वार्षिक राशिभविष्य | कर्क - संपूर्ण वर्ष आर्थिकदृष्ट्या उत्तम

Yearly Horoscope 2022
Yearly Horoscope 2022sakal

अत्यंत भावनाशील व कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेण्याची वृत्ती असलेली रास म्हणजे कर्क. या राशीचे लोक मुळातच आकर्षक, देखणे, मनमिळावू व कुणाचेही मन सहज आकर्षून घेणारे असतात. कितीही राग आला तरी तो फार काळ टिकत नाही; पण अपमान मात्र सहन करून घेत नाहीत. रास कोणतीही असो; पण नशिबाचा कारक असलेला चंद्र या राशीचा मालक आहे. त्यामुळे कोणाचे नशीब कसे उजळेल? दैवीकृपा कशी राहील? आर्थिक भरभराट, जीवनाची उपजीविका, मानसन्मान, लोकप्रियता तसेच गजकेसरी योग या राशीवरूनच पाहिला जातो.

संपूर्ण देवदेवता आणि स्वर्गाची तिजोरी सांभाळणारा कुबेर या राशीतील एका नक्षत्रावर खूश असतो. ही रास जर बलवान असेल, तर ज्या कुटुंबात जातील तेथे निश्चितच भरभराट करतील. मात्र, या लोकांशी जर कोणी कपटाने वागल्यास त्यांची धूळदाण उडण्यास वेळ लागत नाही. निसर्गातील वृक्षवल्ली, प्राणी, कीटक, पशुपक्षी यावर या राशीचा अंमल आहे. त्यामुळे मुक्या प्राण्यांची हत्या केल्यास चंद्र-शनीचा दोष लागतो. परिणामी, आर्थिक स्थिती दोलायमान होते. गुलाबी व पांढरे रंग या राशीला आवडतात. त्यामुळे वस्त्रप्रावरणे आणि गाडीचा रंग अथवा घरातील भिंतीचा रंग वगैरे जर वरीलप्रमाणे असतील, तर ते निश्चितच भाग्योदय करतील. या वर्षातील ग्रहाची रूपरेषा या राशीला काय फळ देईल, याचा थोडक्यात अंदाज पुढे दिलेला आहे. मात्र, प्रत्येकाच्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहमानानुसार त्याचे कमी-जास्त प्रमाणात अनुभव येतील. त्यामुळे राजयोग होत असेल तर हुरळून जाऊ नये आणि धोकादायक योग असतील तर घाबरू नये.

वर्षभर शनी महाराज राशीच्या सप्तम स्थानी राहणार आहेत. विवाहाच्या प्रयत्नात असाल, तर शनीचे गुणधर्म असलेला विवाह साथी मिळेल. जरासा विलंबही होऊ शकतो. दूरदर्शीपणा आणि काटकसर यामुळे आर्थिक व सामाजिकदृष्ट्या प्रतिष्ठित राहाल. भागीदारी आणि कोर्ट प्रकरण चुकूनही करू नका; पण सध्या चालू असतील तर जपून राहा. राहती वास्तू तुमच्या सर्व विचारांना तथास्तु म्हणत असते. त्यामुळे राहत्या घरात चुकूनही तोंडातून शब्द काढू नका. कारखानदारी, यंत्रसामुग्री, मशिनरी, वकिली वगैरे कामधंद्यात मोठा लाभ होईल. पती-पत्नींनी एकमेकांची मनं सांभाळल्यास आर्थिक भरभराट होईल. कमाईचे अनेक मार्ग उपलब्ध होतील. या कालखंडात प्रेम प्रकरणात अडकू नका. डोळ्यांचीही काळजी घ्यावी लागेल.

