हरवले ते गवसले का? 

हरवले ते गवसले का? 

आजकाल व्हाटस अॅपवर आणि फेसबुकवर एक व्हिडिओ सारखा दिसतो. रस्त्यावर कुणी वेडसर किंवा लहान मुले भिक मागताना दिसली तर चौकशी करा. कदाचित ते कुणाचे हरवलेले मुल असु शकेल. अशा आशयाचे किंवा तो वेडसर माणुस किंवा बाई देखिल कुणाची हरवलेली किंवा फसवलेली किंवा स्मृती गेलेली व्यक्ती असु शकते. खरचं जर थोडा सजगपणा दाखवला तर ज्याची व्यक्ती त्याच्या जवळ पोहचु शकते. मी सहजच ते बोलता बोलता आईला सांगितलं. तर तिने एक सत्य घटना मला सांगितली. 

तेव्हा बाबा मुर्तीजापूरला नायब तहसीलदार होते. आई, बाबा व आम्ही बहिणी असे होतो. एकदा आम्ही बहिणी बाहेर खेळत होतो. तेवढ्यात एक सात आठ वर्षांची मुलगी व तिच्यासोबत एक तीन-चार वर्षाचा मुलगा असे भीक मागायला आले.

"काहीतरी वाढ वो माय" ती मुलगी म्हणत होती. आम्ही आईला म्हटले तिला पोळी वगैरे काही देऊ का? सोबत लहान भाऊ पण दिसतोय तिचा. आई म्हणाली "दे मग दोन पोळ्या आणि वाटीभर भाजी आहे. ती पण दे. म्हणजे दोघेही खातील थोडे थोडे." तिला एक पोळी दिली आणि त्या लहान मुलाला एक पोळी दिली. तिने खसकन त्याच्या हातातुन ओढुन घेतली. तो रडायला लागला, पण त्या मुलीने सगळे जेवण एकटीनेच संपवायला सुरवात केली. आम्ही म्हटले अग तुझ्या भावाला पण दे ना. तो लहान आहे ना.

त्यावर ती पटकन म्हणाली तो माझा भाऊ नाही. तेवढ्यात आईने ते ऐकले. ती पटकन बाहेर आली. अन त्या मुलीला म्हणाली भाऊ नाही तर कोण आहे? ती पटकन बोलुन गेली "माझ्या मायने आणलाय कुठुनतरी मला नाही माहीत. याला पण घेऊन जा म्हणाली," म्हणुन आणले सोबत. 

आईने बघितले मुलाचे कपडे घाणीने मळलेले होते पण उंची दिसत होते. एकंदरीत बऱ्या घरचा असावा असे वाटत होते. काय करावे क्षणभर काही सुचेना पण तिने एक केले. ती त्या मुलीला म्हणाली, थांब तुला मी एक फ्रॉक देते माझ्या मुलीचा. ती खुश झाली. तेव्हा घरी पण ऑफिशियल एक नोकर असायचा. आईने त्याला बाबांच्या ऑफिसमध्ये पाठवले व बाबांना घरी ताबडतोब बोलावल्याचा निरोप केला. ऑफिस जवळच होते. बाबा येईस्तोवर आईने त्या दोघांना काही ना काही सांगुन थांबवुन ठेवले. 

बाबा घरी आल्यावर त्यांच्या कानावर सगळे घातले. हा नक्कीच कुणाचा तरी हरवलेला किंवा पळवुन आणलेला मुलगा असावा. या मुलीच्या आईवडिलांना ताब्यात घेतले तर नक्कीच खरे काय ते कळेल. वडिलांनी त्या मुलाला थांबवुन शिपायाला त्या मुलीबरोबर घरी पाठवले. ती बाई आल्यावर तिला विचारताच ती माझाच मुलगा आहे. वगैरे सांगु लागली. थोडा धाक दाखवताच खरे बाहेर आले. 

मागच्या महिन्यात बाजुच्या गावातल्याच जत्रेत हा मुलगा रडत बसलेला सापडला असे तिने कबुल केले. पण भीक मागायला बरा म्हणुन मी त्याला पोलीसात न देता घरी आणले असेही कबुल केले. 

मग तपासचक्र चालु झाले. कुणाची मुल हरवल्याची तक्रार होती वगैरे. सर्व तपास झाला. ते मुल त्या आईवडिलांकडे सुखरुप सुपूर्द केले.  त्यांनी ते मुल सापडण्याची आशाच सोडली होती. रडुनरडुन त्या माऊलीचे अश्रु सुकले होते. पण आईच्या थोडे जागरूक राहिल्याने हे शक्‍य झाले. नाहीतर अजुन एक भिकारी किंवा चोर बदमाश तयार झाला असता पुढे जाऊन. 

ही गोष्ट आठवली त्या पोस्टमुळे. खंरच प्रत्येकाने थोडी चौकशी केली तर असे काही असेल तर ते उघडकीस येण्याची शक्‍यता नक्कीच आहे. तेव्हा सावधपणे असे काही जाणवले तर लक्ष द्या. आपण नेमके उलट करतो. लहान मुल दिसले की सढळ हाताने भीक घालतो. किंवा म्हातारी माणसे असतील तर दया म्हणुन वाढतो, पण तुम्ही भीक का मागता? तुमचे कुणी नाही का? वगैरे विचारच करीत नाही. पण आता हा विचार मनात नक्की येईल. माझ्याच नव्हे तर तुमच्याही... 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com