नीम के पत्ते कडवे होते है, मगर खून तो साफ करते है

Manto
Manto

जमाने के जिस दौर से हम गुजर रहे हैं, अगर आप उससे वाकिफ नहीं तो मेरे अफसाने पढ़िए और अगर आप इन अफसानों को बर्दाश्त नहीं कर सकते तो इसका मतलब है कि जमाना नाकाबिल-ए-बर्दाश्त है. : मंटो

सआदत हसन मंटो हा काही केवळ व्यक्ती नव्हता. तो एक क्रांतीकारक विचार होता. जो त्यावेळच्या मजहबी लोकांंना समजला नाही. ज्यांना तो समजला, ते अल्पसंख्य होते. 'बोल के लब आजाद हे तिरे' म्हणणारा फैजही याला अपवाद नाही. मंटो हा कथा होता, नाटक होता, बेचैनी होता. साहित्य आणि थॉटही होता. ज्या शब्दांनी त्याने त्याचे अजरामर अफसाने फुलविले. समाजाला वास्तवाची चमक-धमक दाखविली, त्याच सत्याग्रही शब्दांनी त्याचं आयुष्य उसवून टाकलं. जिथं समाज व्यवस्थेमधलं भद्र वास्तव कुणी बोलू धजत नव्हतं, ते मंटो कथांमध्ये गंफून व्यवस्थेच्या मानगुटीवर टाकून देत होता. ते पचवणं काय पेलणंसुद्धा त्याकाळी माणसांना मुश्कील होतं. यात दोष मंटोचा नव्हता आणि समाजाचाही. कारण मंटो काळाच्या अनेक दशके पुढे होता. लख्ख प्रकाशाचा तो एक किरण होता. पण साधा कवडसा म्हणून देखील लोकांनी त्याच्याकडं पाहिलं नाही. परंपरेचं जोखड घेऊनच समाज हळूहळू उजेडाकडं चालत राहिला. मंटोच्या वेगाचा डौल काही त्यांना सांभाळता आला नाही. म्हणूनच आयुष्याच्या संध्याकाळी त्याच्या वाट्याला वेदना सोडून काहीच आलं नाही. पण तो शेवटपर्यंत वास्तव लिहीत राहिला, वेड्यासारखं बोलत राहिला. नीम के पत्ते कडवे होते है, मगर खून तो साफ करते है... मंटोचं हे तत्वज्ञान त्यावेळी कुणालाच समजलं नाही. पण तो त्याच साठी जगला आणि मेला. 

मंटोचं आयुष्य हे भारत-पाक फाळणीसारखंच आहे. भारतात सुखवस्तू, मानमरातब आणि समृद्ध आयुष्य तो जगला. फाळणीनंतर तो पाकिस्तानात गेला आणि त्याची फरपट सुरू झाली. 'मी असं लिहीन की तुम्हाला कधी उपाशी राहावं लागणार नाही,' असं जेवढ्या आत्मविश्वासानं तो पत्नी सफियाला सांगतो, तेवढ्याच आत्मविश्वासानं ती त्याला जमिनीवर आणते. ती म्हणते, 'तुम्हारी यहीं अफसानो की वजह से कहीं हमे भुखा ना रहना पडे...' पुढे घडलंही तसंच. अश्लील कथालेखक म्हणून आरोप झाले. खटल्यांना तोंड द्यावे लागले. कारावास भोगावा लागला. लिखाणला प्रसिद्धी मिळणं बंद झालं. पैशांचा ओघ थांबला, संसाराची आबाळ झाली. या काळात पत्नी आणि दारूनं त्याला साथ दिली. पण शेवटी व्यसनानं त्याला नैराश्यकडं नेलं. एका भणंगाच्या वाट्याला जसा अंत यावा, तसाच करुण अंत मंटोच्या वाट्याला आला. उणंपुरं 42 वर्षांचं आयुष्य तो जगला आणि गेला. हे त्याचं लौकिक आयुष्य होतं. पण तो पारलौकिक आहे. आजही तो भेटतो, बोलतो ते त्याच्या साहित्यातून, कथांमधून. कालही तो भेटला. नंदिता दासने या अवलियाला पडद्यावर आणलाय...

मंटो हा दीड-पावणे दोन तासांच्या कथेत मावणारा नाही. तरीही नंदिताने प्रयत्न केलाय. मंटोच्या साहित्याची पेरणी करून त्याचं आयुष्य तिने रुपेरी पडद्यावर चितारलंय. याबद्दल तिचं कौतुकचं. पण ज्यांनी मंटो वाचला आहे, त्यांना हा सिनेमा फार समाधान देत नाही. तिनं मंटो मांडताना त्याच्या पाच कथांचा आधार घेतलाय. त्यातही खोल दो, थंडा गोश्त आणि टोबा टेक सिंग या कथांचं चित्ररूप तिनं दाखवलंय. बाकी कथांचा वापर फोडणीवजा आहे. इथं मंटोला ओळखणाऱ्या रसिकांचा अपेक्षाभंग होतो. त्याच्या 'बू' या सुंदरकथेला का चित्ररूप दिलं नाही, असं वाटत राहतं. पण ज्यांना मंटो माहीतच नाही, त्यांना त्याची ओळख मात्र नक्की होईल. तसंच सिनेमा पाहून बाहेर पडल्यावर त्याचं साहित्य वाचण्याची प्रबळ इच्छा देखील मनात दाटेल, यात शंका नाही. सिनेमा म्हणून नंदिताचा प्रयत्न खूप छान आहे. पण सिनेमाची अपुरी लांबी रसभंग करते.

प्रसंगांची रेलचेल खूप आहे. पण वेळ कमी. त्यामुळं सिनेमा शेवटाकडे पळत सुटल्यासारखा वाटत राहतो. निर्मिती मूल्याच्या स्तरावर मात्र सिनेमाला तिनं चांगली उंची दिली आहे. स्वातंत्र्यपूर्व भारत, त्यानंतरची फाळणी,  भोवताल, त्यावेळच्या वेष-केशभूषा सगळं साजेसं आहे. ते वातावरण आपल्याला मंटोजवळ घेऊन जातं, तर नवाजुद्दीन मंटोला आपल्याजवळ घेऊन येतो. नवाजबरोबरच सिनेमामधे कलरटोनचीही प्रमुख भूमिका आहे. या सेपिया टोनने मंटोचा भोवताल आणि  चाळीसच्या दशकातील काळ सिनेमाभर ताजा ठेवला आहे. अभिनय तर सिनेमाचं खरं बलस्थान आहे. नवाजने रुपेरी कथेचा हा रंगतदार कॅन्व्हास व्यापून टाकला आहे. मंटोची पत्नी म्हणून रसिका दुग्गल आणि त्याची मैत्रीण इस्मत चुगताई म्हणून राजसी देशपांडे या त्यांच्या भूमिका खरोखर जगल्या आहेत. परेश रावल, नीरज कबी, गुरुदास मान, दिव्या दत्ता यांच्या भूमिका छोट्या आहेत. पण मंटोच्या या चरित्रपटाला ते दिमाख देऊन जातात. क्लासिक पार्श्वसंगीत ही पण एक जमेची बाजू. एकूणच काय तर मंटोच्या आयुष्यातलं भग्न वास्तव ज्यांना समजून घ्यायचंय, त्यांनी नक्कीच सिनेमा पाहावा. कलात्मक चित्रपटाचा अनुभव नक्की मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com