निसर्ग संपन्न कलापूर...

निसर्ग संपन्न कलापूर...

कोल्हापूरातील कलेला आणि कलाकारांना राजर्षी शाहू महाराज यांनी स्वातंत्र पूर्वकाळात प्रोत्साहित केले. अर्थ सहाय्यही केले. हेतू हाच होता कि कोल्हापूरची कला सातासमुद्रा पार पोहोचली पाहिजे. कोल्हापूरचा परिसर म्हणजे चित्रकारांना निसर्गचित्रांकडे आकर्षित करणाराच. संपूर्ण देशभर येथील कलाकृतींनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. आता या चित्रांना ग्लोबल मार्केट मिळवण्याचे पहिले पाऊल यशस्वी ठरत असल्याचे सकारात्मक चित्र पाहायला मिळते आहे.

कोल्हापूर जिल्ह्याचा परिसर गड, किल्ले, नद्या, तलाव, हिरवीगार वनश्री, ऐतिहासिक वास्तू यांनी नटलेला आहे. निसर्गचित्रे चितारणाऱ्या कलावंतांसाठी तर हा अमोल ठेवाच आहे, असे म्हणावे लागेल. शाहू महाराजांनी अनेक कलाकारांना राजाश्रय दिला. गेल्या शतकात करवीरच्या चित्रकारांनी जिल्ह्याची निसर्गचित्र परंपरा नुसती जिवंत ठेवली नाही, तर दिवसेंदिवस समृद्ध करीत पुढी नेली.        

कोल्हापूर जिल्हा म्हणजे चित्रकारांना निसर्गचित्रांकडे आकर्षित करणारा. प्रामुख्याने एकशे चौसष्ठहून अधिक वर्षांची कला परंपरा असणारे आणि निसर्गचित्रकला समृद्ध करणारे एकमेव शहर म्हणजे कोल्हापूर होय. राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या उदार राजाश्रयाने येथील कला बहरली. कोल्हापूर स्कूलचा नावलौकिक देशभरामध्ये पोहचला.या कार्यामध्ये कलातपस्वी आबालाल रहेमान, रावबहादूर धुरंधर, दत्तोबा दळवी, बाबूराव पेंटर, चांगदेव शिगावकर, माधवराव बागल, चंद्रकांत मांडरे, गणपतराव वडणगेकर, टी. के. वडणगेकर, बळीराम बिडकर, रा. शी. गोसावी, रवींद्र मेस्त्री, पी. सरदार, जी. कांबळे, अरविंद मेस्त्री यांचा मोठा वाटा आहे. त्यानंतरही निसर्ग, व्यक्तिचित्रे, पोस्टर, शिल्प आणि कॅलेंडर असा पाच कलांचा प्रवाह पुढे अखंड सुरू राहिला. 

आबालाल रहेमान, धुरंधर, दत्तोबा दळवी, रा.शी. गोसावी यांनी जे विद्यार्थी निर्माण केले, तेही नामवंत चित्रकार झाले. दळवीज आर्ट इन्स्टिट्यूट, रा. शी. गोसावी कलानिकेतन महाविद्यालय, कलामंदिर महाविद्यालय या संस्था आजही मोलाचे कार्य करीत आहेत. १८५० पासून कोल्हापूरने ही परंपरा जपताना बदलत्या काळाबरोबर बदलही आत्मसात केले आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून येथील कला परंपरेचे मार्केटिंग जागतिक पातळीवरही झाले. स्थानिक कलाकारांच्या कलाकृती जगभरातील विविध देशांतही जात आहेत. विविध बेवसाईटस्‌च्या माध्यमातून आपल्या कलाकृतींचे मार्केटिंग कसे करावे, याबाबतची जाणीवही येथील कलाकारांना झाली आहे. 

येथील निसर्गाला कॅनव्हासवर रेखाटताना स्टुडिओपेक्षा स्थळचित्रणालाच महत्त्व दिले गेले. क्षणाक्षणाला रूप बदलणारा निसर्ग रंगविताना वेगात काम करता येईल, असे माध्यम म्हणून जलरंगाचा वापर झाला. शिवाय या माध्यमातील साहित्याची ने-आण करणे सोपे असल्याने जलरंगाकडे कल वाढला. जलरंगातील निसर्गचित्र ही कोल्हापूरची ओळख बनली. कोल्हापूरमध्ये वास्तववादी, सृजनात्मक, अमूर्त अशी कोणतीही शैली असो यामध्ये प्रत्येक कलाकाराला निसर्ग रेखाटण्याचा मोह झाला आहे. याचे ठळक उदाहरण म्हणजे कोल्हापूरच्या रंकाळ्या वरील संध्यामठाच्या कलाकृतीचे देता येईल. आज अनेक चित्रकारांनी, छायाचित्रकारांनी येथील संध्यामठाला आपल्या कलेद्वारे बंदिस्त केले आहे. चित्रतपस्वी आबालाल रेहमान ते अगदी नव चित्रकारांनी या संध्यामठाचे प्रतिबिंब रेखाटले आहे.  

