योगप्रसारासाठी अमूल्य योगदान

योगप्रसारासाठी अमूल्य योगदान

डॉक्‍टर धनंजय गुंडे गेले, यावर विश्‍वासच बसत नाही. वयाच्या ८२ व्या वर्षीही या गृहस्थाचा उत्साह एखाद्या विशी-पंचविशीतील तरुणालाही लाजवेल असाच होता. त्यांचे ‘शतक’ हुकले याची हुरहूर कायम लागून राहील. योगप्रसारासाठी अव्याहतपणे या वयातही प्रचंड ऊर्जेने कार्यरत राहणे हे वास्तव तसे अद्‌भुतच होते. कारण ते स्वतः योग जगले. इतरांना त्याचे महत्त्व सांगण्यासाठी त्यांनी वाहून घेतले. नुकतेच त्यांचे ९०० वे योग शिबिर कोल्हापुरात संपन्न झाले.

येत्या शनिवारी ता. २८ एप्रिलला त्यांचे कर्नाटकात म्हैसूर येथे योग शिबिर नियोजित होते. ‘योगाच्या माध्यमातून तणावाचे नियोजन’ या विषयावर त्यांचे म्हैसूरवासीयांना मार्गदर्शन मिळण्याचा योग अखेर राहूनच गेला. योग आणि योगप्रसार याविषयी डॉक्‍टरांची तळमळ मनापासून होती. म्हैसूरच्या शिबिराबाबतचा तपशील त्यांनी दोनच दिवसांपूर्वी मला व्हॉटस्‌ॲपवरून कळविला होता. शिवाय केरळमध्ये त्यांच्या मुलीच्या घरात  फुललेल्या कमळाच्या फुलांची छायाचित्रे घेऊन तिही पाठविली होती. त्या फुलांचा टवटवीतपणा मोबाईलवरच्या फोटो गॅलरीतूनही कृत्रिम वाटला नाही, ही डॉक्‍टर गुंडेंच्या शिकवणीची किमया. कारण कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पाहा, आनंदी वृत्तीने जगा, टेन्शन घेऊ नका, निरोगी राहा, आनंदी जगा हे कानमंत्र ते त्यांच्या सहवासात येणाऱ्यांना हक्काने सांगत. 

योग शिबिराच्या माध्यमातून केवळ योगाचे धडे देऊन ते थांबत नसत, तर निरोगी आयुष्यासाठी जीवनशैली बदलण्याचा आग्रह ते धरत. म्हणूनच त्यांच्या शिबिरांना ते सर्वांगीण आरोग्य कार्यशाळा असे म्हणत. आहार, विहार आणि विचार या तीन बाबींवर तुम्ही नियंत्रण मिळवू शकला, तर आरोग्याच्या बऱ्याच समस्या दूर होऊ शकतात, हे ते सोदाहरण पटवून देत. ते जे सांगायचे ते सारे त्यांनी स्वतः आचरणात आणले असल्याने ते सांगण्याचा त्यांचा अधिकार समोरच्याला मान्यच असायचा. त्यांना समक्ष भेटल्यावर त्याचा प्रत्यय येत असे. साडेसहा फूट उंची, गौरवर्ण, प्रकृती अगदी दणकट आणि उत्साहाचा अखंड झरा, असे त्यांचे व्यक्तिमत्त्व भारदस्त असेच होते.

साधारणपणे दर महिन्याला आठवडाभर कालावधीचे एक शिबिर हा परिपाठ त्यांनी अखेरपर्यंत जपला. वास्तविक ९०० शिबिरे ही साधना काही थोडीथोडकी नाही. योग या विषयाला आजकाल जरुर ग्लॅमर प्राप्त झाले आहे. अगदी जागतिकस्तरावरही योगाची महती मान्य झाली आहे; पण कोल्हापूरसारख्या शहरात चार दशकांपूर्वी योगाविषयी जनजागृतीचे काम हाती घेतलेल्या या अवलियाची दूरदृष्टी दाद द्यावी, अशीच आहे. योगप्रसाराचे कार्य करताना केवळ राज्य आणि देशच नव्हे, तर परदेशातही आपल्या कर्तृत्वाची मोहर त्यांनी उमटवली. त्यांची दीडशेहून अधिक शिबिरे परदेशात झाली आहेत.

माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन, माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग अशा मान्यवरांना योगाचे धडे देण्याचे भाग्य त्यांना लाभले. यामध्ये त्यांना त्यांच्या कर्तृत्वाची पोच जरूर मिळाली. देश-विदेशातील अनेक मानसन्मान व पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला. ‘सकाळ’च्या गतवर्षीच्या वर्धापनदिनी १ ऑगस्टला त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला होता. कोल्हापूर भूषण पुरस्कारानेही त्यांचा गौरव करण्यात आला होता. पुरस्कार, मानसन्मान त्यांच्या वाट्याला अनेक आले; पण एक पुरस्कार मात्र राहून गेला याची खंत तमाम कोल्हापूरकरांनाही वाटली पाहिजे. देशपातळीवरील प्रतिष्ठेचा पद्म पुरस्कार त्यांच्या वाट्याला आला नाही. त्यांचे कर्तृत्व पाहता त्यासाठी ते जरूर पात्र होते; पण तो योग काही जुळून आला नाही. 

दरवर्षी उन्हाळी सुटीत त्यांचा प्रवास ठरलेला असे. आताही ते मुलीकडे केरळला गेले होते. या वयातही हा माणूस इतका प्रवास करू शकतो, हे आश्‍चर्याचे होते. गुंडे सरांची अनेक वैशिष्ट्ये होती. ऑर्थोपेडिक सर्जन (एमएस) या नात्याने त्यांचा वैद्यकीय व्यवसायही सुरू होता. शाहूपुरी दुसऱ्या गल्लीतील कृष्णा हॉस्पिटलमध्ये ते रोज काही वेळ वैद्यकीय सेवेसाठी आवर्जून देत; पण खऱ्या अर्थाने त्यांनी योगालाच श्‍वास मानले आणि योगप्रसार हाच ध्यास मानला. ते उत्तम वक्ते होते. लेखन हाही त्यांचा छंद होता. त्यांच्या संपादकत्वाखाली निघणारे ‘योग वार्ता’ हे मासिक गेली २३ वर्षे अव्याहतपणे सुरू आहे.

वृत्तपत्रे, नियतकालिकांतूनही त्यांनी योग या विषयावर लेखन केले. रेडिओच्या माध्यमातूनही लोकांशी नियमित संवाद साधला. व्यसनमुक्ती, शाकाहार याचा प्रसार केला. हास्यचळवळ उभी केली. सामाजिक कार्यातही भाग घेतला. काही काळ राजकारणातही सक्रिय होऊन पाहिले. काही वादविवादही त्यांच्या वाट्याला आले. चौफेर आणि सर्वव्यापी अशा अनुभवाच्या शिदोरीच्या बळावर त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील प्रगल्भता काळानुसारच नव्हे तर त्याही पुढे जाऊन वाढत राहिली.

आजकालची भवतालची स्थिती पाहता डॉक्‍टर गुंडे यांच्या नसण्याने निर्माण झालेली पोकळी भरून न निघणारी आहे. चोहोबाजूला ताणतणाव घेऊन जगणाऱ्या माणसांची गर्दी दिसते. खरे तर टेन्शन हा अणुबॉम्बपेक्षाही भयानक आहे, असे गुंडे यांचे सांगणे होते. कपाळावर आठ्या न आणता जगा. हसतमुखाने आलेल्या परिस्थितीला सामोरे जा. निरोगी व आनंदी जीवनशैली हाच आरोग्याचा गुरुमंत्र आहे हा त्यांचा संदेश ते गेले असले तरी कोणीही विसरू नये, असा आहे. डॉक्‍टरांना योगप्रसाराच्या त्यांच्या कार्यात पत्नी ललिता यांनी दिलेली साथही आवर्जून नोंद घ्यावी, अशी आहे. आदर्श दाम्पत्य पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आले होते. बहुविध गुणसंपन्न अशा एका योगगुरुची एक्‍झिट चटका लावणारी ठरली आहे.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com