ज्ञाननिर्माण आणि संवर्धन यासाठी बोली अभ्यास 

ज्ञाननिर्माण आणि संवर्धन यासाठी बोली अभ्यास 

शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, कोल्हापूर हे मराठी शिक्षकांचे कोल्हापुरातील कृतीशील संघटन. मराठी भाषा, तिच्या बोली, मराठीचा अभ्याक्रम, विविध विषयांची चर्चासत्रे, कार्यशाळा आणि स्वत:ची त्रैमासिक संशोधन पत्रिका असे या संस्थेचे कार्य. या संस्थेला यावर्षी दहा वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने कोल्हापूर येथील महावीर महाविद्यालय येथे दशकपूर्तीनिमित्त आपली भाषा, आपली संस्कृती हे मराठी भाषा आणि तिच्या बोलींविषयीचे चर्चासत्र झाले. बहुसांस्कृतिक व्यवस्था हे आपले समाजवास्तव आहे. येथील भाषा आणि संस्कृतींची निर्मिती त्यातूनच झालेली आहे. येथील समृद्ध निसर्ग, वैविध्यपूर्ण भूगोल, त्यातून आकारलेली प्रदेशविशिष्ट संस्कृती, व्यवयाय, भाषा याविषयी झालेले विविधांगी विचारमंथन हे या चर्चासत्राचे यश होय. 

आपण जीवनव्यवहार ज्या भाषेतून करीत असतो, ती भाषा व्यक्तिगत नसून, समाजाची निर्मीती असते. ज्या मराठीतून आपण व्यवहार करतो, ती कोणती मराठी, तिची परंपरा काय? असे प्रश्न आपल्याला व्यवहार करताना पडत नाहीत. वास्तविक हा प्रश्न समाज, भाषा आणि संस्कृती अभ्यासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. जन्मताच आपले समाजीकरण ज्या भाषेतून सुरू होते, ती आपली भाषा. तिलाच आपण आपली मातृभाषा म्हणतो. कोकणी, मालवणी, गोवानी, खानदेशी, अहिराणी, मालवणी, तावडी, वऱ्हाडी, चंदगडी, कोल्हापुरी, सोलापुरी, पुणेरी या प्रदेशविशिष्ट आणि वेगवेगळ्या जाती, जमातींच्या भाषा, व्यवसायिकांच्या भाषा या सर्वांनी/सर्व व्यवस्थांनी मिळून मराठी बनते. पण या प्रदेशविशिष्ट बोलींचा गंभीरपणे विचार केला पाहिजेत हे येथील चर्चेतून अधोरेखित केले गेले. 

कोणतीही भाषा समृद्ध होते, ती या सर्व व्यवस्थांच्या एकत्रिकरणामुळे. परंतु, आपण आपल्या समृद्ध आणि संपन्न भाषा टाकून उपऱ्या आणि कृत्रिम भाषा वापराकडे वाटचाल करतो आहोत. त्यातून केवळ आपली भाषाच नाही, तर हजारो वर्षांची समृद्ध ज्ञानपरंपरा नष्ट करू पाहतो आहोत. आपली हजारो वर्षांची शब्दसंपत्ती घालवतो आहोत. हे सूत्र या चर्चासत्राच्या केंद्रस्थानी होते. पारंपरिक व्यवसायांमधून मराठीत आलेले शेकडो शब्द, भाषेला कसे समृद्ध बनतात याचा पुरावाच आहेत. शिवाय आपल्या लोकभाषांमधील लोकगीतं, व्रतवैकल्यांच्या रचना, अभंग, नाटकं, तमाशा, लावण्या, वग असे पुष्कळ दर्जेदार साहित्य आपण मुख्य प्रवाहातील साहित्य मानत नाही, ही मानसिकता बदलून भाषा आणि परंपरेतल्या साहित्याकडे पाहिले पाहिजेत. एकूणच आपण आपल्या भाषा आणि सांस्कृतिक संचिताकडे डोळसपणे पाहत नाही. भाषाच आपल्याला सबंध सृष्टीचे आकलन करून देत असते. ज्ञान संचयनाचे, वहनाचे तेच पारंपरिक, एकमेव आणि सर्वशक्तीमान साधन आहे. परंतु, या साधनाची क्षमता आपण विचारात घेत नाही. 

