आठवणीतील डॉ. सदाशिव शिवदे

आठवणीतील डॉ. सदाशिव शिवदे

 2001 च्या दरम्यान  मी नागपुरहुन कात्रज बोगद्याच्या कामाकरिता पुण्याला येत असे. फावल्या वेळात मी इतिहासाचा मागोवा घ्यायचा प्रयत्न  करित असे. यातूनच एक इतिहास अभ्यासक व पत्रकाराने डॉ. सदाशिव शिवदे यांचे भेट घालून दिली. डॉ. शिवदे हे साताऱ्या जवळील कुडाळचे. त्यामुळे त्या भागातील माहितीकरिता त्यांना मी भेटत असे. मला अभ्यासात  सापडलेली  कागदपत्रे  त्यांना दाखवुन खात्री करून घेत असे .  

डॉ. शिवदे घरी भेटण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी प्रत्येकवेळी केलेले आदरादिथ्य लक्षात ठेवण्याजोगे आहे. काहीतरी खाऊ  घातल्याशिवाय ते सोडत  नसत. नेहमी सगळ्याच्या संपर्कात असणे, भेटत राहाणे हा त्यांच्या स्वभाव होता. एखाद्याचा फोन बऱ्याच दिवसात आला नाही तर ते अस्वस्थ व्हायचे. स्वतः फोन करुन विचारपुस करायचे. असे मनमिळाऊ सर जेव्हा त्याच्या जुन्या आठवणीत रमत. त्यांच्या लोणंदमधल्या शासकीय व्हेटरनरी डॉक्टर असतानाच्या गमती सांगत. एकदा एका शेतकऱ्याचा बैल चंदन-वंदन गडावर चरण्यास गेल्यावर अचानक मृत्यु पावला. शेतकऱ्याचे  म्हणणे होते डॉक्टरांनी त्याचे मृत्यु प्रमाणपत्र द्यावे. म्हणजे त्याला शासकिय मदत मिळेल. डॉक्टरांना मदत  करायची होतीच, पण बैल न पाहता कसे काय करता येईल? गडावर चढायचे म्हणजे जिकिरिचे काम. बैल न बघता प्रमाणपत्र देणे, त्याच्या सद्विवेक बुद्धीला काही पटेना. शेवटी  डाॅक्टरांनी चंदनगड चढून प्रत्यक्ष बैलाची पाहणी करूनच प्रमाणपत्र  दिले. 

हाच स्वभाव त्याचा इतिहास लेखनात ही होता. कागदपत्रे तपासुनच लिहायाचे. हाच त्यांचा नियम होता. त्यांचा आवडीचा विषय म्हणजे छत्रपती संभाजीराजे. बालपणी छत्रपती संभाजीचे पात्र ही त्यांनी नाटकामध्ये वटवले होते. त्यामुळे त्यांना महाविद्यालयामध्ये संभाजी म्हणूनच ओळखत असत. पुढे  हेच प्रेम त्यांच्या ज्वलज्ज्वलन्तेजस संभाजीराजा त्याच्या या प्रिय ग्रंथामध्ये दिसते. 

फलटणच्या  राजेनिंबाळकर घराण्याशी त्याची जवळीक होती. त्याच्या अाग्रहाखातर त्यांनी राजमाता सईबाई याच्यावर पहिली कादंबरी लिहिली. तसेच महाराणी येसुबाई, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्यावरही त्यांनी पुस्तके लिहिली आहेत. अनुपुराणच्या उत्तरभागाचे मराठीत केलेले भाषांतर इतिहास अभ्यासकांना निश्चितच मार्गदर्शक असे आहे. मराठा सरदारांच्या वाड्यावरही अभ्यास करून त्यांनी लेखमाला लिहीली.

मला आवडलेले त्यांचे पुस्तक म्हणजे सरदार कान्होजी आंग्रे घराण्यावरील ग्रंथ. छत्रपती शिवरायांचे आरमार किती  बलाढ्य होते हे ग्रंथातुनच प्रतित होते.

अखिल  महाराष्ट्र इतिहास परिषदेचे अध्यक्ष या नात्याने  त्यांनी 2014 ते  2016 पर्यंत कार्य संभाळले. अभ्यासकांना हेरुन त्यांना लिहिते करणे हा त्यांचा हातखंडा होता. माझ्या शोधनिबंधाच्या वाचनास माझ्या आग्रहावरून ते स्वत: उपस्थित राहून त्यांनी चिकिस्ताही केली.

अर्धांगीनीच्या मृत्युनंतर न खचता पुस्तके लिहिण्याचा सपाटा त्यांनी लावला. हे सर्व करत असता त्यांनी आपल्या मुलांना वा नातवंडाना उच्चशिक्षितही केले. या सर्व परिवारातील एक स्वभावगुण म्हणजे नम्रपणा. इतके उच्चशिक्षीत असुनही कुठलाही गर्व या परिवारात कधी दिसला नाही. लोणंदमधील त्यांचा दवाखाना ग्रामीण समाजभिमुख उपक्रम राबवतो. अशा व्यक्तिच्या सहवासात मी एक अभ्यासक, मी वयाने इतका लहान असुन सुद्धा मला त्यांनी मित्राप्रमाणेच वागविले. हेच त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य होते. अशा बहुआयामी व्यक्तिच्या जाण्यामुळे  इतिहास विश्वातच नाही तर समाजात कधीही न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com