थोडे मनातले... 

थोडे मनातले... 

डायटिशियन कडे गेले होते. नंबर यायला थोडा वेळ होता. तीन चार बायका बसल्या होत्या. खरे तर माझेही वजन तसे काही अवाढव्य वाढले नव्हते, पण नेहमीचा काटा थोडा पुढे सरकलेला दिसला. म्हणुन मग "वाढता वाढता वाढे' असे होऊ नये म्हणुन आले.

वेळीच खाण्यापिण्यात काय चुकतयं हे कळावे म्हणुन. नंतर देखिल अधुन मधुन येत राहिले. मला हवा तो परिणाम मिळाला. हवेहवेसे कपडे जे घट्ट होत होते ते घालता यायला लागले. पण या सगळ्यात एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली. ती म्हणजे तिथे येणाऱ्या मध्ये बायका आणि मुलीच होत्या. कुणी पुरूष मंडळी दिसत नव्हती. पण मग रस्त्यावर जाता-येता दिसणारे अवाढव्य ढेरीवाले पुरुष आठवले. त्यांना नाही का वाटत आपणही थोडे बारीक व्हावे. तब्येत चांगली राहिली पाहिजे? नंतर मग कुठेतरी वाचले की आजकाल बायकांचे आयुष्यमान पुरुषांच्या तुलनेत जास्त आहे. अरेच्चा बायका घरातले काम, नोकरी सांभाळून जर आपले डायट व्यायाम सांभाळत असतील तर असे होणारच ना? पुरूषांना कुणी नाही म्हटलेय. 

आपली प्रकृती व्यवस्थित ठेवणे, हे खरे तर प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मग तो पुरुष असो वा बाई. आपण छान दिसाव तसेच आरोग्य चांगले असावे असे वाटायला हवे. नंतर लक्षात आले, की कुठेही जा किर्तन, प्रवचनाला, सकाळ-संध्याकाळ फिरायला पण बायकाच जास्त दिसतात. 

डायटबद्दल जर पुरुषांना काही सांगीतले, तर ते म्हणतात एवढे थोडेसे कधी तरी खाल्ले तर काय होणार आहे? माझ्या ओळखीच्या एका व्यक्तीला मी असेच काही सांगीतले, तर त्यांनी मलाच सुनावले. त्यांचा युक्तिवाद पण भलताच. काय तर म्हणे खाऊनही मरणारच आणि नाही खाल्ले तरीही मरायचच आहे ना? आता यावर काय बोलण्यासारखं आहे का? 

एक साधे उदाहरण जर एखाद्या बाईचे केस गळत असतील तर ती लगेच डॉकटरकडे जाईल. कुठले तेल लावून बघेल. कुठला शाम्पु लावावा कुठला नाही. वगैरे. पण पुरुष टक्कल पडेपर्यंत वाट बघतात. अन्‌ नंतर मग अनुवंशिकतेच्या डोक्‍यावर खापर मारून मोकळे होतात. 

तसेच धुम्रपान करू नये, दारु सर्व नाश करते. हे माहीत असूनही ते सहजपणे दुर्लक्ष करतात. परत त्यावर देखिल यांच्या कडे स्पष्टीकरण तयार असतेच. काय तर म्हणे टेन्शन आले की, घेतो एखादा पेग. किंवा ओढतो एखादी सिगारेट. आता दारु किंवा सिगारेट पिल्याने कुणाचे प्रॉब्लेम सुटल्याचे माझ्या तरी ऐकिवात नाही. हो कदाचित ते थोड्या वेळ विसरल्या जात असतील. पण मग आधीच प्रॉब्लेम त्यात पिण्याने अजुन प्रॉब्लेम झालेले मात्र पाहिले आहेत. आणि हे जर खरे मानायचे तर मग खरे तर सगळे व्यसन महिलांना लागायला हवे. त्यांना तर घरी दारी समस्याच समस्या असतात. अगदी सासुरवास ते बाहेरच्या जगात सुरक्षित राहण्यापर्यंत सगळीकडे टेन्शनच टेन्शन असते.

तसेच काय तर म्हणे सेलिब्रेशन म्हणुन घेतो कधीतरी. सेलिब्रेशन कसले दुसऱ्या दिवशी बसतात डोक धरून लिंबु पाणी पित. आणि अजुन एक महत्त्वाचे म्हणजे जर बायको असे काही करू नका वगैरे सांगत असेल तर अजिबात ऐकण्याचा प्रश्नच येत नाही. कारण बायकोला काय कळतय? असाही शेरा लगेच. आणि मग त्या व्यसनांचे परिणाम शरीरावर होतातच. त्याचा त्रास होतो ते वेगळेच. म्हणुन बायकांचे जीवनमान हे तुलनेने पुरुषांपेक्षा जास्त आहे. असा निष्कर्ष वगैरे काढुन त्यावर चर्चा करण्यापेक्षा ते का? त्याचे उत्तर जरा विचार केला तर तुमचे तुम्हालाच मिळेल. 

अर्थात हे सगळ्या पुरूषांना सरसकट लागु नाही. आजकाल तरूणपिढी यावर काम करताना दिसते. मुले जीमला किंवा जॉगिंगला जाताना दिसतात. पण थोड्या प्रमाणात. मला बायका तेवढ्या चांगल्या किंवा पुरुष वाईट वगैरे असे काही म्हणायचे नाही. पण यात बसणाऱ्या पुरूषांनी याचा गांभीर्याने विचार करायला हरकत नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com