स्पेस... 

स्पेस... 

नाती जन्मापासुन चिकटुन आलेली. जसे की आईवडील भाऊबहीण अन् त्या अनुषंगाने येणारी आत्या, मामा, काका मावशी. मग त्यांच्या मुलामुलींशी असे. जी रक्ताची नाती आहेत ती आहे तशी स्विकारावी लागतातच. त्याला पर्याय नाही. ती आवडो ना आवडो जन्मभर पण उल्लेख करताना ती शब्दात येतातच. या सगळ्यात मोठे आणि जन्मोजन्मीचे म्हणजे नवरा बायको. एक जमवलेल नाते. 

ज्याच्यासाठी आपण प्रसंगी आईवडीलच काय पण कुणाचीच पर्वा करत नाही. खरे तर याला नाते तरी कसे म्हणायचे? दोन भिन्न लिंगी व्यक्ती वेगवेगळ्या घरातल्या कधी तर वेगवेगळ्या जातीतल्या अन कधी वेगवेगळ्या धर्माच्या पण असतात. वेगळी संस्कृती असुनही एकमेकांसोबत जन्मभर राहण्यासाठी. इतकच नव्हे तर त्या घरातली माणसेही आपण आपली मानतो. 

पुर्वी आईवडील लग्न ठरवायचे. एकत्र कुटुंब पद्धती होती. नात्यांची विण घट्ट असायची. काही कुरबूर झाली तरी घरातली माणसे मधे पडुन समजवायची व भांडण मिटुन संसार परत नीटपणे चालु रहायचा. पण क्वचित घट्ट कपड्याचा जसा अंगावर काच उठतो तसे या नात्यांचेही व्हायचे. पण त्यात कुठेतरी एक आनंदाची अनुभूती पण असायची. समोरच्या व्यक्तीचे आपल्या वाचुन पदोपदी अडते म्हणुन स्वतःचे महत्व वाटायचे. आपण कुणाला तरी हवे आहोत आपल्या वाचुन त्याला जगणे शक्य नाही ही भावना शब्दापलीकडची आहे. 

आता शिक्षण नोकरी निमित्ताने क्वचित न पटल्याने कुटुंब विभक्त होत आहेत. दुर्दैवाने न पटण्याची उदाहरणेच जास्त प्रमाणात दिसतात. सणापरत्वे किंवा कारणपरत्वे एकमेकांकडे जाणे असते. पण आता तर ते देखिल कमी कमी होत आहे. आपल्या सुट्ट्या आपल्या आउटींगसाठी वापरायला हव्या म्हणुन मग लग्न वगैरे कार्याला सुटी नाही म्हणुन टाळणे सुरु झाले. शिवाय विरह अधिक काळ होत असल्याने की काय ओढ आटू लागलीय. 

आपण म्हणतोच ना सहवासाने प्रेम वाढते. अगदी रोज येणारे कुत्रा, मांजर सुद्धा आले नाही की, अरे आज पोळी खायला मनी आली नाही असे आठवतेच. पण आजकाल स्पेसच्या नावाखाली अंतर वाढायला लागले. नात्यात स्पेस असावी. हे अगदी खरे पण किती? तर दोन शब्दात असते तशी म्हणजे दिसायलाही छान दिसते व अर्थ देखिल जोडला जातो. एक शब्द आणि दुसऱ्या शब्दामध्ये बरच अंतर ठेवून लिहीला तर अर्थ नीट लागत नाहीच, अन लिखाण दिसायलाही वाईट दिसते. 

पण आत्ताच्या वेगवान युगात धावताना ही स्पेस इतकी वाढत चाललीय की संभाषण सोडाच भाषणही होत नाही. प्रत्येकाला त्याचे काम त्याचे छंद त्याच वैयक्तिक इतके महत्त्वाचे झाले आहे, की माझ्या ओळखीत एकजण आहेत. त्यांना त्यांच्या सिरियलमध्ये सुद्धा कुणी घरी बसायला, भेटायला आले तर वैतागतात. पण मग त्यांच्या वेळेला कुणी धावुन नाही आले तर म्हणणार कसे, बघा आजकाल कुणाला कुणाचे काही वाटतच नाही. आता यावर काय बोलणार? 
आता टिव्हीवर एक सिरीयल सुरू आहे. तुझ माझ ब्रेक अप. इतक्या लहान सहान कारणांनी भांडणे होऊन घटस्फोटापर्यंत प्रकरण जाऊ शकते, हे माझ्यातर बुद्धी पलीकडचेच आहे.

आजकाल मुली शिकतात. उच्च पदावर कार्यरत आहेत. हाताखालचा अन उच्च पदस्थ स्टाफ लिलया सांभाळतात. सगळेच अनोळखी असुनही सांभाळून घेतात. मग सासरी आल्यावर त्यांना सासरची चार माणसे सांभाळून एकत्र राहणे इतके का कठीण वाटते.?  वेगळे राहिल्यावर सगळ्या कामांसाठी मोलकरणीवर अवलंबून रहावे लागतेच. शिवाय त्यांचे सगळे नखरे सहन करतात, पण सासरचे चुकून कुणी काही म्हटले तर मात्र आपले माणुस म्हणुन या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देण्याची तयारी नसते. मुळात मला वाटतं आपल्या कुटुंब संस्थेने सासरबद्दल एक वाईट ग्रह मुलीच्या मनात आधीच तयार करून दिला असतो. 

सासु म्हणजे सारख्या सुचना. असे एक वाचनात आले. पण लग्नाआधी आईपण सारख्या सुचना देत असतेच की. असो. 
पुर्वी एकत्र राहण्याने कधीकधी जाच व्हायचा. पण सहवासाने प्रेमही वाटायचे व त्या प्रेमामुळे नाते तोडण्याचा विचार मनाजवळ फिरकायचा सुद्धा नाही. दिवसाचे चोवीस तास एकमेकांच्या जवळ राहिल्याने लग्नाआधी न दिसलेले गुणही नंतर दिसतात. पण तसे तुमच्यातही काही तसे असतेच ना? आधीच्या बिनधास्त आणि बेफिकीरवृतीच्या प्रेमात पडलो की लग्नानंतर हेच गुण नकोसे वाटतात. 

कबुल आहे की स्पेस हवी, पण ती दिसायला छान वाटेल आणि दोन्ही शब्दांना जोडणारी असेल इतपतच....नाते जोडलेले असण्यातच. हित आहे आणि आनंदही... तेव्हा तुझ माझ ब्रेक अप न म्हणता "तुझ माझ पॅच अप" असच राहो एवढेच म्हणेन... 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com