कोल्हापूर जिल्हा जसा रांगडा तसाच तो निसर्गाची मुक्तपणे उधळण करणाराही...इथली संस्कृतीच जणु निसर्गाशी एकरूप झालेली...मग कुठलेही गाव असो किंवा वाड्या-वस्त्यावर विविधांगी निसर्गाची रूपही तितकीच वैविध्यपूर्ण. ही विविधतेने नटलेली रूपं आजवर अनेक निसर्गप्रेमी छायाचित्रकारांनी कॅमेऱ्यात बंदिस्त केलेली आपणास पहावयास मिळते. कोल्हापूरचे अनेक चित्रकार हि जुनी ओळख जपतानाच नवनवे प्रयोग करताना दिसतात. 

यामध्ये चित्रकार के. आर. कुंभार, शिवाजी मस्के, विलास बकरे, जे. बी. सुतार, प्रा शिवाजी शर्मा, एस. निंबाळकर, संपत नायकवडी, प्रा. जी. एस. माजगावकर, प्रा. अस्मिता जगताप, रमेश बिडकर, प्रा.अजय दळवी, संजय संकपाळ, संजय शेलार, सुरेश पोतदार, सुनील पंडित, महंमदअली मुजावर, मनोज दरेकर, संतोष पोवार ,नागेश हंकारे  प्रशांत जाधव, प्रसाद आपटे, मंगेश शिंदे, बबन माने, इंद्रजीत बंदसोडे, रमण लोहार, बाजीराव माने, विश्वास पाटील यांचा उल्लेख करावा लागेल .

कोल्हापूर हे वास्तववादी कलाकृती निर्माण करणारे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. सर्वसाधारणपणे दिसते ते जसेच्यातसे हूबेहूब चितारलेले सर्वांनाच समजते. पण कलाकारांनी पाहिलेले, त्याला भावलेले त्यांच्या नजरेतून, विचारातून साकारलेली कलाकृती समजून घेण्याची गरज असते. त्यासाठी कलाशैलीत होणारा बदल समजून घेणे महत्त्वाचे ठरते.पण हे सर्व विचार कृतीतून रुजविण्याचा प्रयत्न येथील नव चित्रकार करताना दिसत आहे. निसर्ग म्हणजे फक्त नदी, नाले, झाडे, वेली असे मर्यादित न पहाता निसर्गाची भव्यता या कलावंतानी चितारली आहे. पारंपारिक विषयांना छेद देत बारकावे आणि भव्यता तेवढ्याच ताकदीने रेखाटली गेली आहे. 

जलरंग, तैलरंग, आक्रालिक अशा भिन्न माध्यमात काम करताना आपले वेगळेपण जपत निसर्गचित्रे निर्माण केली आहेत. या चित्रांच्यामधून निसर्गातील रंगांचा टवटवीतपणा कलारसिकांना मोहवून टाकत आहे. चित्रकला ही एक भाषा आहे, ज्याद्वारे मानव आपली मते, भावना, श्रद्धा व्यक्त करत आला आहे. एखाद्या प्रांतातील भाषा अन्य प्रांतीयांना समजेलच असे नाही. ती समजायची असेल तर त्या भाषेचा अभ्यास केला पाहिजे, त्या प्रांतात वास्तव्य केले पाहिजे किंवा माहितगारांकडून अर्थ समजून घेतला पाहिजे, हे सर्वमान्य आहे. अगदी तसेच चित्रांचेही आहे.

