काटेरी सिंहासनाचा सोनेरी मुकुट

Mohammad bin Salman
Mohammad bin Salman

मध्य पूर्वेतील वातावरण या दिवसांमध्ये प्रखर उष्णतेचे असते पण राजकीय उलथापालथीने अधिकच त्यात भर पडत चालली आहे. कतार नसबंदीचा अध्याय संपत नाही तोपर्यंतच सौदी अरेबियाच्या राजघराण्यातील सत्तापालटाने ऐतिहासिक वळण घेतले आहे. सौदी अरेबियाचे सध्याचे राजे सलमान यांनी आपल्या पुतण्याला म्हणजेच क्राऊन प्रिन्स महमंद बिन नायेफ यांना बाजूला करत मुलाला सिंहासनावर बसवण्याचा निर्णय घेतला. जगातील सर्वांत तरुण संरक्षणमंत्री व उपयुवराज असलेल्या 31 वर्षीय महमंद बिन सलमान यांना क्राऊन प्रिन्स व उपपंतप्रधानाची जबाबदारी देण्यात आली आहे. 2015 मध्ये क्राऊन प्रिन्स म्हणून नेमलेल्या महंमद बिन नायेफ यांच्याकडील अंतर्गत मंत्रालयासह सर्व अधिकार काढून घेत पदमुक्त केले आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून सत्तापालटाचे संकेत मिळत होते आणि नेमके तसेच घडले आहे. 

महमंद बिन सलमान यांनी 2009 मध्ये सध्याचे राजे सलमान यांचे विशेष सल्लागार म्हणुन राजकीय कारर्किर्दीचा प्रारंभ केला. त्यावेळी रियाधचे गव्हर्नरही होते. 2013 मध्ये क्राऊन प्रिन्स न्यायालयाचे प्रमुख म्हणून नेमण्यात आले होते. 2015 मध्ये त्यांच्याकडे संरक्षणमंत्री व डेप्युटी क्राऊन प्रिन्स पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यांनी आपले शिक्षण सौदीमधील किंग सौद विद्यापीठातून केले असून कायद्याची पदवी प्राप्त केली आहे. सलमान यांच्या तिसरया पत्नीचा महंमद मुलगा आहे. त्यांच्या निवडीने सौदीतील तरुणाईला प्रेरणा मिळेल अशी आशा आहे. 

नायेफ यांची दमदार कामगिरी
नायेफ यांचा येमेनमधील कारवाई तसेच इराणविरोधातील संघर्षाच्या विरोधात होते. कतारशीही त्यांचे सलोख्याचे संबंध होते. सौदीतील दहशतवादाचे कंबरडे मोडण्याचे श्रेय नायेफ यांनाच जाते. सौदीतील अल-कायदा व आयसिसचा नायेफ यांनी जाळे उध्वस्त करून टाकले आहे. त्यामुळे नायेफ त्यांच्या रडारवर होते. त्यांच्यावर तब्बल चारवेळा प्राणघातक हल्ल्याचाही प्रयत्न झाला. सौदी अरेबियाच्या अंतर्गत सुरक्षेच्या बाबतीत विचार करायचा झाल्यास नायेफ यांना चांगली जाण होती. महमंद बिन नायेफ यांचे अमेरिकेशीही संबंध चांगले होते पण सलमान यांनी बाजी मारली आहे.
 
सिंहासनासाठी मोर्चेबांधणी 
सौदी राजघराण्यातील सर्वांत शक्तीशाली असणारया महमंद बिन सलमान यांनी नायेफ यांना सिंहासनासाठी थेटपणे आव्हान कधीच दिले नाही, पण गनिमी काव्याने त्यांची पद्धतीशीरपणे मोर्चेबांधणी गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती. त्याला हातभार अमेरिकेकडूनही लागला आहे. महमंद बिन सलमान यांनी मार्च महिन्यामध्ये ट्रम्प यांच्या सौदी दौरयापूर्वी अमेरिकेचा दौरा केला होता. काही महिन्यांपूर्वी महमंद बिन सलमान यांनी राष्ट्रीय सुरक्षा केंद्राची स्थापना केली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदाची जबाबदारी महमंद बिन सालीह अलघफैली यांच्याकडे देण्यात आली आहे. ते महमंद बिन सलमान यांच्या इनर सर्कलमधील समजले जातात. त्याचबरोबर प्रिन्स अब्दुलअझीझ बिन सलमान व खालीद अल फलीह या दोन भावांचाही मंत्रीमंडळात समावेश करत नायेफ यांना बाजुला करण्यात येत असल्याचे संकेत दिले होते. ट्रम्प यांचा सौदी दौराही यशस्वीपणे आयोजित करून महमंद बिन सलमान यांनी जागतिक माध्यमांचे लक्ष वेधले होते. ट्रम्प प्रशासनाचा महमंद बिन सलमान यांना वरदहस्त आहे आणि त्याला कारण इराण आहे.   

