वार्षिक राशिभविष्य | मीन - धनप्राप्ती वाढेल; उत्कर्षही होईल

Yearly Horoscope
Yearly Horoscopesakal

देव कुणावरही अन्याय करीत नाही. तो प्रत्येकाला संधी देतो; मात्र तिचा वापर कसा करावा, हे अनेकांना समजत नाही. त्यामुळे दिलेल्या संधीचे सोने कसे करावे, हे शिकवणारी मीन रास आहे. समुद्रमंथनातून वर आलेली चौदा रत्ने, सागरी जलाशय, मीठ, समुद्र, भरती-ओहोटी, मनाचा मोठेपणा, सागरकन्या, लक्ष्मी, पाताळ क्षेत्र, त्या क्षेत्राचा राजा नागपाल, प्रचंड सागरी वादळ या सर्वांवर सत्ता असणारी रास म्हणजे मीन होय. संपूर्ण वर्ष विवाह, संतती सौख्य व आर्थिक बाबतीत उत्तम असून, कौटुंबिक वातावरण चांगले राहील. नवे उद्योग, कारखाना सुरू करण्यासही अनुकूल स्थिती असेल.

माणसाने आकाशाला स्पर्श करावा; पण पाय जमिनीवर पाहिजेत, हे शिकवणारी ही मीन रास. विष व अमृत, कुबेराचे धन व लक्ष्मी यांच्या मालकीची ही रास. बुध, गुरु, शनि यांचे प्रभुत्वही याच राशीवर असते. शुक्र आणि गुरु हे दोघेही पवित्र ग्रह या राशीत आनंदी असतात. मात्र, या राशीचे लोक रागाच्या भरात काहीतरी पटकन बोलून जातात. त्यामुळे माणसे तुटतात. सर्व काही चांगले असूनही केवळ बोलण्यातून गैरसमज निर्माण होऊन यांच्यापासून लोक दुरावले जातात. यासाठी या राशीच्या लोकांनी राग व बोलण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. यावर्षीचे ग्रह-तारे या राशीला कसे फळ देतील, त्याचा थोडक्यात अंदाज येथे दिला आहे. प्रत्येकाच्या वैयक्तिक ग्रहमानानुसार त्याचे कमी-जास्त अनुभव येऊ शकतात. राशिस्वामी गुरु १३ एप्रिलपर्यंत बाराव्या स्थानी आहे. हे स्थान गुरुला विशेष मानवत नाही; पण तरीही खासगी सोसायट्या, पुजारी, पुरोहितवर्ग, प्रयोगशाळा, रुग्णालय, निवारा केंद्रे अशा क्षेत्रात असलेल्यांना अत्यंत चांगला काळ. एप्रिलनंतर गुरु गजकेसरी योगात येत असून, तो तुम्हाला राज, ऐश्वर्य, श्रीमंती, भरभराट, मुलाबाळांचे कल्याण, विवाह जुळणे, भागीदारी व्यवसायात उन्नती, आरोग्यात सुधारणा तसेच आध्यात्मिक क्षेत्रात मोठे यश मिळवून देईल. जसे शिक्षण असेल त्याप्रमाणे उच्च नोकरीही मिळेल. आपल्याकडे जर असामान्य कलाकौशल्य असेल तर जगाचे लक्ष तुम्ही वेधू शकाल. स्वतःची इस्टेट होईल. कुणाच्या तरी विवाहातून भाग्य उजळेल. काही जणांना वंशपरंपरेने मोठे धन मिळू शकते. राजासारखा मानसन्मान मिळेल. प्रापंचिक जीवन सुखी राहील. स्वकष्टाने कमाई कराल. त्यात सतत वाढ होत राहील.