चित्रे समजत नाहीत म्हणून नाकारू नयेत, तर ती समजून घेण्यासाठी प्रयत्न करावेत. कोल्हापुरात वास्तववादी कला पारंपरिक मानली जाते. कोल्हापुरातच नव्हे, तर जगात सर्वत्रच बहुतांशी वास्तववादी चित्रांना, चित्रकारांना समाजात लवकर मान्यता मिळते, कारण अशा चित्रांचे आकलन करणे सोपे असते. मात्र याशिवाय, अन्य शैलीत चित्रकारी करणारेही असतात. त्यांना मात्र ती चित्रे समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. यासाठी विविध शैलीत काम करणार्‍या अनेक पाश्‍चात्य, भारतीय चित्रकारांची उदाहरणे देता येतील. तत्कालीन परिस्थितीत डावललेल्या चित्राकृती आज सर्वोत्कृष्ट गणल्या जात आहेत. कदाचित आज नाकारलेल्या उद्या श्रेष्ठ ठरतील. जनसामान्यांचा चित्रकलेशी असणारा संपर्क अत्यल्प प्रमाणात असल्याने चित्र समजणे अवघड होते. 

साहजिकच समाजात चित्रकलेबद्दल रुची निर्माण करणे, आस्था रुजविणे ही खुद्द कलाकारांचीच जबाबदारी ठरते. प्रत्येक कलावंत हा आपल्या स्वप्रतीभेने कला निर्मिती करत असताना रंगलेपणामध्ये विविध प्रयोग करताना दिसतो. काही प्रवाही पद्धतीने रंग वापरतील, तर काही जाड थरांचा वापर करतील तर काही पोत वापरून वेगळे पण जपतील. छायाभेदासह ऊन सावल्यांचा खेळ मांडताणाच प्रत्येक जन कलानिर्मितीचा निर्मळ आनंद लुटत असतो. निसर्ग दिसतो तसा आणि सुलभीकरणातून रेखाटला असला तरी उत्तम हाताळणीमुळे तो रसिक प्रिय ठरतो. त्यासाठी सर्वच शैलीतील कलाकृती विविध माध्यमांतून लोकांसमोर मांडणे आवश्यक आहे. त्यापैकी एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे चित्रांची प्रदर्शने भरविणे.

आज कोल्हापूरच्या कलाकारांनी हे सातत्य जपले आहे. आपली कला अगदी सातासमुद्रापार यशस्वीरित्या पोहोचविली आहे. या बरोबरच कलासाक्षरतावाढीसाठी मोठय़ा शहरांपेक्षा छोट्या शहरातून, गावातून अशी प्रदर्शने भरविणे आणि त्याबाबत चर्चा घडवून आणणे ही गरज आहे. यासाठी स्पर्धा, प्रदर्शने, परिसंवाद, दृकश्राव्य माध्यमाच्या सहाय्याने याचा प्रसार होणे गरजेचे आहे.

पूर्वी राजाश्रय होता आता लोकाश्रयाने हे कार्य पुढे जात आहे. कोल्हापुरात अनेक घटक प्रयत्न करताना दिसत आहेत. अगदी जंगलभ्रमंती सह कलानिर्मिती कार्य शाळा आयोजित केल्या जात आहेत. यामध्ये कला महाविद्यालायांच्या बरोबर काही संस्थानंच्या पुढाकार आहे. कोल्हापूरमध्ये कला रसिकांच्या माध्यमातून विविध कला उपक्रम सुरु आहेत. यामध्ये रंगबहार, कोल्हापूर आर्टिस्ट गिल्ड, कलासाधना मंच, बळीराम बिडकर कला प्रतिष्ठान, भीमा फेस्टिवल, कोल्हापूर महोत्सव,कोल्हापूर आर्ट फौंडेशन यांचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. 

आज माध्यम बदलत आहे. २१व्या शतकामध्ये संगणक क्रांती घडली आहे. या नवमाध्यमाचा प्रभाव नवीन पिढीवर आहे. पण या माध्यमाचा प्रभावी वापर कोल्हापुरची नवी पिढी करताना दिसते. आज ही निसर्गचित्रे कागदाबरोबरच संगणकावरही तितक्याच सुबकतेने हे कलाकार साकारत आहेत. अनेक जाहिरात संस्थांच्यामध्ये कोल्हापुरचे नाव देश विदेशात गाजत आहे. पण त्याच बरोबर येतील पारंपारिक कलानिर्मिती आजही तितक्याच जोमात सुरु आहे. रसिक मान्य ठरत आहे. अनेक कलारसिक येथील कलाकृती विकत घेऊन आपल्या संग्रही ठेवत आहेत. हे कोल्हापूरच्या कलाक्षेत्रासाठी शुभ संकेत आहेत. कोल्हापूरची ही निसर्गचित्र परंपरा भविष्यात ही जोमाने यशस्वीपणे आपली कीर्ती पताका फडकावत राहील यामध्ये शंकाच नाही 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com