नागरिकहो, आता तुमची वेळ!

sangali-miraj
sangali-miraj

सांगलीकरहो महापालिकेची ही पाचवी निवडणूक आहे. भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि अन्य सर्वच पक्ष, आघाड्यांच्या नेत्यांनी आपली चॉईस नागरिकांसमोर ठेवली आहे. या यादीतून आपण योग्य उमेदवार पास करायचे आहेत. शहरे सुंदर बनवू, न्यूयॉर्क-शांघायच्या घोषणांपेक्षा आपल्याला काय पेलेल याचा विचार करू. तुमचा नगरसेवक लुटारू नव्हे तर विश्‍वस्त हवा. त्यासाठी तुमची पारख महत्त्वाची आहे. कोणीच चांगला नाही असे होत नसते. त्यातल्या त्यात बरा असा निकष लावून मतदान कराच. सर्वपक्षीय नेत्यांचे विनिंग मेरीट वेगळे आहे; आता तुम्ही तुमचे मेरीट दाखवा... नागरिकहो, आता तुमची वेळ सुरू...   

राजकारण हा गुंडांचा शेवटचा अड्डा आहे असे प्रसिध्द नाटककार बर्नाड शॉ यांनी शतकांपूर्वी म्हटले होते. अजितदादांनी तेच वाक्‍य वेगळ्या शब्दात म्हटले होते. गेल्या वीस वर्षांत सुखद फार थोडे आणि शरम वाटावी असाच पालिकेचा कारभार. अशा काहींना जनतेने यापूर्वीच विश्रांती दिली आहे. मिरजेचा अनुभव पाहिला तर येथे पाच मिनिटांत सभा गुंडाळून विकासावरच रोलर फिरवणारे मिरज पॅटर्नवाले कारभारी पुन्हा-पुन्हा सभागृहात आलेले आपण पाहिले आहेत. येथे राजकीय व्यवस्था वाईट नाही पण ती ज्यांच्या हातात किल्या जातात ते कशी राबवितात याच्याशी आपले काही देणेघेणे नाही असे म्हणून आपण कारभाऱ्यांकडे दुर्लक्ष करत असतो. या शहराला पायाभूत सुविधा योग्य देता आल्या नाही तर या शहरात नवे उद्योग, बाहेरील नागरिक कशासाठी येतील? मग नागरिकांना अन्य विकसित शहरांकडे उद्योग व्यवसायांसाठी स्थलांतरित व्हावे लागते.

आपली शहरे आणि गावे विकासाअभावी रिकामी पडू लागल्याचे चित्र आहे. या शहरांतून तरुणांना रोजगारच उरत नसल्याने संबंधित शहरे भविष्यात निवृत्तांची बनू शकतात. शहराचा हा घात आपण मतदानाचा अधिकार बजावत नसल्याने किंवा भावनेच्या भरात अयोग्य निवड करत असल्याने होत असतो. त्यामुळे प्रत्येकाने मतदानाचा अधिकार नेटकेपणाने बजावावा यासाठी प्रशासनाने मोठी जागृती केली आहे. लोकशाही ही एका आदर्श व्यवस्थाच आहे मात्र लोक डोळस नसतील तर घोळ होतात. भ्रष्टाचार बोकाळतो. या दृष्टिकोनातून स्थानिक स्वराज्य संस्थांचे मॉडेलवरच विचार केला पाहिजे, असे शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी म्हटले होते. त्यामुळे महापालिकेसारख्या लोक नियुक्‍त संस्थेत सुधारणा करण्याची गरजही व्यक्‍त केली जाते. मुंबईपासून सांगलीपर्यंत ज्या 23 महापालिका आहेत त्या सर्वांची व्यथा कमीअधिक तीच आहे. कारभारवर नियंत्रण सुटल्याचेच चित्र सर्वत्र पहायला मिळते. महासभा या शहराच्या नियोजनासाठी असतात याचा आता विसर पडला आहे. स्थायी समित्या तर अंडरस्टॅंडिंग कमिट्या झाल्या आहेत. मध्यल्या काही काळात सभापती व्हा आणि बॅंकेचे कर्ज फेडा...असाच फंडा सांगलीत होता. आता तर महासभाच आरक्षणे उठविणे, भूखंड ढापणे, भरपाईत गोलमाल करणे, नियमबाह्य विषय सेटलमेंट करणे, ऐनवेळच्या विषयात मलईचे विषय घुसडणे यासाठी उरल्या आहेत. त्यामुळे नागरिकशास्त्राच्या पुस्तकात जी महापालिकेची कामे पाच गुणांसाठी विद्यार्थी अभ्यासतात ती नगरसेवकांच्या गावीही नसतात.

सांगलीकरहो महापालिकेची ही पाचवी निवडणूक म्हणजे दोन दशकांचा कालावधी लोटला आहे. खरे तर एका विकास आराखड्याचा हा कालावधी आहे. काय झाले या आराखड्याचे? त्याचे पुरते तीन तेरा वाजले. शहराचा नियोजनाची किती राखरांगोळी केली आहे ते शामरावनगर, संजयनगरसारख्या बेशिस्त नियोजनातून पुढे येते. शहरातील मोक्‍याच्या जागा बिओटीच्या गोंडस नावाखाली कवडीमोल दराने विकल्या गेल्या आहेत. आरक्षणे उठवून क्रीडांगणांचा बळी दिला आहे. मोहेंजोदडोमध्ये बाजारासाठी नियोजित मंडई होत्या. आता मंगळावर माणूस जात असताना सांगलीतील कारभारी रस्त्यावर बाजार सुरू केला म्हणून नारळ फोडतात. विश्रामबाग आणि आता विजयनगरचा काही भाग सोडला तर शहराच्या नियोजनाचा बोऱ्या वाजला आहे. आता चुकाल तर तर माफी नाही. परवाच शामरावनगरात साधी रुग्णवाहिका पोहोचली नाही म्हणून एकाला प्राण गमवावे लागले. हीच वेळ पूर्ण शहरावर येऊ शकते. सर्वपक्षीय नेत्यांना चांगले लोक सत्तेत यावेत यात स्वारस्य नाही. मात्र आपल्याला त्यात स्वारस्य दाखवले पाहिजे. त्यासाठी कारभारी चांगले निवडा. त्यासाठी विनम्र आवाहन !

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com