वार्षिक राशिभविष्य | मेष - जीवनाला कलाटणी; प्रगतीला संधी

Yearly Horoscope 2022
Yearly Horoscope 2022 sakal

ही रास मुळातच अतिशय हुशार, बुद्धिमान व योग्य नियोजन करणारी आहे. त्यामुळे यांचे आडाखे सहसा चुकत नाहीत. या वर्षातील ग्रहमानाचा आढावा पाहता, १३ एप्रिलपर्यंत गुरू अकराव्या स्थानी राहणार आहे. ग्रहमान अतिशय शुभ असून, सर्व कामांत मोठे यश देईल. वारंवार धनलाभ होत राहतील. या काळात वडीलधाऱ्यांचा सल्ला अवश्य माना, तुमचे निश्चितच चांगले होईल. नोकरी-व्यवसायात बढती मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. कौटुंबिक सुख-समाधान उत्तम राहील. विवाहासाठी इच्छुक असाल तर त्यात यश मिळेल. संततीयोग दिसून येतात. मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. जे काम हाती घ्याल, त्यात उत्तम यश मिळवाल.

अत्यंत उत्साही अशी ही मेष रास. कोणत्याही गोष्टीचे प्लॅनिंग करावे ते याच राशीच्या लोकांनी, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आपल्या नशिबात काय आहे, हे जाणून घेण्याची जिज्ञासा असते. मेष रास ब्रह्मांडातील पहिली रास. कोणत्याही गोष्टीची सुरुवात या राशीपासूनच होते. त्यासाठीच मेष राशीतील अश्विनी नक्षत्र आणि वारांचा राजा असलेला रविवार हे दोन्ही ज्यावेळी एकत्र असतील, त्यावेळी केलेले कोणतेही काम हमखास यशस्वी होते, असे ज्योतिषशास्त्र मानते.

येत्या वर्षभरात या राशीच्या लोकांनी कुटुंब आणि परिवाराशी तसेच भावंडांबरोबर एकजुटीने राहिल्यास सर्व तऱ्हेने भाग्योदय होईल. वडिलोपार्जित संपत्ती असेल तर ती या काळात मिळू शकेल. सरकारी क्षेत्राशी संबंध असेल तर त्यातून सतत काही ना काही मोठमोठे लाभ होत जातील. नवीन कामांचे कंत्राट मिळतील. मित्रमंडळींचे उत्तम सहकार्य आणि नवीन नाती जोडण्यास अनुकूल काळ आहे. त्यानंतर वर्षभर गुरू बारावा राहील. परंतु, मुळातच शुभ ग्रह असल्याने त्याचे कोणतेही दुष्परिणाम दिसणार नाहीत. उलट विशेष प्रयत्न न करता लक्ष्मी तुमच्याकडे स्वतःहून चालत येईल. जर या काळात तुम्हाला कोणी मदत केली असेल तर त्याचेही कल्याण होईल. द्रवपदार्थाशी संबंधित व्यवसाय केल्यास त्याचा चांगला फायदा होईल. तुमचे शत्रू कितीही प्रबळ असले तरी त्यांचे काहीही चालणार नाही. या गुरूच्या कालखंडात तुम्हाला कोणत्याही प्रकारे आर्थिक अडचण येणार नाही. जर तुमचे वय ९, ११, १९, ३१, ४२, ४३, ६७, ८४, ८९ असेल अतिशय भाग्यवान ठरणार आहात.

शनीचे भ्रमण २९ एप्रिल २०२२ पर्यंत लाभात राहील. त्यानंतर १२ जुलै २०२२ पासून पुन्हा दशम स्थानी येईल. स्थावर इस्टेटसंदर्भातील कोणताही प्रश्न या कालखंडात सुटेल. घर वगैरे घेण्याच्या विचारात असाल तर त्यात यश मिळवाल. वैवाहिक जीवन चांगले राहील. नोकरी-व्यवसायात उच्च दर्जा प्राप्त करू शकाल. मनातील इच्छा पूर्ण होण्यास हा काळ अनुकूल आहे. या शनीमुळे अत्यंत अवघड कामेही तुम्ही सहज करून दाखवाल. ज्यावेळी या शनीशी रवी अथवा मंगळाचा योग होईल, त्या त्या वेळी जीवनाला कलाटणी देणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या शुभ घटना घडतील. दहावा, अकरावा गुरू म्हणजे एक प्रकारचा राजयोग मानला जातो. त्यामुळे जीवनातील सर्व महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यास हा शनी साहाय्य करेल.

