आठवणीतले आर आर आबा !!

R-R-Patil
R-R-Patil

आपण ज्या मातीतून आलो आहोत, त्या मातीशी आपली नाळ कायम ठेवणारी माणसे राजकारणात हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असतात. अशा नेत्यांच्या यादीत आर. आर. पाटील ऊर्फ आबांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. म्हणूनच त्यांना जाऊन आज तीन वर्षे झाली तरी ते आपल्या आठवणीत कायम आहेत. सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तासगाव तालुक्यात जन्मलेल्या आबांची जिल्हा परिषद सदस्यापासून राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदापर्यंतची वाटचाल संघर्षमय होती. संघर्षातून मिळालेले यश डोक्यात न जाऊ देता हा नेता कायम मातीत आणि माणसांमध्येच राहिला. त्यामुळेच सत्तास्थानावर असूनही आर. आर. पाटील या नावापेक्षा ‘आबा’ म्हणूनच ते महाराष्ट्रातील एक लोकप्रिय नेते ठरले.

घरी टोकाची गरीबी असतानाही आबा शांतीनिकेतन कॉलेजातून बीए झाले. पुढं एलएलबी झाले. याच काळात म्हणजे वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी आबांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली. त्यावेळी आबांच्या अंगावर ना नीट कपडे होते, ना पायात चप्पल. पण प्रामाणिक स्वभाव, स्वच्छ चारित्र्य आणि गोरगरिबांविषयीची तळमळ या एकाच धाग्यामुळं आबा पुढं 12 वर्ष सावळज गटातून झेडपीवर निवडून गेले. आबांची अभ्यासपूर्ण भाषणे प्रथम जिल्हा परिषद, नंतर विधानसभेतही गाजली. ‘उत्कृष्ट संसदपटू’ म्हणून त्यांचा गौरवही झाला. अभ्यासू आमदार, उत्कृष्ट वक्ता म्हणून सर्वत्र त्यांचा नावलौकिक झाला. राज्यात सभा गाजविणाऱ्या नेत्यांमध्ये आबा आघाडीवर होते. प्रत्येक निवडणुकीवेळी प्रचारासाठी शरद पवार यांना वेळ नसेल, त्यावेळी कार्यकर्ते ‘आबां’ना पाठवा म्हणून आग्रह धरत. 

२००४ ला आबांवर पवारांनी उपमुख्यमंत्री आणि गृहखात्याची जबाबदारी टाकली. त्या काळात डान्सबार जोरात चालत होते. राज्यातून तरुण पोरं संध्याकाळी गाड्या करुन पनवेल, मुंबईला यायची. रात्रभर पैसे उधळून सकाळी पुन्हा गावात. यामुळं कित्येकवेळा अपघात व्हायचे. पोरं अकाली जायची. बारमधल्या पोरींच्या नादी लागून अनेकांचे संसार उध्वस्त व्हायचे. आबांकडे शेकडो तक्रारी आल्या. शेवटी आबांनी सगळा विरोध झुगारुन डान्सबारबंदीचा कायदाच केला. जीवे मारण्याच्या धमक्या आल्या. कोर्टकचेऱ्या झाल्या. पण आबा आपल्या निर्णयावर ठाम राहिले. या निर्णयामुळे अनेकांचे संसार वाचले. 

आबा मंत्री होते, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते, तरीही ते सर्वसामान्यांचे होते. सामान्य नागरिक  व कोणालाही केव्हाही ‘अॅक्सेसेबल’ अशी त्यांची ख्याती होती. मंत्रालयात काम घेऊन आलेल्या गावाकडच्या प्रत्येक माणसाशीही ते आपुलकीने बोलायचे म्हणूनच त्यांची लोकप्रियता अबाधित राहिली. राजकारण करत असताना आयुष्यात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नाही. शरद पवार यांनी जवळपास दहा वर्षे राज्याच्या गृहखात्याची आणि उपमुख्यमंत्रिपदाची धुरा आबांकडे सोपविली. त्यातच पवारांचा आबांवरील विश्वास अधोरेखित होतो. विविध पक्षांच्या नेत्यांवर तोफा डागणारे अण्णा हजारे, यांच्यासारखे लोक आबांच्या निवडणूक प्रचाराला आले होते. तो आबांच्या स्वच्छ, पारदर्शी, प्रामाणिक प्रतिमेचा गौरव होता.

सध्या देशात स्वच्छता अभियान जोरात चालू आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री असताना संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान सुरू करून आबांनी स्वच्छता मोहिमेची पायाभरणी केली होती. पुढे हेच मॉडेल केंद्र सरकारने देखील स्वीकारले. गेल्या विधानसभेत एनसीपीचा दारुण पराभव झाला. अजूनही पक्ष यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. विरोधीपक्षात असलेल्या राष्ट्रवादीचे आबा हे शक्तिस्थान होते. हा वाघ असता, तर त्याने फडणवीस सरकारला ‘सळो की पळो’ केले असते. अर्थात ही पोकळी भरून काढणे राष्ट्रवादीला जड जात आहे. 

प्रामाणिकपणाचा दर्जा पैसा-पदापेक्षा मोठा आहे हे  ग्रामीण भागातील लाखो गोरगरीब कुटुंबातील तरुणांच्या मनावर कायमचं बिंबवलं. आबांच्या पुण्यस्मरणदिनानिमीत्त अभिवादन! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com