महाभारत आणि गीता

महाभारत आणि गीता

संत नामदेव अध्यासनाचे माजी प्रमुख डॉ. अशोक कामत यांच्या गुरूकुल संस्थेने संस्कृत पंडित डॉ. शं. भा. चांदेकर यांचा सत्कार आयोजित केला आणि 'सकाळ'च्या संपादकांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले. महाभारत हे कार्यक्रमाचे मुख्य सूत्र होते आणि मोरवंचीकर यांच्या भीष्म या पुस्तकाबाबतचे काही अभ्यासकांचे निबंधही सादर होणार होते. अन्य कामामुळे संपादकांना जाता आले नाही आणि त्यामुळे त्यांनी मला कार्यक्रमाला जायला सांगितले. मी हो म्हटले पण कामत यांनी मला फोन करून 'इतर सर्व आमंत्रितांकडून भाषण लेखी मागितले आहे, तुम्हाला देता येईल का ?' अशी विचारणा केली. इतर सर्व जण अभ्यासक होते आणि सटरफटर वाचनाशिवाय माझ्याकडे काहीच नव्हते. मी भीतभीत काही मजकूर लिहून काढला आणि कार्यक्रमात तो वाचून दाखवला. डॉ. कामत यांनी त्यांना तो आवडल्याचे सांगितले. (मला बरं वाटावं म्हणून ते वरवर तसं म्हणाले नसतील, अशी मी माझी समजूत करून घेतली). जस्ट तुम्हाला ते टिपण शेअर करतोय... 

आणि गीता -- 2017 मधील उपयुक्तता, समर्पकता 
नमस्कार, योगाबाबत गीतेमध्ये अनेक संदर्भ आहेत, मात्र आज पंडितांच्या, ऋषितुल्य व्यक्तींच्या सहवासाचा योग आला तो आमच्या मुख्य संपादकांच्या अनुपलब्धतेने. त्यांचा मी ऋणी. या विषयांमध्ये प्रचंड व्यासंग असलेल्यांच्या या मेळ्याशी मी सुसंगत नाही. पण पत्रकार या नात्यानं प्रत्येक विषयाचं थोडंथोडं वाचन होतं, त्या धीरावर यायला तयार झालो. तरीही मोठ्यांच्या मेळाव्यात लहान मुलगा मोठेपणाचा आव आणून बसतो आणि त्याला सगळे स्वीकारतात, तसं मलाही स्वीकारावं... 

भरतखंडातील वैदिक धर्मातील तत्त्वांना बौद्ध धर्माची तत्त्वं आव्हान देऊ लागली, जनमानसाकडून त्यांचा स्वीकार होऊ लागला तेव्हा वैदिक धर्माची पुन्हा नव्याने मांडणी करण्याची गरज वैदिक धर्मियांना वाटू लागली. महाभारतातील गीतेच्या रूपाने ही मांडणी महर्षि व्यासांनी केली. इ. स. पाचशेच्या आसपास झालेल्या या मांडणीला आता तब्बल दीड हजार वर्षे लोटली आहेत आणि या मांडणीचीही पुन्हा नव्याने मांडणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. म्हणजेच महासागरालाही लज्जा उत्पन्न करील, अशी महर्षि व्यासांसारखी प्रज्ञा-प्रतिभा असलेल्या आधुनिक महाकवीची आणि त्याच्या ओजस्वी नवरचनेची वाट भारतवर्षच नव्हे तर संपूर्ण जग पाहाते आहे. 