१६ मार्चपर्यंत राहू लाभात व केतू पंचमात राहणार आहे. काही गुप्त गोष्टीतून धनलाभ होतील. स्वतःच्या कामात सावध राहा. कुणावरही अवलंबून राहू नका. अफाट खर्च, चोरी, बदनामी तसेच स्थावर इस्टेट बाबतीत घोटाळे जाणवतील. काही जणांना ‘ध’चा ‘मा’ झालेला दिसून येईल. तरुण-तरुणींनी अति सलगीपासून दूर राहावे. संसारी जीवनात संशयी वातावरण निर्माण होऊ देऊ नका. स्वतंत्र व्यवसाय असेल तर काळजी घ्या. मार्चनंतर राहू दशमात येईल, तेथे राजयोगकारक व चांगली फळे देईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण करू शकाल. राजकारणात जाण्याची संधी मिळेल. काही भाग्यवंतांना परदेशी जाण्याची संधी. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वकष्टाने वर याल. नोकरी व्यवसायात अचानक बदल होण्याची शक्यता. पैसा, प्रतिष्ठा, मानसन्मान आणि अधिकारप्राप्ती यादृष्टीने उत्तम अनुभव येतील. मित्रमंडळी व काही नातेवाईक यांच्याकडून काहीतरी वेगळा अनुभव येईल. आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

गेल्या कित्येक वर्षांपासून नेपच्यून अष्टमात आहे. आकस्मिक धनलाभ होतील; पण तो पैसा टिकेल याची खात्री नाही. अपघात, विषारी पदार्थ किंवा चुकीच्या औषधांमुळे धोका, तसेच मादक अंमली पदार्थ यांच्या आहारी जाणे, मनात नको ते विचार येणे, विवाह सौख्यात अडचणी, विश्वासघात, पाण्यापासून धोका, विषारी वायूच्या प्रादुर्भावामुळे श्वसन विकार असे अनुभव येतील. हर्षल ग्रह दशम स्थानी आहे. नोकरी-व्यवसायात ध्यानीमनी नसताना अचानक महत्त्वाचे फेरफार घडतील. स्वतंत्र विचारसरणीमुळे काहीजण तुमचे शत्रू होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक जीवनात असाल, तर अब्रूला जपा. उद्योग व्यवसायात काही नव्या गोष्टींचे उत्पादन करा. त्यातून बराच फायदा होईल.

गुरूचे भ्रमण एप्रिलपर्यंत अष्टमात आहे. काही प्रमाणात भागीदारी व्यवसाय आणि विवाहामुळे फायदा होईल. जर तुमचे वय ३६ ते ३८ असेल, तर मोठा धंदा व त्याद्वारे धनलाभ होईल. एप्रिलनंतर गुरू भाग्यात येत असून तो सर्व दृष्टीने तुम्हाला अतिशय शुभ ठरणार आहे. विवाह, भाग्योदय, संततीप्राप्ती, मंगल कार्य, नोकरी-व्यवसायात उन्नती, परदेश प्रवास, सामाजिक मान्यता, दैवी कृपा लाभणे, त्याची चांगली फळे मिळतील. संपूर्ण वर्षभर गुरूचे पाठबळ मिळणार आहे. या कालखंडात जर चांगली नोकरी मिळाली, तर तुमच्या जीवनाचे सोने होईल. आर्थिक स्थैर्यही लाभेल.

मासिक फलाफल -

  • जानेवारी - या राशीतील सर्वच नक्षत्रांना हे वर्ष सर्व तऱ्हेच्या इच्छा पूर्ण करण्यास मदत करेल. सर्व प्रकारचे सुखोपभोग, ऐषोरामी जीवन, नयनरम्य ठिकाणी प्रवास, स्वतःची वास्तू किंवा वाहन होणे, असे अनुभव येतील.

  • फेब्रुवारी - कुणाच्याही प्रकरणात चुकूनही मध्यस्थी करू नका. आपण बरे, आपले काम बरे ही वृत्ती ठेवा. कुणालाही निष्कारण मदत करण्यास जाऊ नका. कायदेशीर बाबतीत चांगले यश मिळेल. सर्व प्रकारच्या दुर्घटनेपासून जपा.

  • मार्च - विवाहस्थानी अनेक ग्रहांची युती होत आहे. महत्त्वाचे आर्थिक व्यवहार जपून करा. वैवाहिक जीवनात एखाद्या व्यक्तीमुळे संघर्षाला वाव मिळेल. अपघात, आजार, गंडांतर, प्रवासात धोका, चोऱ्यामाऱ्या यापासून जपावे लागेल; पण जागे संदर्भातील कोणतीही कामे यशस्वी होतील. आर्थिक व्यवहारात जागरुक राहणे आवश्यक.