या देशातील हजारो वर्षांच्या परंपरा, श्रद्धा आणि ज्ञानाचे संचित भाषेतूनच आपल्यापर्यंत आलेले आहे. आपल्या देशातील शेकडो भाषा, येथील वैविध्यपूर्ण समाज, त्यांचे रीतीरिवाज आणि त्यांच्या त्यांच्या भाषांमधून चालत आलेला सांस्कृतिक ठेवा हा आपला अपरिमित आणि समृद्ध वारसा आहे. परंतु, हा वारसा आपण नजिकच्या काही वर्षांमध्ये हरवून बसणार की काय? अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. यावर गंभीर चिंतन अनेक वक्‍त्यांकडून झाले. या चर्चासत्राचे सूत्रभाष्य विख्यात भाषाभ्यासक, संशोधक डॉ. गणेश देवी यांनी केले. तर कादंबरीकार प्रसाद कुमठेकर, डॉ. प्रमोद मुनघाटे, डॉ. रफिक सुरज, डॉ. नंदकुमार मोरे, विनोद राठोड, डॉ. नीला जोशी, डॉ. मोहन लोंढे, प्रा. अनंता कस्तुरे यांनी विविध प्रादेशिक आणि व्यावसायिक बोलींविषयी विविधांगी चिंतन मांडले. 

चर्चासत्राचे उद्‌घाटक डॉ. गणेश देवी यांचे सूत्रभाष्य हे येथील चर्चेचे फलित म्हणावे लागेल. कारण त्यांनी आपल्या विवेचनातून जगासमोरील भाषा संकटावर धक्का देणारी आणि विचारप्रवृत्त करणारी अनेक निरीक्षणे ठेवली. त्यासाठी त्यांचे निरीक्षणे थोडी विस्ताराने पाहावी लागतील. आपल्या मनोगतात डॉ. गणेश देवी यांनी शास्त्रीय संशोधन, जगभरातील भाषातज्ज्ञ, संशोधक यांच्या संशोधनाचा आधार घेत जगातील भाषिक समस्येवर गंभीर भाष्य केले. ते म्हणाले, शब्द हे माणसाने शोधून काढलेले महत्त्वाचे आयुध आहे. हे आयुध शोधून काढायला माणसाला दोन लाख तीस हजार वर्षे परिश्रम करायला लागले आहेत. माणूस ज्ञानेंद्रियाच्या पलीकडील वस्तू शब्दांच्याद्वारे पकडतो. डोळ्याआडची घटना शब्दांच्या माध्यमातून व्यक्त करू शकतो. म्हणून शब्द संपले की विश्व संपेल. विश्वातील सर्वच प्रकारच्या संपत्तीचा नाटनाट करण्याची माणसाची गती प्रचंड आहे. भाषाही यापैकीच एक आहे. सगळे मिळून आपण माणसाने निर्माण केलेली गेल्या सत्तर हजार वर्षांची परंपरा असलेली भाषा संपवण्याच्या तयारीत आहोत. माणसाची नायनाट करण्याची गती पाहता, एकतर भाषा संपूर्ण संपेल किंवा तिच्यामध्ये मोठे बदल होतील किंवा नवी निर्मिती होईल. 

जगातील अनेक भाषा संपूर्ण नाहीशा होतील ही भिती सर्वप्रथम युनेस्कोने व्यक्त केली. जगातील नाहीशा होतील अशा सुमारे आठशे भाषांची यादीच युनेस्कोने प्रकाशित केली. या यादीत भारतातील एकशे बारा भाषांची नावे होती. या भाषा विशेषत: हिमालयाच्या पट्यातील काश्‍मिर ते मेघालय या प्रदेशातील होत्या. त्याचबरोबर स्विडनसारख्या देशांनीही भाषांचे मूल्यमापण करण्याची शास्त्रीय पद्धत अवलंबून भाषांचे मूल्यांकन करायला सुरुवात केली. त्यांनी या मूल्यांकनानुसार स्वत:च्या देशातील सुमारे पन्नास भाषा येत्या तीन वर्षांत मरून जातील अशी भिती व्यक्त केली आहे. भारतासारखी किंवा त्यापेक्षा अधिक भाषिक समृद्धता असलेल्या आफ्रिकेमध्ये सुमारे 2600 भाषा अस्तित्वात आहेत. परंतु दुदैवाची गोष्ट या सगळ्या भाषांनी आपली लिपी टाकून रोमन लिपीचा वापर करायला सुरुवात केली आहे. याला आपण लिपी संन्यास असे म्हणू. हा लिपी संन्यास त्या भाषांच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा करणार आहे. 

