सांगली आणि सावरकर - एक अतूट नाते

बापूसाहेब पुजारी
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

सांगली हिंदू महासभेने सरकारी घाटाच्या मैदानावर जाहीर सभा आयोजित केली होती. मैदान तुफान भरले. रस्ते ठेचून भरले. नदीकाठावरील झाडावरही माणसे चढली. फ्रान्सच्या समुद्रात बोटीतून उडी मारणारे सावरकर दिसतात कसे, हे पाहण्याची उत्सुकता होती. आज (२० एप्रिल)पासून सांगलीत होणाऱ्या सावरकर साहित्य संमेलनानिमित्त सावरकरांच्या सांगलीशी संबंधित आठवणी. 

सांगली आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे एक अतूट नाते होते. त्यांची रत्नागिरीतून स्थानबद्धतेतून सुटका झाल्यावर पुढे वर्षभर महाराष्ट्रात सभांचा कार्यक्रम होता. सांगलीचे त्या काळातील संघचालक काकासाहेब लिमये यांच्याशी त्यांचा स्नेहसंबंध. लिमये यांनी रत्नागिरीत त्यांची भेट घेऊन २६ वर्षांच्या दीर्घ कालखंडानंतर भारतीय जनतेपुढे जाताना प्रथम महाराष्ट्राचा दौरा करावा, असे सुचवले. ते सावरकरांनी मान्य केले. दौरा झाला. प्रभावी वक्‍तृत्व, अलोट गर्दी असे सर्वत्र चित्र होते. त्या दौऱ्यात सांगलीशी त्यांचे ऋणानुबंध निर्माण झाले. ते आयुष्यभर टिकले.

सांगलीला १९४३ मध्ये नाट्यशताब्दी झाली. एकाच व्यासपीठावर नाट्यशताब्दी संमेलन व साहित्य संमेलन असा सोहळा झाला. आजच्या भावे नाट्यमंदिराच्या मैदानात मोठा मंडप होता. मराठी नाट्यशताब्दी संमेलनाचे उद्‌घाटक सावरकर, साहित्य संमेलनाचे प्रमुख पाहुणे बापूसाहेब ऊर्फ श्री. म. माटे आणि संयुक्‍त समारंभाचे अध्यक्ष साहित्यसम्राट नरसिंह चिंतामण केळकर. नाट्यशताब्दीचे उद्‌घाटन करताना सावरकर म्हणाले, ‘‘साहित्यकांनो ! लेखण्या मोडा-बंदुका हातात घ्या. तरुणांनो सैन्यात भरती व्हा! तुम्हाला बंदूक आणि हत्यारे वापरायचे धाडस येऊ दे. देशात स्वातंत्र्यलढा सुरू आहे. बंदुकीचे तोंड कुणाकडे वळवायचे, त्याचा निर्णय घेऊ शकतो.’’

ते भाषण गाजले. नेताजी सुभाषचंद्र बोस आकाशवाणीवरून (ब्रह्मदेश) आझाद हिंद सेनेच्या भाषणात म्हणाले, की सावरकरांनी तरुणांना सैन्यात  भरती व्हा, असा संदेश दिला. त्यातीलच ६० ते ७० टक्‍के सैनिक आझाद हिंद सेनेस मिळाले.’
नाट्यसंमेलनादिनी सायंकाळी सांगली हिंदू महासभेची सरकारी घाट मैदानावर जाहीर सभा झाली. मैदान गच्च. रस्ते ठेचून भरलेले. झाडावरही माणसे चढली. फ्रान्सच्या समुद्रात बोटीतून उडी मारणारे सावरकर दिसतात कसे, हे पाहण्याची उत्सुकता होती.

साहित्यसम्राट न. चिं. केळकर अध्यक्षस्थानी होते. सभेचा विषय ‘भारतीय स्वातंत्र्ययुद्ध आणि अहिंसा’ असा होता. ते म्हणाले, ‘‘रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळेना, हा सिद्धांत आहे. पण, आमचे मित्र मोहनदास गांधी अहिंसा तत्त्व स्वीकारून स्वातंत्र्ययुद्ध करीत आहेत. अहिंसा तत्त्व आम्हालाही मान्य आहे. पण, आत्यंतिक टोकाची अहिंसा नसावी. आम्ही आत्यंतिक अहिंसेला जो विरोध करतो, तो तुमच्यापेक्षा साधुत्वास आम्ही कमी आहोत म्हणून नव्हे, तर आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त अक्‍कल हुशारी आहे म्हणून.’’

थोरले बंधू बाबाराव सावरकर सावरकरांबरोबर अंदमानात होते. तेलाची घाणी हाताने फिरविण्याची शिक्षा होती. प्रकृतीवर गंभीर परिणाम झाला. उपचार-सेवेसाठी का. भा. लिमये यांनी स्वत:च्या जबाबदारीवर बाबांना सांगलीस आणले. राधाकृष्ण वसाहतीत लिमये यांचा बंगला भाड्याने घेतला. एका क्रांतिकारकाची सेवा करायला मिळावी म्हणून हे काम मनापासून व आनंदाने करीत होतो.

सन १९४५ मध्ये बाबाराव सावरकरांची प्रकृती बिघडली. लिमये यांनी स्वा. सावरकर यांना बाबारावांच्या प्रकृतीबद्दल कळविले. भेटून जाण्यास सुचविले. बाबारावांना भेटण्यास जानेवारी १९४५ मध्ये स्वा. सावरकर सांगलीस आले. काही काळ बंधूचा हात हाती घेऊन शांत बसले. जणू कुटुंबाच्या तिघा भावांत तिन्ही वहिनींचा चलचित्रपट डोळ्यांपुढे पाहत आहेत, असे भासत होते. दोन भावांच्या मनाची काय घालमेल झाली असेल ते उमजणे, समजणे अशक्‍य.

स्वा. सावरकर बाबारावांना म्हणाले, ‘‘बाबा आपण तिघाही बंधूंनी धर्मऋण, देशऋण, समाजऋण आणि पूर्वजांचे वंशऋण फेडून पूर्णपणे मुक्‍त झालोत. आमच्या कुळाचा इतिहास देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनीच लिहिला जाईल. बाबा! आपण जीवन कृतार्थ केले. बाबा ! वय झाले. कर्तव्य कर्म संपले. मोह सोडा. मृत्यूला मित्र करा.’’

स्वा. सावरकर तेथून बाहेर पडले. बाबाराव स्वर्गवासी झाले. सांगलीत अंत्ययात्रा निघाली. कृष्णा काठावर गंगाधर सिंग यांच्या मळीरानात अंत्यविधी झाला. आज त्याच जागेवर बाबाराव स्मारक आहे.

सावरकर कुटुंब हे नाशिक जिल्ह्यातील भगूरचे. विधीलिखीत कुणालाच सांगता येत नाही. देशासाठी आयुष्याची आहुती देणाऱ्या तिघांपैकी एका सावरकर बंधूची बाबारावांची समाधी आज सांगलीत कृष्णा काठावर आहे. वारणा-कृष्णा यांचा हा संगम म्हणजे सावरकर आणि सांगलीचे अतूट नाते. हुतात्म्यांच्या अस्थीची लेखणी आणि स्वत:च्या रक्‍ताची शाई यांनी लिहिलेले साहित्य म्हणजे सावरकर साहित्य. आजच्या साहित्य या व्याख्येत ते बसणार नाही. सावरकरांचे वाङ्‌मय अक्षय वाङ्‌मय आहे.

Web Title: Esakal Citizen Journalism Bapusaheb Pujari Article