  • एप्रिल - अष्टमात मंगळ-शनी असल्याने वाहन जपून चालवा. कोणत्याही बाबतीत बेफिकीर राहू नका. दशमात रवी, राहू, हर्षल एखादे न होणारे मोठे काम अचानक होईल. बेरोजगारांना नोकरी मिळेल. मुलाखतीत चांगले यश; पण विचित्र प्रश्न विचारले जातील. सरकारी नोकरी मिळण्याचे योग. काही जणांना या ठिकाणी काम करण्याची संधी मिळेल.

  • मे - नोकरीच्या ठिकाणी आपुलकी अथवा सलगीचे रूपांतर प्रेम प्रकरणात होईल. लग्नाची मागणी घातली जाईल. प्रवासामुळे फायदा आणि प्रतिष्ठा वाढेल. भावंडात मान मिळेल. नव्या कामाच्या ऑफर येतील; पण मागील कोणतीही कामे रखडत ठेवू नका.

  • जून - बुध-शुक्र युतीचा लाभदायक परिणाम होईल. व्यवसाय जोरात चालेल. दशमात मंगळ-राहू नोकरीत काहीतरी खळबळ माजवतील किंवा एखादे न जमणार काम सोपविले जाईल. त्यामुळे नोकरी ठेवावी की सोडावी, असा संभ्रम निर्माण होईल. तरीसुद्धा घाईगडबडीत कोणताही अंतिम निर्णय घेऊ नका.

  • जुलै - शनी-रवी प्रतियोग आरोग्याची काळजी घेण्यास सुचवित आहे. वैवाहिक जीवनात मतभेद संभवतात. नोकरी-व्यवसाय, भाग्योदय, भरभराट, कर्जफेड, विवाहकार्य, परदेश प्रवास, हरवलेली वस्तू परत मिळणे तसेच हातून गेलेली इस्टेट पुन्हा मिळणे या दृष्टीने ग्रहमान अनुकूल आहे. जर योग्य चातुर्य पडल्यास हा महिना सर्व कामात मोठे यश देईल.

  • ऑगस्ट - काही अपेक्षा साध्य होण्यासाठी काहीतरी गमवावे लागते, याचा अनुभव येईल. तडजोड, सामंजस्य चातुर्य आणि गोड बोलणे यांच्या जोरावर अनेक मोठ्या संकटातून पार पडाल. ऐन संकटात काही मित्रमंडळी अथवा नातेवाईक मदत करतील; पण त्याच्या मनात काहीतरी स्वार्थ असण्याची शक्यता आहे.

  • सप्टेंबर - सुवर्णकाळाची सुरुवात होत आहे. धनलाभ, भूमिप्राप्ती, नोकरीत यश, व्यवसायात वाढ, संततीप्राप्ती, मानसिक समाधान, अर्थ लाभ, सामाजिक मान्यता, अंगीकृत कलेला योग्य न्याय मिळणे, असे सुंदर अनुभव येतील. काही प्रमाणात त्रास झाला तरी इतर बाबतीत ग्रहमान अतिशय उत्तम आहे. या महिन्यात जर नवीन नोकरी किंवा विवाहाच्या चांगल्या संधी आल्यास त्या सोडू नका. कारण, त्यातच तुमचे भाग्य दडलेले आहे.

  • ऑक्टोबर - शापित योगातील ग्रहमान आहे. किरकोळ चुकामुळे हातातोंडाशी आलेल्या संधी हुकतील. काही महत्त्वाच्या कामातील अंदाज चुकण्याची शक्यता. घरातील काही शापित दोष डोके वर काढतील. त्यामुळे प्रत्येक कामात अडथळे येतील.

  • नोव्हेंबर - संतती व वडीलधाऱ्यांशी खटके उडतील. काही व्यावहारिक गणिते जपून सोडवावी लागतील. काहीजण तुमची चूक शोधून तुमच्याकडून महत्त्वाची माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करतील. सावध राहा.

  • डिसेंबर - नोकरी-व्यवसाय, संसारिक जीवन व शिक्षणात अडचणी जाणवतील. नोकरीत अतिरिक्त कामाचा भार पडेल. काही-महत्त्वाच्या बाबीत तुमचा सल्ला घेतला जाईल; पण त्याचे श्रेय तुम्हाला मिळणार नाही. आर्थिक बाबतीत मध्यम योग आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com