उपलब्ध पुराव्यांनुसार वैदिक धर्माचा पाया हा वेदप्रामाण्यावर आधारित होता, मात्र त्यानंतर गौतम बुद्धांनी त्यातील नैतिक तत्त्वं घेताना वेदप्रामाण्य नाकारलं. बौद्ध धर्म हा बहुजनांना आचरायला सुलभ होता, त्यानं समानतेचं, न्यायाचं तत्त्व अधिक ठसठशीतपणे अंगीकारलेले होतं, त्यामुळं त्या धर्माच्या अनुयायांमध्ये वाढ होत गेली. वैदिक धर्मियांना हे आव्हान वाटलं आणि आपल्या तत्त्वांची पुन्हा नव्यानं मांडणी करण्याची गरज भासल्यानं गीतेचा जन्म झाला. गीता आणि ती ज्या आर्ष महाकाव्याचा भाग आहे, त्या महाभारतानं गेली दीड हजार वर्षे भारतवर्षाचंच नव्हे तर या पृथ्वीगोलावरील अनेक देशोदेशींच्या जिज्ञासूंचं सांस्कृतिक, भावनिक, बौद्धिक पोषण केलं. वर्षे, दशके, शतके आली आणि गेली. या काळात मानवी संस्कृतीनं अनेकदा काती टाकल्या, अनेक वळणं घेतली, क्रांती-उत्क्रांतीच्या अनेक पायऱ्या चढल्या, नैतिकता-मूल्ये यांची परिमाणं-मिती बदलत गेली, जगण्यासाठी कल्पनाही न करता येऊ शकणारी तीव्र स्पर्धा सुरू झाली, आधिभौतिकतेकडे नको इतका झुकाव होऊ लागला, चंगळवाद फोफावला, ताणतणावांत कमालीची वाढ झाली, जीवनस्वास्थ्य हरपलं. मानवी जीवनात असे प्रचंड बदल होत असतानाच्या प्रत्येक टप्प्यावर गीतातत्त्वज्ञान खंबीरपणं उभं राहिलं. एखाद्या दीपस्तंभाप्रमाणं मानवी संस्कृतीच्या प्रवाहाला अन प्रवासाला दिशा दाखवत राहिलं. प्रत्येक बदलत्या काळातही उपयोगी पडेल, अशी ताकद या तत्त्वज्ञानात होती. 