राहू १६ मार्च २०२२ पर्यंत धन स्थानी आणि केतू अष्टम स्थानी राहणार आहे. हा काळ धोकादायक आहे. तुम्ही कितीही बुद्धिमान असलात तरी कळत- नकळत काही गंभीर चुका होतील. त्यासाठी आपण सावध राहणे आवश्यक आहे. या राहूचा कोणताही त्रास होऊ नये यासाठी महामृत्युंजय जप अवश्य करावा. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक. पक्षाघात, लकवा, मानसिक रोग याची शक्यता आहे. अस्त्र, शस्त्र, हत्यारे यापासून दूर राहा. कोर्ट प्रकरणे असतील तर जरा जपून राहा. त्यानंतर राहू तुमच्या राशीत आणि केतू सप्तमात येत आहे. शरीर प्रकृती उत्तम राहील. लोकांमध्ये मानसन्मान आणि आदर मिळेल. तुमच्या कामाचे स्वरूप पाहून नवनवीन कामे मिळत राहतील. नोकरीविषयक एखादे उच्च पद मिळू शकते. या राहूच्या प्रभावामुळे चांगल्यातली चांगली कामे करू शकाल. चंद्र आणि राहू हे दोन्ही परस्पर शत्रू असल्याने कोणतेही काम वेळेवर होईलच, या आशेत राहू नका. जीवनात आकस्मिक बदल घडवून आणणे, हा या हर्षल राहूचा गुणधर्म आहे. तुमच्या जीवनात यावर्षी बऱ्याच अतिमहत्त्वाच्या घटना घडणार आहेत. त्या चांगल्या असतील किंवा त्रासदायकही असू शकतील. विवाहाच्या दृष्टीने एप्रिलपर्यंत अनुकूल योग आहेत. नोकरीच्या बाबतीत हे वर्ष उत्तम जाईल. नवीन व्यवसाय सुरू करणार असाल तर या काळात करण्यास हरकत नाही.

मासिक फलाफल -

  • जानेवारी - रवी, शनी, बुध दशमात आहेत. अशा योगावर नोकरी-व्यवसायात फार जपून राहणे आवश्यक ठरते. किरकोळ कारणावरून नोकरीत त्रास होऊ शकतो. शक्यतो कुणाचेही मन न दुखवता आपले काम करीत राहा. या योगावर एखादे मोठे न होणारे कामही होऊन जाईल. ती संक्रांत वर्षभर तुम्हाला धनलाभ घडवीत राहील.

  • फेब्रुवारी - मंगळ, बुध, शुक्र, शनी, प्लुटो अशी पाच ग्रहांची युती होत आहे. तुमच्या जीवनाला नक्कीच काही तरी कलाटणी मिळेल. तुमच्यापैकी काही जणांचे संपूर्ण जीवन बदलून जाईल, असे ग्रहमान दर्शवित आहे. कामाचा व्याप वाढेल. नवीन जबाबदारी, पगारवाढ, विवाह योग या दृष्टीनेही शुभ फळे मिळतील; पण मंगळ, शनी योगावर काही वेळा स्वभावात ताठरपणा निर्माण होतो. त्यामुळे वाकडेपणाही येऊ शकेल. अपघात व दुर्घटनादर्शक असल्याने वाहन जपून चालवा.

  • मार्च - रवि, बुधाचे भ्रमण काही बाबतीत दगदग वाढवेल. दशमातील मंगळ, शुक्र, शनि कामाचे स्वरूप बदलतील. जबाबदारी वाढली तरी त्या प्रमाणात पैसाही भरपूर प्रमाणात मिळेल. जिथे नोकरी-व्यवसाय करीत असाल, तेथेच एखाद्या व्यक्तीची ओळख होऊन विवाहाची मागणी होऊ शकते. या महिन्यात सर्व प्रकारचे कागदपत्रे व्यवहार जपून करावेत.

  • एप्रिल - रवि, राहू, हर्षल तुमच्या कार्यकर्तृत्वाला प्रोत्साहन देतील. कोणतेही काम जिद्दीने पूर्ण करण्याची उमेद निर्माण होईल. मंगळ सर्व बाबतीत यश देणार असला तरी आरोग्याच्या तक्रारी, वाहन अपघात या दृष्टीने अनिष्ट फलसूचक आहेत. गुरु शुक्राचे बाराव्या स्थानातील भ्रमण परदेश प्रवास, परदेशी संस्थांशी व्यवहार, आर्थिक लाभ या दृष्टीने चांगले आहे. मोठे व्यवहार, धनलाभ, देवीकृपा, आध्यात्मिक बाबतीत यश या दृष्टीने अतिशय चांगले फळ मिळेल.