प्रचंड आशा व अनामिक भीती
येमेनमधील युद्ध, इराविरोधातील सुप्त संघर्ष व कतारविरोधातील राजनैतिक कारवाईमध्ये महमंद बिन सलमान यांनी आपली भूमिका रेठताना देशाच्या सीमा अशांत केल्या आहेत. जगातील सर्वांत तरुण संरक्षणमंत्री म्हणून 2015 मध्ये पदावर विराजमान झाल्यानंतर अवघ्या दोनच महिन्यात त्यांनी येमेनमध्ये हौथी बंडखोरांविरोधात सैन्य घुसवले होते व त्यासाठी इस्लामिक देशांची आघाडी स्थापन केली आहे. या मोहिमेत हाती काहीच लागलेले नाही पण सौदीच्या अर्थव्यवस्थेला त्याचा जबर फटका बसला आहे. पण असे असले तरी सौदी अरेबियासारख्या जहाल इस्लामिक देशाला इतिहासात प्रथमच उदारतमतवादी, दुरदृष्टीचा, उमदा व भविष्याबाबत प्रचंड आशावादी असलेला कणखर नेता मिळाला आहे हे नाकारून चालणार नाही. आगामी किमान चार ते पाच दशके सौदीचा कारभार वयाची अवघी तिशी पार केलेल्या महमंद बिन सलमान यांच्याकडे असणार आहे. त्यामुळे देशाच्या भवितव्याबाबत जे काही प्रतिकुल व अनुकुल परिणाम होतील त्याचे उत्तरदायित्व त्यांच्याकडे असणार आहे. देशातील 30 टक्के लोकसंख्या त्यांच्याच वयाची म्हणजेच तिशीतील आहे. यामुळे या सळसळत्या रक्ताला संधी उपलब्ध करून देणे व त्यांना कार्यप्रवण करणे ही सर्वांत मोठी प्राथमिकता त्यांच्यासमोर आहे. गेल्या दोन वर्षात त्यांनी आपल्या नेतृत्वाची झलक दाखविली आहे पण एकांगी आक्रमकतेला मुरड घालावी लागणार आहे.  

आव्हानांचा डोंगर 
केवळ खनिज तेलाच्या महसुलावर अवलंबुन असलेल्या अर्थव्यवस्थेमध्ये वैविध्यता आणण्यासाठी सौदी सरकारने कंबर कसली आहे. त्यानुसार व्हिजन 2030 चे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. जीवनावश्यक वस्तुवरील सबसिडी कमी करण्यात आली आहे. त्याचबरोबर विविध करांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सौदी अरामको कंपनीचे खासगीकरण करण्यात येणार आहे. वित्तीय तुट कमी करून बेरोजगारी कमी करणे हे सौदीसमोर आव्हान आहे. महिलांना मुख्य प्रवाहात आणणे हे सुद्धा तितकेच अगत्याचे आहे त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागले आहे. आधुनिक सौदीसाठी ते अत्यावश्यक आहे. त्याचबरोबर मध्य पूर्वेत शांतता व स्थैर्य नांदण्यासाठी सर्वसमावेशक भूमिका महमंद बिन सलमान यांना घ्यावी लागणार आहे. सौदी राज घराण्यातील व मध्यपूर्वेतील शांतता सध्याची स्फोटक परिस्थिती पाहता अत्यावश्यक आहे. त्यामुळे काटेरी सिंहासनाचा सोनेरी मुकुट आहे म्हटल तर वावग ठरणार नाही.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com