वर्षभर शनीचे भ्रमण चांगले असल्याने सतत काही ना काही मोठे लाभ होत राहतील. अनेक मार्गांनी धनलाभ होण्याची शक्यता आहे. मित्रांच्या सल्ल्याने उत्कर्ष होऊ शकेल. या शनीची दुसरी बाजू म्हणजे काही वेळा हलक्या दर्जाचा कामधंदा करावा लागेल. संतती होण्यात अडथळे, कर्ज वाढणे, व्यसनामुळे नुकसान असे प्रकारही घडू शकतात. मार्चपर्यंत राहू तृतीय स्थानी असल्याने तो सर्व कामांत यश मिळवून देईल. केलेल्या कष्टाचे चीज होईल. लोक तुमच्याकडे आदराने पाहू लागतील. इतरांना अवघड वाटणारे काम तुम्ही सहज करून दाखवाल; पण भावंडे व नातेवाईकांशी वादविवाद संभवतात. काही कारणाने भावंडे दूर जाण्याची शक्यता आहे. मित्रमंडळी व काही नातेवाईक यांच्याकडून काहीतरी वेगळा अनुभव येईल. मार्चनंतर राहू धनस्थानी येईल. डोळ्यांची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक आवक जरा मंदावण्याची शक्यता आहे. त्यामुळे खर्चावर वेळीच नियंत्रण ठेवा. एखाद्याला सहज म्हणून दिलेला आसरा किंवा भाडेकरू तुम्हाला डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

राहू कालखंडात तुम्ही आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगणे गरजेचे आहे. अति मोहापायी काही वेळा नको ते काम करण्याकडे वृत्ती वळेल. हर्षल गेल्या वर्षीप्रमाणे याहीवर्षी धनस्थानी राहणार आहे. अचानक लाभ आणि नुकसान अशी त्याची फळे मिळतील. नेपच्यून बाराव्या स्थानी आहे. घोटाळे, राजकारण यांच्यामुळे व्यवहारात अडचणी येऊ शकतात. अमली पदार्थ आणि व्यसनी लोकांपासून दूर राहा. लाभस्थानी प्लुटो असल्याने राजकारणातील व्यक्तींना सुवर्णकाळ समजावा. या वर्षात परदेशी जाण्याची इच्छा पूर्ण होईल. हरवलेली वस्तू अथवा व्यक्ती पुन्हा परत मिळण्याची शक्यता आहे. मात्र, संपूर्ण वर्षभरात कोणतेही आर्थिक व्यवहार अत्यंत जपून करणे गरजेचे आहे. पैसा, प्रतिष्ठा, मानसन्मान आणि अधिकारप्राप्ती यादृष्टीने उत्तम अनुभव येतील.

मासिक फलाफल -

  • जानेवारी - या राशीतील सर्वच नक्षत्रांना वर्षभर सतत विपुल धन मिळत राहील, असे संक्रांतीचे फळ आहे. एखादा बंद पडलेला उद्योग अथवा कारखाना मिळाल्यास तो घेऊन त्याचा विकास करा, तुमची प्रगती होईल. नोकरीतील कंटाळवाणे वातावरण बदलेल व तुम्हाला चांगले पद मिळेल.

  • फेब्रुवारी - मंगळ-शुक्र योगावर अपेक्षेपेक्षा चांगली नोकरी मिळेल. व्यावसायिक वातावरण समाधानकारक राहील. आर्थिक अडचण जाणवणार नाही. जर विवाहाच्या प्रयत्नात असाल तर नोकरीच्या ठिकाणी ओळखीतून एखादे चांगले स्थळ मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात मंगलकार्य होण्याची शक्यता आहे. कुणाची तरी पुण्याई फळाला येते असे म्हणतात, त्याचा अनुभव येईल.

  • मार्च - लाभस्थानातील शनी, मंगळ, शुक्र सहयोग जागेसंदर्भातील कामे यशस्वी करून देईल. एकदम मोठा कारखाना वगैरे घेण्याची इच्छा असेल तर सध्या अनुकूल काळ आहे. कुलिक कालसर्प योगाचा प्रभाव सुरू आहे. भावंडे व कुटुंबातील लोकांकडून त्रास होऊ शकतो. मित्र धोका देतील. नोकरीधंद्यात अडचणींना तोंड द्यावे लागेल.

  • एप्रिल - आध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तींना उत्तम काळ. महत्त्वाची कागदपत्रे तसेच महत्त्वाची माहिती मोबाईलमध्ये असेल तर जरा काळजी घ्यावी लागेल. दूषित बुध असल्याने कुणीतरी तुमची बनावट सही करून तुम्हाला गोत्यात आणण्याचा प्रयत्न करतील, सावध राहा.

