तडजोड.. 

तडजोड.. 

शेजारची रीमा थॅन्क्स म्हणायला आली होती. बरेच दिवस तीच्या मनात नोकरी सोडावी की काय या विचाराने थैमान घातले होते. सहज बोलता बोलता ती मला बोलली आणि मग तिला एक उपाय सुचवुन बघितला. नंतर तिचा प्राॅबलेमच राहीला नाही ती गेली. अन् आठवले आजपर्यंत केलेल्या तडजोडी आणि आजुबाजुला बघण्यात आलेल्या तडजोडी. अन् त्यामुळे समृद्ध झालेले संसार. एखादी गोष्ट मिळवायची म्हणजे एखादी गोष्ट सोडावी लागतेच की. हं पण तुम्हाला काय हव आहे आणि काय नसले तरी चालेल हे मात्र आधी मनात ठरवायला हवं. 

आता शिकायच म्हणजे अभ्यास आलाच, मग आपण अगदी सहजपणे आवडणारी झोप थोडी बाजुला ठेवतोच ना. पण ती बाजुला न ठेवता भरपुर झोपा काढत बसलात तर अपेक्षित यश मिळणार नाही. अन हे आपण सहजपणे करतो कारण यश हे झोपेपेक्षा महत्त्वाचे वाटते म्हणुन. तसेच सगळ्या क्षेत्रात आहे. मग संसारात देखील आलेच ना. 

नोकरी तर करायचीय, मुलाला पाळणाघरात पण नाही. ठेवायचे घरात पण इतर कुणी नको. सगळे कसे साधणार? काहीतरी एक तडजोड करावी लागणारच ना. मग काय सोडायचे हा ज्याच्या त्याच्या मानसिकतेचा भाग आहे. 

मला आठवते, तेव्हा आम्ही ब्रम्हपुरीला होतो. आमच्या तिथे एक डाॅक्टर बाई होत्या. त्या रोज दवाखान्यात येण्याआधी त्यांच्या सासुबाईंना सोवळ्यात स्वयंपाक लागायचा तो करून यायच्या. त्यांच्या घरी सगळ्या कामाला बाई होती. त्यांना कुणीतरी विचारले तुम्हाला काय हा त्रास? त्या म्हणाल्या अहो त्यांच्या पुरत्या दोन पोळ्या लाटायला लागतात एवढे ते काय? बाकी कुकर भाजी मी नाही तरी करणारच असते ना. 

एवढे एक केले म्हणुन मला मग बाकी सगळी सुट असते. 

शिवाय घरी दारी कौतुक होते ते वेगळेच. सासुबाई पण खुश सगळ्याना सांगतात सुन माझे सोवळे अगदी सांभाळते हो एवढी डाॅकटर आहे तरी. 

दुसरी एक म्हणजे माझ्या नात्यांतली  मुलगी आहे. इंजिनियर आहे. मोठय़ा कंपनीत नोकरीला आहे. घरी सासु सासरे व अंथरुणावर असलेले आजेसासरे देखील होते. स्वयंपाक करायला बाई होतीच. पण आजोबांना रोज सुन भाताची पेज भरवायची. नातसून आल्यावर ते म्हणाले तिने भरवावी. मग काय बाईने केलेली पेज भरवुन ही आॅफीसला जायची. 

आजोबांना केवढे कौतुक वाटायचे. 

गोष्ट खुप छोटी असते, पण खुपदा आपण तिचा बाऊ करतो. आजकाल पहिल्या सारखी कामे तरी कुठे असतात? अगदी साधारण घरात देखील धुणीभांडी आणि लादी पुसायला बाई असतेच. राहता राहीला चहा आणि स्वयंपाक. बऱ्याच घरी पोळ्या करायला पण बाई असते. मग कुकर भाजीला असा कितीसा वेळ जातो. बर आपल्या अन नवऱ्याला लागणारी भाजीपोळी आपण बनवणार असतोच ना? मग घरातल्या इतर एक दोघांसाठी केले तर बिघडले कुठे? 

शिवाय हल्ली मुलगेही बायकांना मदत करतात हं. माझ्या पुतणीला जुळी मुले झाली पण तिचा नवरा अगदी बरोबरीने किंबहुना तिच्या पेक्षा जास्तच करतो मुलांचे. फक्त प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी अन आपण म्हणु तशीच झाली पाहिजे असा अट्टाहास नको. 

घरातल्या स्वयंपाक करणाऱ्या बाईला आॅफीसला जातांना जर घरात सासु सासरे असतील तर त्यांना काय हवे ते विचारून करून दे. एवढे तर तुम्ही सांगु शकताच ना. आणि तुम्ही भाजीपोळी करून जात असाल तर भाजी चिरणे निवडणे एवढी मदत तुम्हाला होतेच की. शिवाय मागचे राहिलेल्या कामाचे टेंशन नसते. मोलकरणीकडून ते आवरून घेण्याचे काम घरातली माणसे करवुन घेतातच. 

टाळी एका हाताने वाजत नाही, पण क्वचित तडजोड करण्यासारखी परिस्थिती नसते. ती गोष्ट वेगळी. आणि हो हे नुसते सांगण्यासारखे लिहिले नाही. तर मी या सगळ्या तडजोडी करून किंबहुना याहूनही अधिक काही करून एक सुखी आयुष्य मिळवले आहे. शेवटी काय जे गमावले त्यापेक्षा जे मिळवले,  त्याचे मोल अधिक आहे. त्यामुळे काय हवेच आहे. ते आधी ठरवा. निर्णय तुमचाच असेल तर जबाबदारी पण तुमचीच आहे. महिलांची उदाहरण दिली कारण त्यांना माहेर सोडून सासरी जायचे असते म्हणुन.  ही गोष्ट फक्त महिलांसाठी नव्हे तर पुरूषांना देखील लागु आहे. त्यांनी देखील आधीच स्पष्ट विचार ठेवावा की करियर करणारी सहचारिणी हवी की नाही. म्हणजे नंतर वादाचे कारण राहणार नाही. 

शेवटी काय तर शेवट गोड ते सारच गोड. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com