गीता ज्या महाभारताचा भाग आहे, त्या महाभारतामध्ये नेमकं काय आहे, या प्रश्‍नापेक्षा काय नाही, हा प्रश्‍न अनेक शतके विचारला जातो आहे आणि इथं जमलेल्या अभ्यासूंना तर तो अजिबात नवीन नाही. सूर्याखाली जे काही आहे, ते सगळं महाभारतात आहे, असं म्हटलं जातं. महाभारताच्या जन्मापासून ते आतापर्यंतच्या दीड हजार वर्षांतील विविध मानवी समूहांना ते जवळचं वाटत आलं आहे. महाभारतातील कथा, पात्रं, त्यांच्या भावभावना यांच्याशी आपला जवळचा संबंध असल्याची जाणीव मानवाला सातत्याने होत आली. काम-क्रोध-मद-मोह-मत्सरादी मानवी भाव, भावना, सुष्ट-दुष्ट वृत्ती, प्रवृत्ती या सर्वकालिन मानवसमूहांत कायमस्वरूपी मुक्कामाला आलेल्या असतात. यांच मानवी स्वभाववैशिष्ट्यांचे दर्शन महाभारतात दिसत असल्यानं आपल्याच समाजजीवनाचा आरसा पाहात असल्याची जाणीव माणसाला होत होती. त्यामुळं महाभारत ही आपल्याच काळातली कथा असल्याचं विविध टप्प्यांवरील मनुष्यसमूहाला वाटत होतं. रामायण हे केवळ आदर्शांची उंचउंच शिखरं दाखवणारं तर महाभारत हे आपल्यातीलच भाव प्रकट करणारं. रामायणातील आदर्शांची शिखरं उल्लंघणं केवळ रामासारख्या अवतारपुरूषालाच जमेल असं वाटल्यानं त्याच्याशी, त्या महाकाव्याप्रती आदर, श्रद्धा असली तरी जवळिकीचा, सामिलकीचा भाव नव्हता. उलट महाभारताप्रती जवळिकीचा, सामिलकीचा भाव येत गेला. महाभारत वाचताना कोणाच्याही मनःपटलावर सद्यस्थितीचं 70 एमएम दर्शन उभे राहाते. आकाशाएवढ्या माणसांनी जमिनीवर घडविलेला इतिहास अशी रामायणाची कथा तर जमिनीवरच्या माणसांनी आकाशाएवढा केलेला पराक्रम अशी महाभारताची कथा. सर्वांवर छाया धरणाऱ्या वटवृक्षासारखं असलेलं भीष्माचं व्यक्तित्व होतं. एव्हरेस्टच्या किंवा कांचनजंगाच्या पायथ्याशी उभं राहून शिखराकडं पाहिलं की कसं भव्य वाटतं आणि आपण किती लहान आहोत याची जशी जाणीव होते तसंच भीष्मांच्या व्यक्तित्वाकडं पाहिल्यावर वाटतं..., त्यांचा त्याग, त्यांचा पराक्रम, त्यांची हस्तिनापूरच्या गादीप्रती असलेली अविचल निष्ठा, उत्तरायणापर्यंत त्यांनी स्वइच्छेनं टिकवलेलं आपलं शरपंजरी अस्तित्त्व सारच अलौकिक. युधिष्ठिराचं सत्यव्रतीत्वाचं व्रत, भीमाचं बळ, अर्जुनाचा अचूकपणा, दुर्यौधनाचा क्रौर्य-कपटी-कामीपणा, अंध धृतराष्ट्राचं तेवढंच आंधळं पुत्रप्रेम, द्रौपदीचं सौंदर्य अन इज्जतीवर उठलेल्यांचा प्राणपणानं केलेला प्रतिकार-प्रतिशोध, कुंतीचं वात्सल्य, द्रौणाचं गुरूत्व, पराक्रमी-तेजस्वी कर्णाचं औदार्य-दातृत्व... मानवी गुणावगुणांचं, प्रतिभा-शौर्याचं मनोज्ञ दर्शन घडत जातं. काही गुणांचं अनुकरण करावसं वाटतं अन काही अवगुण आपल्यात असतील तर ते कसे दूर जातील, याचा विचार करावासा वाटतो. या साऱ्यांहून वेगळं, अनोखं व्यक्तिमत्त्व आहे ते श्रीकृष्णाचं. भागवतात लीला करणारा बाळकृष्ण महाभारतात युवक होऊन आपल्याला भेटतो. भारतातल्या या कृष्णाचं वर्णन ज्येष्ठ विवेचनकार राम शेवाळकर 'ऐतिहासिक कृष्ण' असं करतात. हा कृष्ण कर्ता क्वचितच आहे आणि बहुतांशी करविता आहे. भारतातील सूत्रं तो हलवतो. तो त्रिकालज्ञानी आहे. त्याच्या केवळ स्मितामध्ये अनेक अर्थ दडलेले असतात. एखाददुसरा अपवाद वगळता तो संतापत नाही, सर्व परिस्थितीला शांतपणानं सामोरा जातो. आपल्या शंभर मुलांच्या मृत्यूला कारणीभूत कृष्ण आहे, महाभारताचं युद्ध त्यानं घडवून आणलं, असं गांधारीला वाटतं आणि त्यातच युद्ध संपल्यावर तिच्यासमोर कृष्ण येतो. संतापानं ती शाप देते, आजपासून छत्तीस वर्षांनी तू मरण पावशील. गांधारीचा अखेरचा शापही तो तितक्‍याच तटस्थतेनं स्वीकारतो. पांडवांचा सखा म्हणून त्याची ओळख भारताच्या युद्धापर्यंत राहाते, पण युद्धात गीता सांगताना त्याचं अनंत रूप प्रकट होतं आणि तो भगवन आहे याची जाणीव होते. तो योगेश्‍वर कृष्ण होतो. मला स्वतःला कृष्णाच्या बाललीलांमध्ये फारसा रस नाही, मला भावतो तो तत्वज्ञ योगेश्‍वर कृष्ण. महाभारतातल्या सर्व व्यक्तिरेखा आपण केवळ स्तिमित होऊन पाहात राहतो, निःशब्द होतो. 

आजचं महत्त्व
आणि गीतेचं आजचं 2017 मधलं महत्त्व नेमकं काय आहे ? केवळ प्राचीन, देखणी साहित्यकृती की संग्रहालय-ग्रंथालयातील शोभा ?  
रचलं गेलं त्याला आता दीड हजार वर्षे लोटली आहेत. तसं पाहिलं तर त्यात काय आहे ? एका राजघराण्यातली एक कथा. इस्टेटीसाठी भावाभावांमध्ये होणारी भांडणं आपण नेहमीच आजूबाजूला पाहातो. तशीच भांडणं त्यावेळी झाली. त्यावेळी राजेशाही पद्धत असल्यानं ती राज्याच्या वाटणीवरून झाली एवढचं. आताचं युद्ध कोर्टात होतं, पण तेव्हा प्रत्यक्ष हाणामारीचं युद्ध खेळण्याची पद्धत असल्यानं ते तसं झालं. त्यात एका बाजूचा विजय झाला तर दुसऱ्याचा पराजय. संपली कथा. मग महाभारताची एवढी चर्चा का ? त्याला एवढं महत्त्व का ? 

