मगरी हल्लेखोर का ठरताहेत?

मगरी हल्लेखोर का ठरताहेत?

कृष्णेत मगरींनी माणसांवर हल्ले करण्याच्या घटना गेल्या पाच-सात वर्षांपासून सुरू आहेत. दोन वर्षांपूर्वी मी तेथे जाऊन वन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ब्रह्मनाळमध्ये मगरीने एकाचे पाय खाऊन टाकले. यापूर्वी कृष्णेत माणसे मृत्युमुखी पडली होती, मात्र मगरींनी त्यांना खाल्ल्याच्या नोंदी नव्हत्या. ब्रह्मनाळच्या घटनेनंतर याचे गांभीर्य वाढले असून, तातडीने उपायांची गरज आहे.

मुंबईच्या पवई तलावात किंवा कोकणात माणगाव-महाडपासून जवळपास प्रत्येक नदी-खाडीत मगरी आहेत. तेथे त्यांनी माणसांवर हल्ले केल्याच्या फारशा घटना नाहीत. तेथे एकमेकांच्या हद्दीत फारशी घुसखोरी नाही. त्यांचे सहवास्तव्य व्यवस्थित आहे. महाड-चिपळुणात महापुरावेळी नदीतील मगरी शहरात येतात, तरीही त्या हल्ला करीत नाहीत. अनेकदा आम्ही त्यांची सुटका करून पुन्हा नदीत सोडले आहे.

तेथे लोकसंख्या कमी असल्याने दोन गावांमधील निर्मनुष्य पट्टा कित्येक किलोमीटरचा असतो. शेतीही फारशी नसल्याने मगरींच्या अधिवासात माणसांची ढवळाढवळ नसते. सांगली पट्ट्यात कृष्णातीरी सलग शेती आहे. शंभर-दीडशे मीटरवर पाणी पंपांचे फुटव्हॉल्व्ह दिसतात. त्याने शेतकरी पात्रात जाणे स्वाभाविकच आहे. मात्र, हा पर्यावरणात (मगरींच्या अधिवासात) हस्तक्षेपच होतो. पात्रातील वाळूचा अनिर्बंध उपसा, हेही मगरी आक्रमक होण्याचे कारण आहे.

येथे नमूद निरीक्षणे माझी वैयक्तिक आहेत. नदीतील मगरींचे भक्ष्य ठरू शकणारे लहान-मोठे मासे किंवा अन्य जलचरांची संख्या किती आहे, याचाही अभ्यास हवा. ब्रह्मनाळसह अन्यत्र मगरींनी कुत्र्यांना भक्ष्य बनविल्याच्या घटना हल्ली घडल्या आहेत. मग मगरींची संख्या फार वाढली का व तुलनेत अन्न कमी आहे का, याचीही पाहणी हवी. 

मगरींचा समागम काळ व अंडी उबवून पिल्ले होण्याच्या काळात माणसांवरील हल्ले वाढले का, याचा अभ्यास हवा. समागमाच्या काळात नर आक्रमक असतो व आपली हद्द सांभाळण्याच्या प्रयत्नात ताकद दाखविताना माणसांवर हल्ले होऊ शकतात. तू माझ्या हद्दीत येऊ नको, असे सांगण्याचा तो प्रयत्न असतो. अंड्यांच्या व पिलांच्या संरक्षणासाठी मादी आक्रमक होते. माणसाने आपली हद्द वाढविल्याने मगरीच्या क्षेत्रात त्याचे आक्रमण होणे शक्‍य आहे.

मगरीची चयापचय क्रिया (मेटाबॉलिझम) अत्यंत मंद आहे. एकदा का पोट भरले की ती चार ते सहा महिने काहीही खात नाही. त्यामुळे मगर विनाकारण माणसांवर हल्ले करणारच नाही. नदीत एकही मगर नसली तर काय बिघडेल, असे विचारण्यापूर्वी लक्षात घ्यावे की गिधाडाप्रमाणे मगरी नदीसफाई करतात. जंगलात वाघ असला की तेथील निसर्गसाखळी पक्की असते, तीच स्थिती नदीतील मगर दाखवून देते. सध्या येथील लोकभावना तीव्र आहेत. या गोष्टी समजावून कोणीही ऐकणार नाही व ते साहजिकच आहे.
माणूस व मगर यांचे सहवास्तव्य अनिवार्य आहे, हे लक्षात घेऊन उपाय केलेच पाहिजेत. हे आधीच व्हायला हवे होते. लोकांच्या दैनंदिन कामात अडथळे न येता त्यांचा नदीतील वावर मर्यादित केला तर माणसे सुरक्षित होतील. उदाहरणार्थ घाटांवर माणसे पाण्यात जातात, तेथे मगरीला दूर ठेवण्यासाठी ठराविक अंतरापर्यंत पाण्यात तसेच नदीच्या पृष्ठभागावर कुंपण घालता येते का, हे पाहायला हवे. नदीत पंपांसाठी फुटव्हॉल्व्ह आहेत, तेथेही अशीच व्यवस्था केली तर नंतर मगरीला माणसांची सवय होईल व ती शेजारी शांतपणे बसून राहील.

या उपायांनी येत्या दोन-तीन वर्षांत मगरींमुळे होणारे मानवी मृत्यूंचे प्रमाण शून्यावर येऊ शकते. मगरींना खाद्य अपुरे नसेल तर नद्यांमध्ये मत्स्यबीज टाकले तर चांगले परिणाम दिसतील. तोपर्यंत लोकांचे प्रबोधन करून अन्य दीर्घ उपाय योजता येतील. दरम्यान, सर्वांनीच टोकाची भूमिका घेऊ नये. लोकप्रतिनिधी, वनअधिकारी व स्वयंसेवी संस्था यांनी तसे प्रयत्न केले पाहिजेत.

(लेखक हे ऑर्गनायझेशन फॉर वाईल्डलाईफ स्टडीजचे अध्यक्ष व महाडच्या सावित्री नदीतील मगरींचे अभ्यासक.)

(शब्दांकन ः कृष्ण जोशी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com