मिरजेत समस्यांचा पाढा; रस्ते, उद्यानाचे प्रश्‍न

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

मिरज -  दैनिक ‘सकाळ’च्या वतीने प्रभाग क्रमांक सातमध्ये आयोजित वाचक संवाद मेळाव्यात नागरिकांनी समस्यांचा पाढा वाचला. विद्यमान नगरसेविका संगीता खोत, माजी नगरसेवक आनंदा देवमाने, विठ्ठल खोत यांनी प्रत्येक प्रश्‍न आणि समस्यांबद्दल खुलासे करत बाजू सावरून धरण्याचा प्रयत्न केला. शिवाजीनगरमध्ये कन्या महाविद्यालयाच्या जयंत करंदीकर सभागृहात मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळाला

 समतानगरमध्ये ड्रेनेजसाठी खोदकाम झाले; पण काम झाल्यावर रस्त्यांचे डांबरीकरण केले नाही. काम झालेल्या डांबरीकरणाचा दर्जा चांगला नाही. महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा करूनही दाद घेतली जात नाही.
- विजय पाटील
 
समतानगर, माणिकनगरसह परिसरात घनकचऱ्याची समस्या आहे. प्रक्रिया प्रकल्पाद्वारे सांडपाण्याची विल्हेवाट लावणे शक्‍य आहे; शिवाय कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी ऊर्जा प्रकल्पाला चालना देण्याची गरज आहे. व्यायामशाळेचा प्रकल्पही राबवण्याचा संकल्प आहे.
- गणेश माळी

शिवाजीनगरमध्ये उद्याने कमी आणि जनवारांचे अड्डे जास्त झाले आहेत. समस्या ऐकण्यासाठी नगरसेवक उपलब्ध नसतात. शिवाजी क्रीडांगणाची दुरवस्था झाली आहे. महापालिका जबाबदारी टाळतेय. सुधारणांसाठी पैसे खर्च झाले; पण काम दिसत नाही. पावसाळ्यात त्याला जनावरांच्या स्विमिंग पुलाची अवस्था प्राप्त होते. 
- अक्षय वाघमारे

 मिरज शहर मेडिकल हब असल्याने वैद्यकीय कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर आहे. देशभरातून रुग्ण येतात; पण त्यांच्या विश्रांतीसाठी चांगली उद्याने नाहीत. खुल्या जागांमध्ये जनावरांचा उच्छाद सुरू आहे. प्रभागाचा कायापालट करण्याचा मानस आहे.
- गजेंद्र कुल्लोळी

प्रभागात दवाखान्यांची संख्या शहरात सर्वाधिक आहे; पण त्यांच्यासाठी चांगले रस्ते नाहीत. समतानगर, गंगानगरमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. रेल्वेकडून पाणी विकत घ्यावे लागते. महापालिकेने या परिसराची खेड्यापेक्षाही वाईट स्थिती करून ठेवली आहे.
- सुनीता कोकाटे
प्रभागासाठी स्वतंत्र क्रीडांगण नाही. शहरातील एकमेव शिवाजी क्रीडांगणाची अवस्था पावसाळ्यात अत्यंत वाईट होते. प्रभागात गुंठेवारी वसाहती जास्त आहेत. त्यांच्या सुविधांकडे महापालिकेचे दुर्लक्ष आहे. दवाखान्यांच्या पार्किंगचा प्रश्‍न गंभीर आहे. अतिक्रमणांमुळे समतानगरचा डीपी रस्ता गायब झाला आहे. अनधिकृत बांधकामांना वेळीच आवार घालणे आवश्‍यक आहे. प्रभागात सुसज्ज उद्यान नाही. महापालिकेची शाळा रेल्वेच्या भाड्याच्या इमारतीत चालते. मुख्य रस्त्यांवर पथदिवे नाहीत. 
- डॉ. विक्रम कोळेकर

प्रभाग बहुतांशी गुंठेवारी आहे. आवश्‍यकतेपेक्षा अत्यंत तुटपुंजा निधी मिळतो. पिण्याचे पाणी पुरेसे मिळत नाही. महापालिकेचे दुर्लक्ष आहे. 
- भीमराव कुंभार

कोल्हापूर महापालिकेने चांगली कामे केल्याने शहर सुधारले; सांगली-मिरजेची अवस्था मात्र वाईट आहे. प्रभागात तीन-तीन दिवस पथदिवे बंद असतात. ड्रेनेजबद्दल वारंवार तक्रारी देऊनही कार्यवाही होत नाही. नागरिकांनी स्वखर्चाने ड्रेनेजची कामे केली आहेत.
- उपेंद्र कुलकर्णी

प्रभागाचे विभाजन विकसित आणि अविकसित असे झाले आहे. समतानगर, माणिकनगरची अवस्था खेड्यासारखी आहे. चांगले रस्ते नाहीत. महिलांसाठी स्वच्छतागृहे नाहीत. दवाखाने जास्त असल्याने वैद्यकीय कचऱ्याची समस्याही गंभीर आहे. एकच क्रीडांगण आहे; पण तेथेही सुविधा नाहीत. चांगले खेळाडू कसे तयार होणार? खुल्या जागांवर आरक्षणे आहेत; पण त्यांची अंमलबजावणी झालेली नाही. गुंठेवारी भाग असल्याने समस्या गंभीर आहेत. महापालिकेचे दवाखाने सक्षम का होऊ शकत नाहीत, हा प्रश्‍न आहे. विस्तारित भागासाठी शहरी बसगाड्या सुरू झाल्या पाहिजेत; त्यासाठी महापालिकेची स्वतःची परिवहन व्यवस्था आवश्‍यक आहे. वाहतूक कोंडीची समस्याही गंभीर आहे.
- विलास देसाई
शहरात एकमेव असलेल्या शिवाजी क्रीडांगणाची अवस्था पावसाळ्यात स्विमिंग टॅंकसारखी होते. क्रीडांगणाने अनेक राष्ट्रीय खेळाडू दिलेत; पण त्याची सध्याची स्थिती अत्यंत वाईट आहे. वर्षातील आठ महिने ते बंद असते. प्रभागात फिरता दवाखान गरजेचा आहे. रोजगारनिर्मिती, कचऱ्याचे व्यवस्थापन याचीही आवश्‍यकता आहे. 
- आतिष अग्रवाल