इस्टेटीच्या वादाची कथा असूनही महाभारताला महत्त्व असण्याची अनेक कारणं आहेत. त्यातील पहिलं कारण सुमारे तब्बल दीड-दोन हजार वर्षांपूर्वीच्या भारतीय समाजजीवनाचा कागदोपत्री पुरावाच महाभारतानं आपल्याला मिळतो. महाभारत ही काल्पनिक कथा असो वा प्रत्यक्ष घडलेली असो, त्यामुळं त्यात काहीच फरक पडत नाही. ती काल्पनिक असली तरी त्या वेळच्या समाजजीवनाचं दर्शन त्यातून घडतं, एवढं मात्र निर्विवाद. तत्कालिन रितीरीवाज अन त्यातील बारकावे, सभाशास्त्र, खाद्यांचे-शस्त्रांचे-वस्त्रप्रावरणांचे प्रकार आदींमधून संस्कृतीची संपन्नता दिसते. आपला इतिहास इतका संपन्न, वैविध्यपूर्ण, समृद्ध होता, ही जाणीव आपल्याला अभिमानी करतेच, पण वर्तमानकाळात अधिक संपन्नरित्या जगण्यासाठीही प्रवृत्त करते. 

आजही महत्त्व असण्याचं दुसरं कारण त्यातली गीता आहे... 
गेली दीड हजारांवर वर्षे मानवाला गीतातत्त्व शिकवण देत आले आहे, कर्मयोग, ज्ञानयोग सांगते आहे. जेव्हाजेव्हा संभ्रमित, किंकर्तव्यमूढ झालेल्या माणसाने गीतामाऊलीच्या चरणी आश्रय घेतला तेव्हातेव्हा गीतामाऊलीने त्याला पोटाशी धरलं आहे आणि त्याला कर्तव्याच्या मार्गावर आणलं आहे. दुसऱ्या शब्दांत जेव्हाजेव्हा माणसाला अर्जुनावस्था येते तेव्हातेव्हा गीता त्याला मार्गदर्शन करते, असं म्हटलं जातं. 2017 मध्ये जगणाऱ्या माणसाला गीतेची अर्जुनाइतकीच नव्हे अर्जुनापेक्षा अधिक तीव्र गरज भासते आहे. आधुनिक जगातील स्पर्धा तीव्र झाली आहे. कार्यालयीन, कौटुंबिक ताणतणाव वाढतो आहे, त्यातून रक्तदाब म्हणजेच बीपी, मधुमेह म्हणजे डायबेटिस बळावू लागला आहे. अशा परिस्थितीत मनःस्वास्थ्याची त्याला आवश्‍यकता जाणवते आहे. गीतातत्त्व समजावून त्याचा अवलंब केला तर आधुनिक माणसाला हे रोग कधीच शिवू शकणार नाहीत. द्वैत का अद्वैत, आत्मा अमर असतो का अस्तित्त्वातच नसतो, पुनर्जन्म खरा की खोटा यांसारख्या वाद होऊ शकणाऱ्या बाबी सोडून दिल्या आणि गीतेतील केवळ तीन-चार तत्त्वे जरी 2017 मधील माणसाने लक्षात ठेवली तरी त्याचे जीवन सुखकर होईल किंवा आध्यात्मिक भाषेत हा भवसागर तरून जाता येईल. 

पहिली -- सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जयोजया... सुख येवो वा दुःख, लाभ होवो वा हानी होवो, तुमचे चित्त अजिबात विचलित होता कामा नये. दुःखानंतर हमखास सुख येणार आहे आणि सुखानंतर येणारं दुःखही अटळ आहे. धिस विल अल्सो चेंज. अनित्य. कोणतीही गोष्ट नित्य नाही, मग या अनित्य सुखदुःखाने विचलित होणं, बेभान आनंदी किंवा दुःखी होणं चुकीचंच. दुःखाच्या क्षणांमध्ये या श्‍लोकाचं स्मरण केलं तर दुःख क्षणात नाहिसं होतं, हा अनेकांचा अनुभव असेल. 

दुसर तत्त्व प्रसिद्ध आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन... दिलेले कर्म कर, फळाची अपेक्षा करू नको. याचा अर्थ अनेकांना समजत नाही. मी कर्म करतो तो फळासाठीच. फळ मिळणार नसेल तर का कर्म करू ? फळाच्या अपेक्षेनेच माझ्याकडनं कर्म होते, असं म्हटलं जातं. 

