"उंबरठा' ओलांडल्याची गोष्ट 

"उंबरठा' ओलांडल्याची गोष्ट 

माझी बी. एसस्सी. ची परीक्षा संपून सुट्ट्या पडल्या होत्या. मनात खूप आशा आकांक्षाचं फुलनं चालू होतं. सुट्टीत नोकरी करायची, घरी आर्थिक मदत करायची. स्वतः आर्थिक स्वावलंबी असल्याचं सुख लग्नाअगोदर अनुभवायचं त्यासाठी माझे खूप प्रयत्न चालू होते. पण आई पप्पांना एक स्थळ आवडले व माझा कांदेपोह्याचा कार्यक्रम झाला. दोन दिवसांनी त्या पाहुण्यांचा पसंतीचा फोन आला. पप्पांनी त्या मुलाची सखोल चौकशी केली. आणि मला काही कळायच्या आत माझ्या समोर प्रश्न आला "तुला मुलगा पसंत आहे का?' मला काही सुचत नव्हते. शेवटी शांतपणे विचार केला. आई पप्पावर विश्वास ठेवला व त्या मुलाने विचारलेल्या एका प्रश्ना मुळे मी "होय' असे उत्तर दिले. तो प्रश्न होता "तुला पुढे शिकायला आवडेल काय? मी ठरवलं पुढे शिकून चांगली आवडीची नोकरी करायची. तो मुलगा म्हणजे कृष्णात. त्याचे व माझे लग्न झाले. 

कृष्णातचे बहिणी व भाऊ तेव्हा लहान होते. खेडेगावी अशी पध्दत असते की लहान दिराला व नणंदेला एकेरी बोलवायचे नाही. पण कृष्णातच्या परिवर्तनवादी विचारात वाढल्यामुळे शाळकरी दिराने व नणंदेने घरात सर्वांना स्पष्टपणे सांगितले कि वहिनीनी आम्हाला आमच्या नावाने एकेरी हाक मारायला पाहिजे. घरातील मंडळीनी हे मान्य केले. त्याचे मला खूप कौतुक वाटले. कृष्णात विचाराने खूप परिपक्व, ठाम व निर्भीड आहे, याची जाणीव झाली. कृष्णातला मी माझ्या वैयक्तिक संदर्भात काही सल्ला किंवा मत विचारले की तो नेहमी म्हणायचा "पहिल्यांदा तुला काय वाटते ते सांग, तू ठरव, मी सोबत आहेच.' वाटायचं की याला माझ्या संदर्भातील कामात रस नाही म्हणून तो असे म्हणतो. पण नंतर मला याची जाणीव झाली की तो मला माझे स्वातंत्र्य वापरायची सवय लावतो आहे. लग्नानंतर मी माझे शिक्षण पूर्ण करून आयटी क्षेत्रात नोकरी चालू केली. 

आज मी आर्थिक स्वावलंबी तर आहेच पण आर्थिक स्वातंत्र्यही जगते पण आहे. कृष्णातचे स्त्री-मुक्ती विषयीचे विचार खूप प्रगल्भ आहेत. तो स्त्री-पुरुष समानता मानतो. "संसार' ऐवजी "सहजीवन' जगणं महत्वाचे आहे. स्त्रीने आर्थिक स्वावलंबनाबरोबर सामाजिक दृष्ट्याही सजग, परिवर्तनवादी व कृतिशील असले पाहिजे हे मी सहवासातून शिकले. कृष्णात लग्नाआधीपासून अंधश्रद्धा निर्मूलन समितीत (अंनिस) वैयक्तिक पातळीवर काम करत होता. पण त्याने मला तू अंनिसचे काम कर असा आग्रह कधी केला नाही. अंनिसचे विचार पटल्यामुळे मी पण अंनिसमध्ये सक्रिय झाले. माहेरचे लोक कर्मकांड, पूजा- अर्चा, उपवास करायचे पण मला तसे तेथे बंधन नव्हते. पण सासरी लोक आग्रहास्तव काही दिवस मला करावे लागले. पण या पूजा-अर्चा, उपवास, व्रत वैकल्यांचा जीवनाशी संबंध शोधू लागले तर ते सर्व निरर्थक वाटले. कार्यकारणभावरहित वाटले. वैज्ञानिक दृष्टिकोनाशी याचा काहीही संबंध नाही असे वाटले. घरी एकेदिवशी खूप मोठी पूजा होती मला त्यात सहभागी व्हायचे नव्हते. आपल्याला ज्या समाजसुधारकांनी धर्माची कठोर चिकित्सा करायला शिकवली. योग्य ते स्वीकारायला व अयोग्य ते नाकारण्याचे धाडस दिले त्या समाजात आजही चुकीच्या प्रथा पाळल्या जातात, या विचाराने मी खूप अस्वस्थ होते. मी दिवसभर पूजेच्या ठिकाणी गेलेच नाही. सासूबाईंनी बोलावणे पाठवले, तरीही मी गेले नाही. शेवटी वाट बघून सासूबाई माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या "काय झालय तुला?' म्हटले "मला हे पटत नाही म्हणून मी आले नाही.' त्या काहीवेळ माझ्याकडे बघत स्तब्ध राहून न बोलता निघून गेल्या. पण माझं मन खूप मोकळ झालं. खूप बर वाटलं. कर्मकांड, पूजा अर्चा, उपवास, व्रत वैकल्य या सर्व गुलामगिरीचा "उंबरठा' ओलांडून परिवर्तनाची एक पायरी चढले असे वाटले. 

समाजात स्त्री सौभाग्य अलंकाराला स्त्रीपेक्षाही जास्त मान आहे. मंगळसुत्रावरून त्या स्त्रीची एखाद्या गोष्टीला ती पात्र आहे की नाही हे ठरवलं जाणं हा स्त्रीचा खूप मोठा अपमान आहे. म्हणून मी ठरवलं की आपण या सौभाग्य अलंकाराला एक साधा अलंकार म्हणूनच वापरायचे. तेव्हा पासून मी मंगळसुत्र कधी घालते कधी घालत नाही. सुरुवातीला माझ्या माहेरच्यांचा बराच विरोध झाला. पण मी ठाम आहे हे बघून त्यांनी माझे हे वागणे मान्य केले. हा सौभाग्य अलंकार घालण्याच्या सक्तीचा "उंबरठा' ओलांडून परिवर्तनाची पुढची पायरी चढले असे वाटले. माझ्या मुलीला वाढवताना ती एक स्त्री म्हणून नव्हे तर एक माणूस म्हणून वाढवताना मला खरचं खूप अभिमान वाटेल. खूप समाधानी वाटतं स्वतःहून निर्णय घेताना, स्वतःच्या निर्णयाच्या दिशेने पाऊल टाकताना, गुलामगिरीचे, शोषणाचे, असमानतेचे, दुय्यमत्वाचे "उंबरठे' ओलांडून परिवर्तनाची वाट चालताना. स्वतःचे सामाजिक, आर्थिक, राजकीय स्वातंत्र्य 21 व्या शतकात खऱ्या अर्थाने जगताना.... 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com