धोके...आताचे, उद्याचे!

धोके...आताचे, उद्याचे!

डिजिटल युगात आपण प्रवेश करून किमान दशक लोटलं आहे. एकापाठोपाठ एक व्यवस्था स्वयंचलित (ऑटोमेशन) होत आहेत. काही दशकांपूर्वी कार उत्पादनांमध्ये आलेलं ऑटोमेशन आता घरापर्यंत पोचलं आहे. ‘स्मार्ट लॉक’, ‘स्मार्ट टीव्ही’ इत्यादींपासून ते ‘स्मार्ट होम’पर्यंतचा हा प्रवास सुरू आहे. आजघडीला त्रुटी असल्या, तरी ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’च्या क्षेत्रात ज्या वेगानं प्रगती होत आहे ती पाहता, येत्या वीसेक वर्षांत घरांतल्या दैनंदिन गरजेच्या वस्तू-सेवांचंही ऑटोमेशन होईल, असं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर नजीकच्या भविष्यात डिजिटल/सायबर हल्ल्यांची तीव्रता, स्वरूप आणि त्यापासून होणारं नुकसान वाढत राहील, अशी चिन्हं आहेत.

सध्या जगभर उत्पात माजवणाऱ्या ‘वॉन्नाक्राय’ रॅन्समवेअरमुळं जागतिक अर्थव्यवस्थेचं कमीत कमी चार अब्ज डॉलर्सचं (सुमारे २५ हजार कोटी रूपये) नुकसान झालं आहे, असा अंदाज आहे. अर्थात हा प्राथमिक अंदाज आहे आणि तो रोज वाढतो आहे. आधीच्या २०१५च्या सायबर हल्ल्यात दीड अब्ज डॉलर्सचं नुकसान झालं होते. सायबर हल्ल्यामुळं संगणक व्यवस्था बंद ठेवाव्या लागतात. त्यामुळं उत्पादनक्षमता घटते. हल्ल्यानंतर व्यवस्था पुन्हा उभी करावी लागते. सुरक्षेवर अधिक खर्च करावा लागतो. या सर्व एकत्रित खर्चांमुळं नुकसान वाढत राहतं.

सायबर हल्ल्यांची क्षमता किती वाढू शकेल, या विषयावर १९८०च्या उत्तरार्धापासून चर्चा झडत आहेत. हॉलिवूडमध्ये हा विषय कित्येक चित्रपटांमधून १९९०च्या उत्तरार्धात हाताळला गेला आहे. १९९५च्या ‘द नेट’ चित्रपटात सॅंड्रा बुलकनं ओळख ‘चोरीला’ गेलेल्या तरुणीची भूमिका केली आहे. ओळख चोरीला जाणे हा विषय १९९५मध्ये अशक्‍य वाटत होता; मात्र आज २०१७मध्ये आपल्या आसपासही अशा घटना घडताना दिसत आहेत. सायबर सुरक्षा क्षेत्रात काम करणाऱया तज्ज्ञांनी येत्या काळात संगणक व्हायरसमध्ये अधिकाधिक बदल होत जातील आणि त्यामध्ये दहशतवादी संघटनाही शिरतील, असा इशारा दिला आहे.

भविष्यातले व्हायरस हल्ले फक्त संगणकापुरता परिणाम घडवणार नाहीत, तर ते मानवी आयुष्यापर्यंत पोचतील, असा इशारा ‘आयबीएम सिक्‍युरिटी इंटेलिजन्स’नं २००५मध्ये दिला होता. मोबाईल फोन, मायक्रोव्हेव अशा इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांपर्यंत व्हायरस पोचतील, असं अवघ्या बारा वर्षांपूर्वी वाटलं होतं. या बारा वर्षांमध्ये तंत्रज्ञान झपाट्यानं बदललं आहे आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर सर्व क्षेत्रात वाढू लागला आहे. येत्या दोन-चार वर्षांत ’नॅनोबोट्‌स’ मानवी आयुष्यात प्रत्यक्ष प्रवेश करतील. वैद्यकीयदृष्ट्या हा बदल मानवी आयुष्य सुखकारक बनविण्यासाठी असला, तरी सायबर सुरक्षेच्या अंगानं हे नवं आव्हान असणार आहे. शरीरात असणारे नॅनोबोट्‌स उद्या व्हायरस हल्ल्यात सापडले, तर जीव धोक्‍यात येऊ शकणार आहे.

सायबर सुरक्षा क्षेत्रात काम करणाऱ्या रोमन यम्पोलस्की नावाच्या प्राध्यापकानं नुकतीच ‘हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू’मध्ये भविष्यातल्या सायबर हल्ल्यांची झलक मांडली आहे. रोमन यांच्या म्हणण्यानुसार, येत्या काळात आर्टिफिशिअल इंटेलिजन्समध्ये सायबर हल्ल्यांचं सत्र सुरू होण्याचा धोका आहे आणि त्यामध्ये राज्यव्यवस्थादेखील सामील असतील. ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या उदयानंतर काय समस्या येऊ शकतील, यावर बरेच बोललं गेलं आहे. मात्र, जाणीवपूर्वक डिझाईनमध्ये त्रुटी ठेवल्या अथवा हॅकिंग झाले, तर काय होऊ शकेल, यावर अद्याप विचारच झालेला नाही,’ असं त्यांचं मत आहे. चार पैसे चोरीला जाण्यानं होणाऱ्या नुकसानापेक्षा भविष्यातलं नुकसान फार मोठं असेल आणि ते थेट मानवी जीवनावर परिणाम करेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

डिजिटल युगापासून दूर पळणं हा यावर मार्ग नाही. गुन्हेगारी मानसिकता डिजिटल युगापूर्वी होती आणि डिजिटल युगातही असणार आहे. प्रश्न आहे तो आपण डिजिटल युगातल्या सुरक्षिततेची सातत्यानं तपासणी करतो का हा! सध्या तरी याचं उत्तर नकारार्थी आहे. सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेतली नाही, तर आजच्या ‘वॉन्नाक्राय’ची जागा उद्या अन्य कुठला तरी व्हायरस घेईल आणि आपल्याला सायबर हल्ल्यात सहजी नामोहरम करेल...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com