महापालिका स्थापन होऊन वीस वर्षे झाली तरी अद्याप रस्ते, पाणी, गटारी अशा मूलभूत समस्यांवर चर्चा करावी लागत आहे; हे लाजिरवाणे आहे. शिवाजी क्रीडांगणाचा विषय प्रत्येक निवडणुकीत चर्चेला येतो; पण प्रश्‍न सुटत नाही. जास्तीत जास्त दोन वर्षांतच हा प्रश्‍न निकाली काढण्याचा माझा संकल्प आहे. आंबेडकर उद्यानाची दुरवस्था झाली आहे.  
- धनराज सातपुते

विस्तारित भाग असलेल्या समतानगरमधून परिवहन सुविधा नाहीत; यासाठी मिनी बससेवा सुररू करण्याचा संकल्प आहे. शिवाजी क्रीडांगणाची समस्या गंभीर आहे. शिवाजी रस्त्याचे रुंदीकरण पंधरा वर्षांनंतरही रखडण्याचे कारण स्पष्ट होत नाही. 
- सचिन चौगुले

विरोधात असूनही तीन-साडेतीन कोटींची कामे केली आहेत. प्रभागातील महापालिकेचे चार खुले भूखंड बंदिस्त करून सुरक्षित केले. एक भूखंड महावितरणला देण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा प्रसंगी न्यायालयापर्यंत धाव घेतली. मी कोणत्याही नेत्याचा नगरसेवक नसून नागरिकांचा प्रतिनिधी आहे ही भूमिका ठेवली. गेल्या वर्षीच्या अंदाजपत्रकात शिवाजी क्रीडांगणासाठी वीस लाख रुपये दिलेत. प्रभागात स्पर्धा परीक्षांर्थींसाठी अभ्यासिका करण्याचे नियोजन आहे. शिवाजी क्रीडांगण आणि खुल्या जागा विकसित करण्याचेही नियोजन आहे.  
- आनंदा देवमाने

आजवर व्यापारी संघटनेत काम करताना व्यापाऱ्यांचे प्रश्‍न सोडवले; आता सामाजिक कामाकडे लक्ष द्यायचे आहे. शहरात जयंत पाटील यांच्या पुढाकाराने अनेक कामे झाली; अजूनही काही व्हायची आहेत. शिवाजी क्रीडांगण आणि आंबेडकर उद्यान बारा महिने उपलब्ध व्हावे असा प्रयत्न आहे. लक्ष्मी मार्केट इमारतीला ऊर्जितावस्था गरजेची आहे. मेडिकल हब असले तरी सुविधा नाहीत.
- विराज कोकणे

आयुक्तांनी प्रत्येक नगरसेवकाची पन्नास-पन्नास लाखांची कामे अडवली आहेत. ते भाजप सरकारच्या हातचे बाहुले म्हणून काम करत आहेत. कामाचा प्रस्ताव दिला तरी त्याचे अंदाजपत्रक, निविदा, कार्यारंभ आदेश, बिले अशा प्रत्येक ठिकाणी अडवणूक होते. एखाद्या कामाची फाईल दिली तर ‘याची आवश्‍यकता आहे काय’ असा शेरा मारला जातो. कंत्राटदारांची बिले दीड-दीड वर्षे प्रलंबित आहेत. आपल्या अधिकारांचा ते अतिरेक करत आहेत. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करताना नगरसेवकांची दमछाक होते आहे.
- प्रसाद मदभावीकर

निधी मिळाला तरच प्रभागाचा विकास करणे शक्‍य आहे. महापालिकेत जाताना फार काही करता येणे शक्‍य नाही हे ध्यानी ठेवावे लागते. आपल्या कामाचा प्रस्ताव देण्यापलीकडे फारसे अधिकार नाहीत. यामुळे नागरिकांचा अपेक्षाभंग होतो. भविष्यातही जास्तीत जास्त निधी आणायचा प्रयत्न आहे. आमदार सुरेश खाडे यांच्याकडून पावणेतीन कोटींचा निधी मिळाला आहे; त्यातून रस्त्यांचा प्रश्‍न सुटेल. 
- विठ्ठल खोत

अविकसित भाग असल्याने पहिल्यांदा निवडून आल्यावर समस्यांचे डोंगर होते. रस्ते, गटारी, पाण्याची व्यवस्था सारे काही नव्याने करायचे होते. चिकाटीने कामे केली; आता त्याचे दृश्‍य रूप दिसत आहे. पाण्यासाठी पंधरा लाखांचा जलकुंभ उभा केला; पण रायझिंग मेन न झाल्याने पाणीपुरवठा जोडला गेलेला नाही. रेल्वेचे परवाने मिळवण्यात वेळ खर्ची पडत आहे. पाच वेळा नगरसेवकपद घरात असल्याने घरोघरी समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. चोवीस तास लोकांसाठी उपलब्ध आहोत. प्रभागात नेहमीच्या घंटागाड्या न मिळाल्याने रिक्षा घंटागाड्या सुरू केल्या. शिवाजी क्रीडांगणासाठी पाठपुरावा करणार आहे. 
- संगीता खोत
 

Web Title: Esakal Citizen Journalism Sangli readers Sanwad