आई होणारा बाप!

pravin khunte writes about Fathers love
pravin khunte writes about Fathers love

आईचं मातृत्व, वात्सल्य ममता, प्रेम या विषयी खूप साहित्य निर्माण झाले आहे. पण त्या साहित्यात आई-एवढीच मातृत्वाची सावली देणारा बाप मात्र दुर्लक्षित राहिला. बापाची भूमिका केवळ चरितार्थ, अर्थार्जन आणि गरज पडल्यास संरक्षण एवढ्या पुरतीच मर्यादीत ठेवली गेली. बापाला कुटुंब प्रमुख केले, पण प्रेमाच्या, मायेच्या भावनेपासून दुर लोटले. तसे पाहिले तर मुलाला जन्म देणारी आई वेदनेशी लढत असताना बापाच्या अस्वस्थ मनाला तेवढ्याच वेदना होत असतात हे कोणाच्याही लक्षात येत नाही. 

आपल्या पितृसत्ताक व्यवस्थेनेही बापाचे 'बापत्व' हिरावून घेतले आहे. धाकाच्या मागे लपलेले बापाचे अपार प्रेम, काळजी पितृसत्ताक व्यवस्थेने दिसूच दिला नाही. केवळ जबाबदारी स्विकारून कर्तव्य पार पाडण्यापुरता बाप शिल्लक राहिला. त्यामुळं आई एवढच मातृत्व देणाऱ्या बापाचे प्रेम आपल्यासाठी अगम्यच राहिले. 

पुरूष म्हणजे कणखर, राकट, मजबूत, त्याने रडायचे नाही, भावनिक व्हायचे नाही, त्याने कुटूंबाचे कर्तव्य पार पाडायचे, जबाबदारी स्विकारायची, संरक्षण करायचे. पुरूष कुटूंब प्रमुख, घराचा कर्ताधर्ता अशा अनेक उपमा देऊन पुरूषाला अमानवी जीवन जगण्यासाठी भाग पाडले की काय असा प्रश्न पडतो. मुलाच्या जन्मानंतर जेव्हा त्याला हे कळायला सुरूवात होते की, मी मुलगा (पुरूष) आहे. तेव्हापासून त्यांची जडणघडण अशीच सुरू होते. एखादा पुरूष रडलाच तर त्याला काय मुलींसारखे रडतोस असं म्हणून सहज हिणवले जाते.  कुटूंबामध्ये एखादी दुःखद घटना घडल्यानंतरही पुरूषाला कितीही आपले अश्रू अनावर झाले तरी तो रडत नसल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. रडून दुःख व्यक्त करण्यासारख्या नैसर्गीक गोष्टीही पुरूषाला तो पुरूष आहे म्हणून करता येत नसतील तर ही खुपच दुःखाची बाब आहे.

पण आता परिस्थिती बदलत चालली आहे. बापाच्या धाकाची जागा मैत्री, आपुलकी, सामंजस्य घेत आहे. मुल आणि वडिलांमधील संवाद वाढत चालला आहे. बापाला 'अहो बाबा' ऐवजी 'ए बाबा' म्हटले जात आहे. केवळ काळजी घेणारा बाप यापेक्षा मुलांसोबत खेळणारा, हसणारा बाबा मुलांना जास्त आवडतो. आई नाही केवळ वडील आहेत अशा मुलांचीही संख्या भरपूर आहे. मुलांचे प्रेम विभागू नये म्हणून पत्नी गेल्यानंतरही आयुष्यभर लग्न न करता केवळ आपल्या मुलांना सांभाळणारे बाप आपल्या आजूबाजूला पहायला मिळतात.

पितृसत्ताक व्यवस्थेने बाप म्हणून त्याच्यात असणारे माणूसपण कितीही दाबाण्याचा प्रयत्न केला तरी त्याच्यातले वात्सल्य आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर वेगवेगळ्या परिस्थितीतून तुम्ही ते अनुभवतच असता. आज मातृदिनानिमित्त तेवढ्याच संवेदनेसह आईची भूमिका पार पाडणाऱ्या बापाच्या मातृत्त्वाचा विचार होणे गरजेचे आहे. हा आई-बाप यांच्या प्रेमाची तुलना करण्याचा प्रयत्न नाही. पण आई शब्दाच्या नावाखाली बाप दबून जाऊ नये यासाठीचाच हो छोटासा प्रयत्न!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com