  • मे - कोणतेही सरकारी काम पटकन करून घ्या, ग्रहमान अनुकूल आहे. आर्थिक स्थिती सुधारेल. काही महत्त्वाची कामे होण्यासाठी अधिकाऱ्यांची मर्जी सांभाळावी लागेल. घराचे बांधकाम साहित्य खरेदी, सरकारी परवानगी व तत्सम कामे या महिन्यात करून घ्या. नोकरी-व्यवसायात परिस्थिती सर्व दृष्टीने अनुकूल राहील.

  • जून - व्यवसायाच्या नवीन क्षेत्रात प्रवेश कराल. जे काम हाती घ्याल, ते यशस्वी होईल. बुध, शुक्राचे भ्रमण महत्त्वाचा पत्रव्यवहार व वाटाघाटीस अनुकूल आहे. राहू, मंगळ, हर्षल अचानक आर्थिक घोटाळे निर्माण करण्याची शक्यता आहे.

  • जुलै - रवि-शनिचा प्रतियोग मुलाबाळांचे आरोग्य व शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नका, असे सुचवत आहे. काही मित्रमंडळी वाहन, मोबाईल किंवा तत्सम किमती वस्तू मागतील. मात्र, त्याचा गैरवापर होऊ शकतो. त्यामुळे सावध राहावे. पूर्वी जर एखादे मोठे काम केले असेल तर त्याचा आर्थिक मोबदला मिळेल.

  • ऑगस्ट - रवि, बुध, शुक्र सर्व बाबतीत सहाय्यक आहेत. कोणत्याही कामात अडचण येणार नाही. तुमच्या कामाचे नियोजन चांगले असेल तर फार मोठे यश मिळू शकते. कर्तबगारीला वाव मिळेल. नोकरी गेलेली असेल तर ती बढतीसह परत मिळण्याची शक्यता आहे. काही मोठ्या सरकारी अधिकाऱ्यांची ओळख होऊन त्यांच्याकडून मोठी कामे होतील. तसेच, सरकारदरबारी तुमच्या कामाची नोंदही घेतली जाईल.

  • सप्टेंबर - ग्रहमान सर्व बाबतीत यश देणार आहे. तुमचे प्रयत्न जर योग्य दिशेने सुरू असतील, तर काहीही अडचण न येता तुमचे काम होईल. एखाद्या मोठ्या फर्ममध्ये आर्थिक गुंतवणूक करण्याची संधी मिळेल. शेअर बाजाराशी संबंध असेल तर त्यात मोठा लाभ होऊ शकतो; पण प्रत्येक बाबतीत व्यवहारी बुद्धी ठेवावी लागेल.

  • ऑक्टोबर - अष्टमस्थानी महत्त्वाचे चार ग्रह प्रत्येक गोष्टीत अडथळे निर्माण करतील. ज्यांच्यावर एखादे काम सोपविले ते काम ते करतीलच, याची शाश्वती नाही. मानसिक संभ्रम निर्माण करणारे ग्रहयोग आहेत. कालसर्प योगामुळे अनेक महत्त्वाची कामे रखडतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. मित्रमंडळींच्या थट्टामस्करीत कुणाच्या तरी वर्मावर बोट ठेवले जाईल. त्यामुळे निष्कारण कटुता निर्माण होईल. त्यासाठी बोलण्याकडे लक्ष ठेवा. महत्त्वाचे व्यवहार शक्यतो कोणालाही सांगू नका. त्याचा गैरवापर होऊ शकतो.

  • नोव्हेंबर - उत्तम आर्थिक लाभ. नोकरी-व्यवसायात आनंदी वातावरण; पण केतूमुळे नुकसान, चोरी व व्यसन या दृष्टीने त्रासदायक फळे मिळतील.

  • डिसेंबर - सर्व कार्यात यश मिळेल. नोकरी-व्यवसायात प्रगती व उच्चपद मिळण्याची शक्यता. मात्र, प्रवासात अडचणी व नुकसान संभवते. त्यासाठी साहित्याची यादी तपासूनच जा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com