पर्यटनातून साधूया शाश्‍वत विकास

पर्यटनातून साधूया शाश्‍वत विकास

राधानगरी तालुक्‍याचे प्रामुख्याने चार भाग पडतात. या चारही भागांत वेगवेगळ्या प्रकारचे पर्यटन फुलू शकते. यामुळे देशी, विदेशी पर्यटक येथे दोन ते तीन दिवस राहून परकीय चलन आपल्या तालुक्‍यात आणू शकतो. कृषिपर्यटन, जलपर्यटन, वनपर्यटन यांसारख्या असंख्य संधी या तालुक्‍यात निर्माण होऊ शकतात.

कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील निसर्गसंपन्न तालुक्‍यांपैकी राधानगरी हा तसा प्रमुख तालुका. राजर्षी शाहू महाराजांच्या लाडक्‍या कन्या राधाबाई महाराज यांचेच नाव यानगरीला ‘राधानगरी’ म्हणून देण्यात आले. राजर्षी शाहू महाराज, राजाराम महाराज ते छत्रपती शहाजी महाराज या सर्व छत्रपती संस्थानिक राजांचा हा आवडता तालुका. या तालुक्‍यांमुळे आज खऱ्या अर्थाने जिल्हा सुजलाम्‌-सुफलाम्‌ झाला आहे. येथे असणारी विपुल जलसंपदा व नैसर्गिक जैवविविधता यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचे हृदयच हा तालुका आहे. 

तरीही आज कित्येक वर्षांनंतरही या तालुक्‍यामध्ये औद्योगिक विकास होताना दिसत नाही. भौगोलिकदृष्ट्या चारही दिशांना वेगळेपण असलेल्या या तालुक्‍याची परिस्थिती वेगळी आहे. सक्षम लोकप्रतिनिधी आणि सजग नागरिक, युवक यांनी प्रयत्न केल्यास येथे रोजगाराच्या असंख्य वाटा निर्माण करणारा उद्योग लीलया निर्माण होऊ शकतो आणि तो म्हणजे ‘पर्यटन उद्योग’. पर्यटन उद्योग हा आज जगातील दुसऱ्या क्रमांकाचा वेगाने वाढणारा उद्योग आहे. यातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या खूप लोकांना रोजगार मिळतो. तुलनेने या उद्योगामध्ये कष्ट आणि भांडवल कमी वापरले तरी चालते; पण यात स्थानिक माहिती पर्यटकांपर्यंत पोचवणे महत्त्वाचे असते. स्वच्छ नीटनेटके निवासस्थान पर्यटकांना उपलब्ध करून दिल्यास सोयीचे ठरते. या तालुक्‍यात औद्योगिक प्रगती होत नाही, हे कारण सांगत बसण्यापेक्षा पर्यटनातून राधानगरीचा विकास करण्याची आता वेळ आली आहे. 

देशी, विदेशी पर्यटक येथे दोन ते तीन दिवस राहून परकीय चलन आपल्या तालुक्‍यात आणू शकतो. प्रामुख्याने दुर्लक्षित पर्यटनस्थस्थळांचा विचार केल्यास कसबा वाळव्याचा ऐतिहासिक वारसा, तिथल्या दूधगंगा नदीवरील आकर्षक घाट, शेजारील डोंगरावरील चक्रेश्‍वरवाडीचे पुरातन शिवमंदिर, तिथल्या तपस्या मठाचा निसर्गसंपन्न विलोभनीय परिसर, तुरंबेचा सिद्धिविनायक, काळम्मावाडी जलाशय, वाकिघोलातील गर्द जंगल, त्या जंगलात दडलेला जिंजी महल, वाकोबाचे मंदिर, उत्तरेकडे तुळशी जलाशय, त्याच्या बाजूला असलेला ऐतिहासिक किलचा, राशिवडेची फुलशेती, ठिकपुर्लीची बर्फी, गुडाळची स्पेशल रक्तीमुंडी, राधानगरीची दुधाची आमटी, मांगोलीच्या यात्रेतील बोटावर उचलली जाणारी गुंडी अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचे ब्रॅंडिंग होणे गरजेचे आहे. अशी विविधता क्वचितच एखाद्या ठिकाणी आढळते.  