कर्म प्रामाणिकपणे केलं आणि फळाची अपेक्षा धरली नाही तर फळ मिळालं नाही किंवा अपेक्षेप्रमाणे झालं नाही तर दुःख पदरी येत नाही. मुलाला वाढवणं हे कर्तव्य, पण त्याच्याकडनं अपेक्षा ठेवल्या अन त्या पूर्ण झाल्या नाही तर दुःख येतं. अपेक्षाभंग झाला तर दुःख येतं. तसंच निकाल काहीही लागो, मी फक्त माझं काम चोख करण्याकडं लक्ष देणार, या वृत्तीनं फायदा होतो. निकाल काय लागेल, मी जे करतोय त्याचं फळ नीट मिळेल का, या विचारानं काम करताना अस्वस्थता येते, धडधड वाढते, हात कंप पावू लागतात. त्याचा कामाच्या दर्जावरही परिणाम होतो. पण काम करताना निकालाची चिंता नसेल तर काम अधिक नीटस, दर्जेदार होऊ शकते. ऑलिम्पिक खेळणारे कोरिया, चीन या देशांतील खेळाडू ज्या स्थितप्रज्ञतेनं खेळ खेळतात ते पाहून त्यांनी गीता वाचली असावी अशी शंका येते. वाचली नसली तरी ते गीता प्रत्यक्ष जगत असल्याचं वाटतं. एखादा तिरंदाज शांतपणानं नेम धरतो आणि अचूक नेम मारतो. तो काही गुणांनी मागं पडला तरी डगमगत नाही, शांतपणानं गुण मिळवत पुढं जातो, असं आपण पाहातो. 

तिसरं तत्त्व -- योग कर्मेषु कौशलम... श्रीकृष्णाच्या तोंडी असलेला हा श्‍लोक सर्वकाळात उपयोगी ठरणारा आहे. वर्षे, शतके, युगे लोटतील आणि पुन्हा येतील, पण या श्‍लोकातील तत्त्व कधीही कालबाह्य ठरणार नाही. तुमचं काम तुम्ही कौशल्यानं करा, म्हणजेच योग. योगासाठी ना पद्मासनाची गरज ना प्राणायामाची. ना अरण्य जवळ करण्याची आवश्‍यकता ना अंगाला राख फासण्याची. तुम्ही जिथं असाल तिथनच तुमचं काम तुम्ही प्रामाणिकपणानं करणं म्हणजे योग. काम निष्ठेनं करा, झोकून देऊन करा, मनस्वीपणं करा, तुम्ही आपोआप योगी व्हाल... आठवण येते ती सावता माळ्याची. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी... मला पंढरीला येण्याची गरज नाही, त्याच्या या अभंगात श्रीकृष्णाचीच शिकवण दिसते. 

झ्या मते, या तीन तत्त्वांमध्ये या जगात जगणाऱ्या माणसाच्या दृष्टीनं गीतेचं सार आलंय. ही तीन तत्त्वं त्यानं आपल्या जीवनात बाणवली तर त्याला कसलच दुःख राहणार नाही. तो आयुष्यभर आनंदी, समाधानी, सुखी, आत्मानंदात मग्न राहील, मात्र गीतेमधील सर्वच तत्त्वं सर्वच काळातल्या माणसानं मानलीच पाहिजेत, ती सर्वकाळात टिकलीच पाहिजेत, असा अट्टाहास करता कामा नये. त्यातील काही तत्त्वं आता कालबाह्य झाली असू शकतील नव्हे ती झालीही आहेत. मात्र त्यामुळे संपूर्ण गीताच बाजूला सारली तर ती मोठी घोडचूक ठरेल. मानवी मनाच्या भरण-पोषणासाठी, समतोल बुद्धीसाठी, मनःशांतीसाठी, समाधानासाठी गीता कायमच उपयोगी ठरेल. कितीही शतके उलटली तरी गीता अचल राहील. प्रसंगी ध्रुवही आपली जागा बदलेल आणि बदलतो, पण गीतातत्त्व अभंग राहील. 

