कोरेगाव भीमा...गाव तसं चांगलं...

koregaon bhima
koregaon bhima

कोरेगाव भीमा गाव पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील. पुणे-नगर महामार्ग गावातून जातो. गावची लोकसंख्या साधारणतः दहा हजारच्या आसपास. रस्त्याच्या कडेला असल्यामुळे हे गाव अनेकांना माहितीचे. चांगल्या अर्थाने माहितीचे. अनेकजण पोटाची खळगी भरण्यासाठी येथे येतात. गाव तसं चांगलं; पण या आठवड्यात इतरांनी वेशीला टांगलं, असं म्हणायची वेळ आली आहे.

ब्रिटिश आणि दुसरा बाजीराव पेशवा यांच्यात कोरेगाव भीमा येथे झालेल्या ऐतिहासिक लढाईत पेशव्यांचा पराभव झाला. या विजयाची साक्ष म्हणून ब्रिटिशांनी कोरेगाव भीमा येथे "विजयस्तंभ' उभारला आहे. या घटनेला यंदा दोनशे वर्षे पूर्ण झाली. पेरणेफाटा (ता. हवेली) येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी राज्यभरातून दलित बांधव दरवर्षी येथे येत असतात. कोरेगाव भीमामधील नागरिक त्यांच्या मदतीला धावतात. मोटारींच्या पार्किंग व्यवस्थेपासून ते नागरिकांना पाणी, चहा-नाष्टा देण्यापर्यंत स्थानिक मदत करतात.

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे एक जानेवारीला येथे मोठा उत्सवच भरतो. सर्वजण मोठ्या उत्सवात सहभागी होऊन आनंदोत्सव साजरा करतात. एक जानेवारीला पुणे-नगर वाहतूकीसाठी महामार्ग बंद होतो. पण, फारशी कोणाची तक्रार नसते. रस्त्याच्या कडेला गाव असल्यामुळे येथे सतत वर्दळ पहायला मिळते. शिवाय, पोटाची खळगी भरण्यासाठीही अनेकांनी येथे वास्तव्य केले आहे. जात-पात विसरून एकोप्यानं राहणारं गाव ही कोरेगाव भीमाची खरी ओळख. महामार्गावर एखादा अपघात झाला तर अनेकजण मदतीसाठी धावून जातात. दर आठवड्याला गावात रस्त्याच्या कडेला बाजार भरतो. अनेकजण येथे ताजी टवटवीत भाजी खरेदी करण्यासाठी येतात. शिवाय, प्रवासीही थांबून खरेदी करतात. यामुळे आर्थिक उलाढालही मोठी होते. अनेकजण छोटे-मोठे व्यवसाय करून पोटाची खळगी भरताना दिसतात.

पण... 1 जानेवारीला दोन गटांमध्ये दंगल झाली अन् गावचे नाव बदनाम केले गेले. कोरेगाव भीमा या गावची ओळख भीमा नदी व विजयस्तंभामुळे अनेकांना माहित होती. परंतु, सोमवारी झालेल्या दंगलीमुळे देशात गावचे नाव पोहचले ते वेगळ्या अर्थाने. खरं पाहिलं तर या दंगलीमध्ये गावचा काही संबंधही नाही. पण, दुसऱयांमुळे गाव अक्षरशः बदनाम झाले. गावची ओळख देशाच्या काना-कोपऱयात वेगळ्या अर्थाने जाऊन पोहचली आहे.

भीमा कोरेगाव नव्हे; कोरेगाव भीमा...
दंगलीनंतर अनेकांनी चक्क गावाचे नावच बदलून टाकले. कोरेगाव भीमा या गावाचा उल्लेख भीमा कोरेगाव असा केला गेला. दंगलीनंतर अनेकांनी सोशल नेटवर्किंगचा आधार घेतला. सोशल नेटवर्किंगवर कोणी एकाने भीमा कोरेगाव केले असावे अन् त्याचीच री पुढे अनेकांनी ओढली. यामुळे गावचे नावच बदलले गेले. विविध प्रसारमाध्यमांनीही पडताळणी न करता गावचा उल्लेख भीमा कोरेगाव असाच केला. यामुळे एकाची कॉपी दुसऱयाने करत गावाचे नावच चक्क बदलले गेले.

महामार्ग, भीमा नदी, आठवडा बाजार, रोजगाराच्या संधी व पुणे शहरापासून जवळ असेले हे गाव. भविष्यातही हे गाव अनेकांच्या मदतीला धावून जाईलच. विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाऱयांना यापुढेही मदत करत राहिल. खरंच हे गाव तसं चांगल. पणं दुसऱयांच्या चुकीमुळे वेशीला टांगलं गेलं...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com