सर्वांचे आकर्षण असणारे, देशी-विदेशी पर्यटकांचे पहिली पसंती असणारे दाजीपूर अभयारण्य, राधानगरीचा लक्ष्मी तलाव, काळम्मावाडी धरण, हत्ती महल, राधानगरी तलावातील बेनगिरी व्हिला, राऊतवाडी धबधबा यांसारख्या पर्यटनस्थळांकडे अलीकडे पर्यटक वाढू लागले आहेत. स्थानिक बायसन नेचर क्‍लबने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी फुलपाखरू, काजवे यांसारखे महोत्सव भरवून राज्यातील पर्यटकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे पर्यटकांत राधानगरीची एक वेगळी ओळख निर्माण होईल. सोशल मीडियाचा वापर करून येथील जास्तीत-जास्त पर्यटनस्थळे दूरवर पोचवली पाहिजेत. यासाठी बायसन नेचर क्‍लबतर्फे वेबसाइट, अँड्रॉइड ॲप सुरू करून एक नवे पाऊल उचलण्यात आले आहे.

राधानगरी धरणस्थळावर राजर्षी शाहू स्मृती केंद्र, राऊतवाडी धबधबा येथे आणलेला परिसर विकास निधी, यांसारख्या गोष्टींमुळे हळूहळू प्रगती होत आहे; पण आता सर्वांनी मिळून एकत्र पर्यटन विकास करण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील पालकमंत्री, खासदार, आमदार, जि. प. सदस्य, पं. स. सभापती, उपसभापती, सदस्य ते प्रत्येक गावच्या सरपंच व नागरिकांनी मिळून राधानगरीचा एक पर्यटन विकास आराखडा तयार करण्याचीही गरज आहे.  

राधानगरी तालुक्‍यातील प्रमुख राज्यमार्ग देवगड-निपाणी आणि कोल्हापूर ते गैबी या मार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी आकर्षक आयलॅंड चौक, सुशोभीकरण करण्याची गरज आहे. राधानगरी धरणावर जसे शाहू स्मृती केंद्र होत आहे. तसे काळम्मावाडी धरणस्थळावरील दुर्लक्षित झालेले प्रतिवृंदावन उद्यान पुन्हा बहरले पाहिजे. तुळशी, हसणे, वलवण या ठिकाणी बोटिंगची सुविधा सुरू केली पाहिजे. ऐतिहासिक हत्ती महल, शिवगड, जिंजी महल यांची पडझड रोखून त्यांचा परिपूर्ण विकास झाला पाहिजे. येथल्या देवराया जैवविविधता पार्क म्हणून संग्रहित केल्या पाहिजेत.

इथले भात संशोधन केंद्र, राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे, राज्यातील पहिला ऐतिहासिक जलविद्युत प्रकल्प, यांचे महत्त्व ओळखून हा आपला वारसा टिकवून ठेवला पाहिजे. दूधगंगा, भोगावती नदी, गैबी बोगदा यांच्या पात्रामध्ये धाडसी पर्यटनाचे पर्याय उपलब्ध केले पाहिजेत. दाजीपूर, शिवगड, किलचा, राक्षादेवी या ठिकाणी ॲडव्हेंचर गेम हब उभारले पाहिजेत. पर्यटनस्थळाजवळ स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून परिसराचा आकर्षक पद्धतीने विकास करून घ्यावा लागेल; तरच राधानगरीच्या पर्यटन विकासाचा राजमार्ग खुला होईल. यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची आज वेळ आली आहे.

( राधानगरी येथील बायसन नेचर क्‍लबचे सदस्य आहेत) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com