  • मे - तुमच्या राशीतच येणारे शुक्र, राहू मनःस्थिती दोलायमान ठेवतील. नक्की काय करावे, ते कळणार नाही. गुरू बाराव्या स्थानी असल्याने दैवी कृपेने सर्व काही मिळून जाईल; पण त्याचबरोबर तुमचा उत्कर्ष काही जणांना सहन न झाल्याने ते तुमची बदनामी करण्याचा प्रयत्न करतील. यादृष्टीने तुम्ही सावध राहणे आवश्यक आहे. नोकरीच्या बाबतीत जरा कठीण काळ आहे. कोणाची तरी चूक तुमच्या अंगलट येऊ शकते; पण शनीचे भ्रमण ‘न भूतो-न भविष्यति’ असे प्रचंड यश देऊन जाईल.

  • जून - धनस्थानातील ग्रह कोणतेही आर्थिक व्यवहार यशस्वी करतील. शनि, शुक्र केंद्रयोग. वैवाहिक जीवनात शुभ घटना घडतील. राहू, मंगळ, हर्षलचा योग तुमच्या शरीरात उष्णता वाढवेल. प्रचंड धाडसही निर्माण करील. इतरांना अशक्य असलेली कामे तुम्ही सहज साध्य करून दाखवाल; पण या योगावर काही वेळा घराण्यातील पूर्वजांचे दोषही परिणाम दर्शवू शकतात. जीवनात अचानक महत्त्वाच्या गोष्टी घडविणे हा हर्षलचा गुण आहे. त्यामुळे तडकाफडकी काही महत्त्वाचे निर्णय घ्याल.

  • जुलै - रवि, शनिचा प्रतियोग सर्व बाबतीत सांभाळून राहण्यास सुचवत आहे. राहू, मंगळ, हर्षल, केतू हे आरोग्य तक्रारी, अपघात, आजार, गंडांतर या दृष्टीने त्रासदायक आहेत. कोणतेही धोकादायक कृत्य करू नका. ते अंगलट येऊ शकते. शुक्रामुळे कागदोपत्री व्यवहारात चांगले यश मिळेल.

  • ऑगस्ट - बुधाचे भ्रमण सर्वदृष्टीने अनुकूल आहे. मानसन्मान, पैसाअडका या दृष्टीने शुभ फलदायक आहे. मुलाबाळांच्या बाबतीत शुभ घटना घडतील. परदेश प्रवासाचा योग आहे. नोकरी-व्यवसायात महत्त्वाच्या पदासाठी तुमच्या नावाची शिफारस केली जाईल. आतापर्यंत रखडलेली काही महत्त्वाची कामे या महिन्यात सहज हातावेगळी होतील.

  • सप्टेंबर - रवि, बुध, गुरू, शुक्र यांचा होणारा प्रतियोग सर्व बाबतीत शुभ फलदायक आहे. कोणतेही काम यशस्वी होईल. पण, त्याचे पूर्वनियोजन मात्र आवश्यक आहे. खर्चाचे प्रमाण वाढले तरी तो खर्च सत्कारणी लागेल. जागा, वाहन, फ्लॅट, घरदार, खरेदी-विक्री यादृष्टीने अनुकूल आहे. काही कारणाने रखडलेली सरकारी कामे सहज पूर्ण होऊ शकतील.

  • ऑक्टोबर - रवि, बुध, शुक्र वैवाहिक जीवनात काहीतरी खळबळ माजवतील. संशयाला वाव मिळेल, असे कोणतेही कृत्य करू नका. कुणीतरी मुद्दाम नको त्या प्रकरणात अडकविण्याचा प्रयत्न करेल. जर कोणी कोठे सही करण्यास सांगितल्यास पूर्ण विचारांती निर्णय घ्या. पोलिस प्रकरणे, कोर्ट मॅटर अशा प्रकारांपासून दूर राहा. ग्रहमान अत्यंत विचित्र आहे. त्यामुळे सर्व बाबतीत सावध राहूनच कामे करीत राहा. घाईगडबडीत कोणतेही निर्णय घेऊ नका.

  • नोव्हेंबर - या महिन्यात अनेक महत्त्वाचे ग्रह बदलणार आहेत. त्यामुळे तुमच्या कामकाजाच्या पद्धतीतही बदल होतील. नवीन जबाबदाऱ्या पडतील. काहीतरी नवीन करून दाखवाल. महत्त्वाच्या मोठ्या कामकाजात अनेकांचे उत्तम सहकार्य मिळणार आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील.

  • डिसेंबर - अचानक घडणाऱ्या काही घडामोडींमुळे महत्त्वाचे बेत बदलले जातील. दूरचे प्रवासयोग, किमती वस्तूंची खरेदी होईल. काही कारणाने दुरावलेल्या व्यक्ती पुन्हा जवळ येण्याची शक्यता. हुंडा देणे-घेणे अथवा गैरसमज यामुळे लग्न मोडले असेल तर ते पुन्हा जुळू शकेल. या महिन्यात जे काम हाती घ्याल, ते निश्चितच पूर्ण करून दाखवाल. त्यामुळे तुमचा मानसन्मानही वाढेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com