मी वाट बघते.. 

Sulakshana
Sulakshana

आज सर्वजण आपल्या आपल्या वडिलांना happy Father's day म्हणून दिवस साजरा करतात. मला माहित नाही माझे वडील कसे होते कुठे होते? पण दुसऱ्यांच्या वडिलांकडे पाहिले की खूप आठवण येते आणि मग काहीतरी हरवल्या सारखं वाटतं. कधी वडिलांचे प्रेम काय असते माहीत नाही. पण बाकिच्यांच्या वडिलांचे प्रेम बघून असे वाटते की, जाम भारी असेल. मी खूप मिस करते. पण देवा घरी कधी जर कोणी एकदा गेले तर परत येत नाही ना? 

देवाने जाणाऱ्या माणसाबरोबर त्याच्या सर्व आठवणी सोबत घेऊन जायला पाहिजे असं मला वाटतं. कारण आज जगताना काहीतरी हरविल्यासारखं, गमवल्यासारखं वाटतं. मी काही चांगले समाजकार्य केले की सर्व लोक माझे कौतुक करतात. बाबा तुम्ही पण केले असते ना माझे कौतुक? कोणता ही पुरस्कार मिळाला तर बाबा मी खूप आनंदाने आणि अभिमानाने तुम्हाला सांगितले असते. पण बाबा माझे नशीब खूप वाईट बघा ना तुम्ही नाही तर नाही पण तुमचा एक फोटो पण नाही हो माझ्याकडे. निदान फोटो घेऊन तरी तुमच्या सोबत बोलले असते. पण हे सुद्धा माझ्या नशिबात नाही हो बाबा. 

तुम्ही कसे होता? गरीब श्रीमंत काही माहित नाही, पण तुम्ही माझ्यासाठी चांगले बाबा नक्कीच झाले असता. बाबा मी आज एक महिन्याच्या बाळाला जेव्हा बघते ना तेव्हा तर मनात आभाळ दाटून येतं. त्या आभाळात मी एकटी भिजत असते. सोबत कोणी आहे नाही हे सुद्धा समजत नाही. बाबा किती दिवस असे करू मी? मी जर आजारी असेल्यावर तोंडावर चादर घेऊन खूप रडते हो. कोणी नसते हो विचारायला. आज जर तुम्ही असता तर महा दवाखान्यात घेऊन गेला असता.

खूप स्वार्थी जग आहे तरिही मी कोणाकडे तक्रार करत नाही कारण कोणच नाही मला समजून घ्यायला. मला वाटतं एक मशीन बनली आहे. काम असेल तर सर्व जण येतात, बोलवल आणि काम झाले की मशीन खराब झाली तरी कोणाला वेळ नसतो तिच्यासाठी. लहानाची मोठी झाले पण आजूनही बाळचं आहे. बाबा येईल का हो तो दिवस ज्या दिवशी मी तुमाला happy Father's day म्हणेन? आणि आलात तर कधी येईल मी वाट बघते.

बाबा मला जीवनात कसलीही भीती वाटत नाही, पण कोणाच्या फॅमिलीमध्ये गेले किंवा मैत्रीणींच्या बाबांना भेटले तर मग मला भीती वाटते. हो असे वाटते की, माझ्याकडे सर्व असून रिकामी आहे आणि समोरची व्यक्ती माझ्यापेक्षा खूप श्रीमंत. बाबा अजून कोणाच्या लग्नात गेले किंवा माझ्या लग्नाचा विषय निघाला तर खूप मोठं संकट आल्यासारखं वाटतं. कोण माझ्या लग्नाबद्दल बोलणार? कोण माझे लग्न करणार? मला आई बाबा नाही म्हणून कोण करणार माझ्या सोबत लग्न? माझी कोण जबाबदारी घेणार? माझ्या बाजूनी कोण बोलणार? माझे वडील म्हणून कोण असणार माझ्या सोबत? हे सर्व विचार आल्यावर माझ्या जीवनात दुःखाचा डोंगर कोसळल्यासारखं वाटतं. 

जीवन खूप विचित्र असतं ना? आपणच आपली आई, आपण आपले बाबा होणे आणि स्वतःला समजून घेणे, आहे त्यात आनंदी रहाणे. पण पावलो-पावली साप म्हणून हे लोक असतात आपल्याला डसायला. तरीसुद्धा मी अजून हार मानली  नाही. सर्व जण आपल्या मतलबासाठी उपयोग करून घेतात एक मशिन म्हणून माझा. मी कोणाला तक्रार करत नाही. कारण सांगणार कोणाला...? इथे खऱ्याची किंमत कोणाला नाही. म्हणून माझी मला तक्रार करायची आणि आपल्या कामाला लागायचे.
 
बाबा नाही हो इतकी मोठी झाले मी. तुम्ही परत या माझ्यावरच्या जबाबदाऱ्यांना कमी करा. आता नाही सहन होत मला. मलापण मन आहे, भावना आहेत. त्या कुणाला सांगू. या लोकांच्या गर्दीत असून पण एकटी असल्या सारख वाटतं. कारण इथे कोणाला कोणाची काही पर्वा नाही. घराजवळ घर असले तरी त्या घरात कोण राहते हे समजत नाही. 

आज तुमचा एक फोटोही नाही फक्त एक बाबा आहे, त्यामुळे मी जन्माला आले. हे आठवते आणि पुढे जाते. पण किती दिवस करू असे नाही हो बाबा इतकी हिंमत माझ्यात.. आज कोणासोबत बोलू हे सर्व. आज हे सर्व लिहिताना डोळे भरून आलेत पण त्या डोळ्यात आलेल्या पाण्याची किंमत मला माहित आहे. बाबा वाळवंटामध्ये उंट तरी असतात पण माझ्या जीवनाच्या वाळवंटात ते पण नाही हो. खूप कमी भासते तुमची. तुम्हा एकदा येऊन एक छानशा मिठीत घ्या ना... तक्रार नाही करणार पण त्या एक मिठीत मी तुमच्या सोबत खूप काही बोलून जाईल.

तुम्ही लहानपणी मला ओरडला नाहीत कधी. तुमचं बोट धरून नाही चालवले तरी तक्रार नाही केली. मग मला आई बाबा समजायला लागले आणि सर्व गमती जमतीच्या वयात तुम्ही कधी सोबत नव्हता तरी पण नाही हो तक्रार केली. आज मात्र तक्रार करणार कारण या वयात मला तुमची खरंच खूप खूप गरज आहे. स्वतःच स्वतःचे बाबा बनून स्वतःला समजून घेणं खूप अवघड असतं हो. रूमच्या बाहेर पडल्यावर लोकांमध्ये जाणं, त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तर देणं, आणि मग माझ्या जबाबदारीचा विचार करून परत एकटी होणं. एखादी मुलगी आई झाली तरी ती तिच्या आई-बाबांसाठी लहान असते. मी का नाही कोणासाठी लहान, का नाही हो माझ्या जीवनात कोणाचे लाड? तुम्ही जीवनात नाही तर खूप मोठं कोड बनून गेलं जीवन. मी कितीही मोठी झाले तरी तुमीची वाट बघते आणि बघत राहील. प्लीज बाबा लवकर या मग मी तुम्हाला रोज happy Father's day म्हणेन आणि रोज तुमचा दिवस म्हणून त्यासाठी तुमची वाट बघेल..  याल ना लवकर? 
मी वाट बघते आहे ..!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com