गीतेतील कोणता भाग 2017 मधील माणसाला कालसुसंगत वाटत नाही ? त्याला कोणता भाग कालबाह्य वाटतो ? 'आत्मा अमर आहे आणि तो केवळ शरीर बदलतो', हे गीतेचं तत्त्व आहे. अर्वाचीन काळात आत्म्याच्या अस्तित्त्वावरच प्रश्‍नचिन्ह निर्माण करण्यात येते आहे. आत्मा ही शरीरापेक्षा वेगळी बाब आहे का नाही, यावर वाद होतात. निरीश्‍वरवादी, विज्ञानवादी, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील कार्यकर्ते तसेच आधुनिक शिक्षण घेणारे असे अनेकजण आत्म्याच्या अस्तित्त्वाला आव्हान देतात. 

गीता ही वर्णाश्रमधर्माचं समर्थन करते, असा आक्षेप घेण्यात येतो. 
अधर्माभिभवात्कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः 
स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः 
अर्थात, हे कृष्णा, अधर्माच्या प्रसारामुळे कुलस्त्रिया दूषित होतात. हे वार्ष्णेया, कुलस्त्रिया दूषित झाल्या म्हणजे वर्णावर्णाचे मिश्रण निर्माण होते. म्हणजेच वर्णसंकर होतो. 
संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च 
पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकक्रियाः 
अर्थात, वर्णसंकर हा कुलक्षय करणाऱ्यांना नरकाप्रत नेतो. कारण पिंडतर्पणादी क्रियांना पारखे झाल्यामुळे त्यांचे पितर अधोगतीला जातात. 
दोषैरेतैः कुलघ्नानां वर्णसंकरकारकैः 
उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्‍च शाश्‍वताः 
अर्थात, कुलक्षय करणाऱ्यांच्या ह्या वर्णसंकरकारक कृत्यांनी जातिधर्म व कुलधर्म उद्‌ध्वस्त केले जातात. 

या श्‍लोकांमुळे गीता ही वर्णाश्रम मानणारी आणि विषमतामूलक असल्याचा आरोप करण्यात येतो आणि तो जुनाही आहे. आता जाती आणि कुलधर्म यांच्या आताच्या काळातल्या व्याख्या आणि दीड हजार वर्षांपूर्वीच्या व्याख्या या एकच राहिल्या असतील का, हा प्रश्‍न आहे. जो जे काम करत असेल तो त्या वर्णाचा गणला गेला. प्रत्येकाला आपल्या वृत्तीप्रमाणं काम करण्याची परवानगी सुरवातीला होती. मात्र नंतर त्यात बदल होत गेले आणि जातिव्यवस्था कडक, ताठर होत गेली. तरीही तशी वर्णाश्रमव्यवस्था चुकीची असल्याचे जाणवत गेल्यानंतर ती सैल होत गेली. त्यामुळं गीतेमध्ये त्या काळच्या परिस्थितीनुसार आलेले हे उल्लेख आहेत, हे भान ठेवावे लागते. आता ते कालबाह्य ठरले असल्याने ते त्याज्य ठरवता येतील, पण त्यामुळं संपूर्ण गीताच त्याज्य ठरवणे अव्यवहार्य ठरेल. गीतेतील इतर सौंदर्यस्थळे, मानवी जीवनाला उपकारक असलेली इतर तत्त्वं यांचा अंगीकार 2017 च्या मानवाने करणे योग्य ठरते. 

झ्यात तू आणि तुझ्यात मी आहे, या विश्‍वाच्या चराचरात मी आहे... ही तत्त्वं खूपच उदात्त वाटतात. याचाच अर्थ विश्‍वातील प्रत्येक प्राणिमात्रांतील चैतन्यतत्त्व एकच आहे. आपणच सर्वांमध्ये आहोत हा विचार केला तर कोणाबद्दल आकस, राग, द्वैष, मत्सर वाटणारच नाही. आधुनिक माणसाला जी तत्त्वं कालबाह्य वाटतात, त्याबद्दलचा वाद सोडून देऊन चिरकाल टिकणारी तत्त्वं अंगिकारली तर मानवाचं कल्याणच होईल. म्हणूनच गीता हा मानवी जीवनातील अंधार घालवणारा, आधार देणारा, समतोल विचारबुद्धी शिकवणारा ज्ञानदीप आहे, हे निस्संशय. 

या त्रिकालाबाधित तत्त्वांची आजच्या काळानुरूप फेरमांडणी करणं आवश्‍यक वाटतं. आजच्या पिढीला समजणाऱ्या भाषेत आणि उमजणाऱ्या उदाहरणांनी ही तत्त्व पटवली गेली पाहिजेत. त्यासाठी या तत्त्वांचं फेरलेखन करणाऱ्या नवव्यासांची आज गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com