आज मानवी मेंदूला भाषेचा कंटाळा आला आहे. याविषयी बरेच संशोधन झाले आहे. अशाप्रकारे भाषेचा कंटाळा करणाऱ्या मुलांना डिस्लेशिया झालेला असतो. ही डिस्लेशिया झालेली मुले बौद्धिकदृष्ट्या सुमारे शंभर वर्षे पुढे आहेत. ही घटना विचित्र वाटते परंतु, हे सत्य आहे. कदाचित माणूस भाषेच्या पलीकडे जाण्याच्या प्रयत्नात करीत असावा. पण या प्रक्रियेत माणासाने निर्माण केलेली आणि सत्तर हजार वर्षांची परंपरा असलेली शब्दांची भाषा, तिची संरचना नष्ट होतेय. उदाहरणार्थ, भूतकाळ. अनेक भाषांमध्ये सहासात प्रकारे भूतकाळी वाक्‍य करण्याची क्षमता होती. परंतु दिवसेंदिवस भूतकाळवाचक वाक्‍य घडवण्याची क्षमता भाषा हरवत चालल्या आहेत. काळ हा भाषेतील महत्त्वाचा दागिणा आहे. या दागिण्याच्या आधारेच माणसाने स्मृती नावाची गोष्ट निर्माण केली आहे. वेळ ही गोष्ट खरोखरच आहे का? तर नाही. ही माणसाची निर्मिती आहे. या गोष्टीलाच माणूस धक्का लावतो आहे. भूतकाळाला धक्का लावून स्मृती नावाच्या संस्कृतीवर माणूस बुलडोझर चालवायला निघाला आहे. 

सद्या आपली नव्वद टक्के कामे आर्टिफिशल मेंमरी चिफच्या साहाय्याने चालली आहेत. सगळीच राष्ट्रे व तेथील नेते समाजाच्या स्मृतीवर घाला घालत आहेत. उदाहरणार्थ, सध्या टिपू सुलतान हा शत्रू होता असे सांगीतले जाऊ लागले आहे. त्याने इंग्रजांशी केलेला संघर्ष लोक विसरत चालले आहेत. माणूस काळ आणि अवकाशाची मूळ संकल्पना तोडून अनेक काळ आणि अवकाशाचे अनुभव घेण्यासाठी माणूस समर्थ बनत असेल. परंतु, या प्रक्रियेत भाषा नष्ट होईल. माणूस भाषेचा साजशृंगार सोडून होमोड्युअस होतोय. तो केवळ माणसासारखा दिसणारा प्राणी असेल. भाषेशिवाय माणूस माणूस असणार नाही. 
भाषांच्या मुळाशी बोली असते. मराठीच्या मुळाशीही बोली आहेत. या स्थिती बोलींचे काय करायचे हा महत्त्वाचे प्रश्न आपल्यासमोर आहे. आपली स्मृतीपरंपरा पुढे घेऊन जायची असेल तर बोलींची काळजी घेतली पाहिजेत. अनेक बोलींपैकी एक बोली प्रमाण भाषा होते. एखाद्या बोलीभाषेच्या प्रमाणिकरण करण्याच्या प्रक्रियेत बोलींचे मोठे नुकसान होते. यासाठी बोलींचा थ्री डायमेंशन अभ्यास केला पाहिजेत. 

आपण तो तसा केला तर, जगावर फार मोठे उपकार होतील. हा अभ्यास बोलीचे शब्द - व्याकरण, समाज - संस्कृती आणि बोलीतील संकल्पना अशा पद्धतीने झाला तर, भाषा, लोक आणि लोकांचे तत्त्वज्ञान समोर येईल. या अभ्यासाने ज्ञानाचे मोठे भांडार समोर येईल. प्रस्थापित असलेल्या अनेक शास्त्रांमध्ये बदल करावे लागतील. त्यातून माणूस समृद्ध होण्याचा मार्ग सुकर होईल. म्हणून माणूस समृद्ध होण्यासाठी लोकभाषांचा अभ्यास महत्त्वाचा आहे. संपूर्ण विश्वाच्या आणि ज्ञानप्रवाहाच्या भवितव्यासाठी या चर्चासत्रासारखा उपक्रम उपकारक आहे. 

रफिक सुरज यांनी दख्खणी बोली, नंदकुमार मोरे यांनी चंदगडी बोली, विनोद राठोड यांनी बंजारा बोली, नीला जोशी यांनी कोरवी बोली, मोहन लोंढे यांनी मांगबोली, अंनता कस्तुरे यांनी हेड्यांची भाषा या विषयी मांडणी केली. यानंतर कादंबरीकार प्रसाद कुमठेकर यांनी उदगीरी बोलीचा आणि तेथील संस्कृतीचा उदगीतरीशैलीतच परिचय करून दिला. त्यांना उदगीरीत ऐकणे हा अपूर्व असा अनुभव होता. तर डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी झाडीपट्टीतील बोलीभाषा आणि तेथील संस्कृतीचा विस्ताराने परिचय करून दिला. त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण मनोगतातून साक्षात झाडीपट्टी डोळ्यासमोर उभा केली. एकूणच या चर्चासत्रात मराठी भाषा आणि तिच्या बोलींच्या अस्तित्वासंदर्भात केलेले चिंतन अभ्यासकांसाठी नवी वाट असून, अलीकडच्या काही वर्षांमध्ये मराठी भाषा आणि बोलींविषयी झालेले हे मौलिक असे चिंतन आहे. 

(लेखक शिवाजी विद्यापीठामध्ये मराठी विभागात कार्यरत आहेत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com