावर झोपडीत वाऱ्यासाठी आडोसा घेतला कि अरुण दातेंचे भेट 'तुझी माझी स्मरते' हे गाणे आठवल्यावाचून राहायचे नाही आणि सूर्यास्ताच्या मंद वाऱ्यात निरोप घेऊन निघताना सखीच्या डोळ्यातील पाणी बघून डोळ्यात सांज वेळी आणू नकोस पाणी  हे सूर आठवले नाहीत असे झालेच नाही. 

दाते साहेब तुम्ही आम्हाला सोडून गेलात पण वरती तुमची महफिल जोरदार रंगणार आहे कारण गदिमा + पुलं + श्रीनिवास खळे + यशवंत देव सारखे दिग्गज तुमची आतुरतेने वाट बघत असतील. 

खरंच सांगतो तुम्ही खूप खूप काही दिलंत आम्हांला ... तुमची आठवण अर्थपूर्ण आणि गोड गाण्यांच्या रूपाने आमच्या मनात कायम दरवळत राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com