पत्रकारितेतील सुवर्णपान पडद्याआड

प्रभाकर शिंदे
रविवार, 31 डिसेंबर 2017

ज्येष्ठ पत्रकार सोपान पाटील काळाच्या पडद्याआड गेले. पत्रकारितेतील त्यांच्या योगदानावरील दृष्टिक्षेप...
 

अत्यंत परखड लेखणी, जोडीस अफाट स्मरणशक्तीचे वरदान लाभलेला सोपान म्हणजे कोल्हापूरच्या विविध घटनांचा एक साक्षीदारच आणि चालता-बोलता इतिहासच होता. सोपानच्या निधनाने पत्रकार क्षेत्रातील ‘दादा’च हरपला.

राधानगरीसारख्या दुर्गम तालुक्‍यातील नरतवडे गावचा एक युवक कोल्हापुरात स्थायिक होऊन पत्रकार जगतात आपले नाव उंचावतो अन्‌ राजकारण, समाजकारण, सहकार क्षेत्रात ठसा उमटवितो काय हे सारेच अगम्य आणि अतर्क्‍य आहे.
रक्तातच पत्रकारिता भिनल्याशिवाय असे सोनेरी यश मिळत नसते, पण सोपानने जिद्द, परिश्रम, सचोटीच्या जोरावर ते मिळविले.

खर तर सोपान माझा पत्रकारितेतील गुरू! बातमी कशी लिहायची, लिड, इन्ट्रो म्हणजे काय सोपाननेच शिकविले.
सोपानचा पत्रकारितेतील ‘श्रीगणेशा’ शाहूपुरीतील भाऊसाहेब सूर्यवंशी यांच्या ‘राष्ट्रप्रगती’ या दैनिकातून झाला. नंतर सोपानच्या पत्रकारितेची खरी कारकिर्द बहरली ती, १९८० मध्ये ‘सकाळ’ कोल्हापुरात आल्यानंतरच! निवृत्त होईतोपर्यंत ‘सकाळ’शी जपलेली सोपानची नाळ तुटली नाही.

अत्यंत मीतभाषी, कोणाचीही मुलाहिजा न ठेवता चिरफाड करणारी तर हळूवार चिमटे काढणारी सोपानची बातमी, वार्तापत्र त्या दिवशी हमखास चर्चेचा विषय असायचा! ‘सोपान बोलतो’ म्हटल्यावर महादेवराव महाडिक (आप्पा) काय किंवा माजी आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकरांना फोन टाळणे अवघड व्हायचे! आप्पा सुरवातीस ताकास तूर लावून द्यायचे नाहीत, पण सोपान किती वस्ताद आप्पांना घोळत घोळत मोठ्या खुबीने बातमी काढून घ्यायचा. दुसऱ्या दिवशी बातमी वाचल्यावर आप्पांचा फोन, ‘काय हे सोपान असं कुठ बोललो होतो, मग सोपानही हसत हसतच म्हणायचा, मग नाही म्हणा, तसं छापतो. ‘‘असू दे असू दे’’ म्हणून खलखळून हसून आप्पा फोन खाली ठेवायचे.

राजकारण हा सोपानच्या विशेष आवडीचा प्रांत!
महापालिकेची प्रशासकीय कारकिर्द, तद्‌नंतर आजवरच्या मनपा निवडणुकांचा लेखा जोखा सोपानला मुखोद्‌गत असायचा. ‘मनपाचे रणकंदन’ ही सोपानची मालिका वाचनीय असायची. मनपा वा जिल्हा परिषदेच्या सभांचे वृत्तांकन असो की राजकीय नेत्यांच्या जाहीर सभा वा खासबाग मैदानातील सतपाल-युवराज, सतपाल-बिराजदार, दादू चौगुले, सादिक कुस्ती तसेच हिंद केसरी स्पर्धांत सोपानची भिरभिरती नजर असे काही बारकावे टिपायची की बातमी वाचताना प्रत्यक्ष कुस्ती पाहतो काय असा वाचकाला आभास व्हायचा! माहिती कार्यालयाच्या दौऱ्यात तर सोपानशिवाय ‘पान’ हलायचे नाही. आणि सोपानचे एक-एक किस्से सुरू झाली की मुंबई वा गोवा कधी आले ते कळायचे देखील नाही.

सोपान अजातशत्रू पत्रकार असल्याने जि. प. अध्यक्ष बाळासाहेब माने, दिनकरराव यादव, शंकर बाळा पाटील, शामराव पाटील, प्रकाश पाटील आदींच्या अंदाजपत्रकीय वा मासिक सभांतील वृत्तांकनात सोपानची वेगळी छाप दिसायची. त्यावेळी इंदूबाई गुजर, लीलाबाई पवार, भरमू अण्णांच्या भगिनींना सोपान आपल्या वृत्तात पुरेपूर न्याय द्यायचा.

सोपानचा फोन म्हटल्यावर जि. प.चे स्वीय सहायक सांगवडेकर कुंभार हवी ती माहिती द्यायचे! अध्यक्ष दिनकरराव यादव तर खांद्यावरच हात टाकून काय पत्रकार मित्रा म्हणून गप्पा मारत असत. तर असा हा सोपान; रोख-ठोक आणि कोणत्याही राजकीय घटनेच्या मुळाशी जाऊन त्याचा अन्वयार्थ शोधणारा, राजकारण्यांना  दिशा दाखविणारा प्रसंगी त्यांची जागा दाखवून देणारा एक हाडाचा पत्रकार!

एक व्यासंगी व वस्तुनिष्ठ पत्रकारितेचा वसा जोपासणारा, युवा पत्रकारांना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणारा एक हरहुन्नरी आणि अभ्यासू पत्रकार! सोपानने अफाट मित्र परिवार जोडले होते हेही अंत्यसंस्काराच्या वेळच्या गर्दीने दिसून आले.
सोपानच्या स्मृती चिरंतन जपण्यासाठी प्रेस क्‍लबने व्याख्यानमाला तसेच सर्वोत्कृष्ट बातमीदार पुरस्काराचे आयोजन केल्यास तीच एका प्रामाणिक, नि:स्वार्थी पत्रकारास खरी श्रद्धांजली ठरेल.

Web Title: Prabhakar Shinde article