वार्षिक राशिभविष्य | वृश्‍चिक - आर्थिक स्थिती उत्तम; स्वास्थ्यही लाभेल

Yearly Horoscope
Yearly Horoscopesakal

वाघ आणि हरीण यांसारख्या परस्परविरोधी तत्त्वाच्या योनी वृश्‍चिक राशीत आहेत. सर्व प्रकारचे रासायनिक कारखाने, मशिनरीशी संबंधित कारखानदारी, सीआयडी, शस्त्रक्रिया, वैद्यकीय क्षेत्र, वाहते पाणी, नदी व झरे आहेत, तेथे या राशीचे प्राबल्य विशेष दिसून येते. एखाद्या कुरूप व्यक्तीला प्लास्टिक सर्जरी अथवा ब्यूटी पार्लरमध्ये अत्यंत सुंदर बनविणाऱ्या व्यक्ती याच राशीच्या असतात. यावरून या राशीचे महत्त्व समजून येईल.

हल्लीच्या जगात यशस्वी व्हायचे असेल तर फॅशन, आकर्षकपणा आणि नवनवीन काहीतरी करून दाखविण्याची इच्छा असणे अतिशय महत्त्वाचे आहे, हे शिकविणारी रास म्हणजे वृश्चिक. सर्व प्रकारची अस्वच्छता, अन्याय, फसवणूक, दगाफटका, अफरातफर, गैरव्यवहार असेल तर जीवनात काय गोंधळ उडू शकतो, याचे सम्यक दर्शन घडविणारी ही रास.

धाडस, धडाडी, उत्साह, मी करीन ती पूर्व दिशा, जिद्द, एखाद्या टाकाऊ वस्तूलाही फॅशनचे नाव देऊन तिचे महत्त्व वाढवणारी ही रास. या राशीकडे काय आहे, असे म्हणण्यापेक्षा काय नाही ते विचारा. मनुष्यप्राण्याला जगण्यासाठी जे जे आवश्यक आहे, ते ते कसे व कोणत्या मार्गाने मिळवावे, हे याच राशीकडून शिकावे. ज्येष्ठा नक्षत्राचा क्रूरपणा, खुनशी वृत्ती, अनुराधा नक्षत्राचे मादक सौंदर्य आणि शालीनता; तर विशाखा नक्षत्राचे कपट-कारस्थान, एखाद्याला कसे वठणीवर आणायचे हे शिकावे, याच राशीच्या लोकांकडून.

सर्वसाधारणपणे ही माणसे स्वतःहून कुणाच्या अध्यात-मध्यात पडणार नाहीत; पण एकदा चिडली तर दहा लोकांना उलटून टाकतील. खून, मारामाऱ्या, दंगली करण्यासही हे लोक मागे-पुढे पाहत नाहीत. त्याचप्रमाणे कोणतेही काम जिद्दीने ती पूर्ण करणारच. यशस्वी जीवन जगण्याचे तत्त्वज्ञानही ही रास शिकवते. यावर्षी गुरुमहाराज एप्रिलपर्यंत चतुर्थस्थानी राहतील. जागेचे कोणतेही व्यवहार करून घ्या. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. कौटुंबिक वादविवाद असतील तर ते कमी होतील. श्रीमंत व आदरणीय व्यक्ती म्हणून तुमचा सन्मान होईल. काही जणांची जबाबदारीही शिरावर घ्यावी लागेल. नोकरीविषयक उच्चपद व खास अधिकार मिळतील. सरकारी कामात किंवा सरकारकडून उत्तम लाभ होतील. कोणतीही सरकारी कामे अडणार नाहीत. जमीनजुमला व इस्टेटचे मालक व्हाल. संतती आणि आई-वडिलांचे सुख चांगले राहील. एप्रिलनंतर गुरू पंचम आल्यावर जीवनात आमूलाग्र चांगले बदल घडतील. विवाहयोग, संततीप्राप्ती, भाग्योदय, मित्रमंडळींचे उत्तम सहकार्य, मानसिक समाधान, नावलौकिक व प्रतिष्ठा वाढणे या दृष्टीने या गुरूचे अतिशय चांगले फळ मिळेल. एप्रिलनंतर पुत्रसंतती झाल्यास संपूर्ण कुटुंबाचा उत्कर्ष सुरू होईल.

येत्या मार्चपर्यंत राहू सप्तमस्थानी राहणार आहे. भागीदारी, व्यवसाय, प्रवास आणि वैवाहिक जीवनात नाट्यमय घटना घडू शकतात. जरा जपून राहावे. सांसारिक जीवनात संशय निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य करू नका. या राहूचा कोणताही त्रास होऊ नये, यासाठी सरस्वती स्तोत्र वाचावे अथवा हनुमान स्तोत्र वाचले तरीही त्याचा अनुभव चांगला येतो. वैवाहिक जीवनात त्रास झाल्यास सर्व गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करावा. कुलदेवतेची आराधना करावी. त्यानंतर राहू सहाव्या स्थानी येईल आणि सर्व दृष्टीने तुम्हाला अनुकूल होईल. सर्व कामे भराभर होऊ लागतील; पण आपल्या कमाईचे मार्ग अथवा राखून ठेवलेला पैसा याबाबत मात्र कुणालाही काही सांगू नका.

हर्षल संपूर्ण वर्षभर षष्ठस्थानी राहणार आहे. मनात सतत काही ना काही नको ते विचार घोळत राहतील. नोकरी-व्यवसायात हाताखालील लोकांकडून त्रास होऊ शकतो. किल्ले, तीन रस्ते, पडक्या भयाण जागा वगैरे ठिकाणी गेल्यास नको त्या अदृश्य शक्तीशी संबंध येऊ शकतो. त्यासाठी बाधित जागा टाळण्याचा प्रयत्न करावा. नेपच्यून वर्षभर चतुर्थात राहणार आहे. कुटुंबात आध्यात्मिक वातावरण असेल तर लक्ष्मीप्राप्तीला पोषक असेल. काही जणांना अतिंद्रिय शक्तींचा अनुभव स्वप्नाद्वारे येऊ शकतो. धनस्थानातील शुक्रामुळे आर्थिक स्थिती उत्तम राहील. रवी-केतू तुमच्या राशीत असल्याने शारीरिक स्वास्थ्य जाणवेल. खर्चाचे प्रमाणही वाढणार आहे. गुरु-मंगळ यांच्या शुभयोगामुळे वास्तूसंदर्भातील महत्त्वाची कामे होऊ लागतील. नोकरी-व्यवसायात नवीन जबाबदाऱ्या टाकल्या जातील. कर्ज असेल, तर ते फिटू लागेल. या राशीतील सर्वच नक्षत्रांच्या व्यक्तींना संपूर्ण वर्षभर वस्त्रप्रावरणे मिळत राहतील. मनातील सर्व इच्छा आपोआप पूर्ण होतील.

मासिक फलाफल -

  • जानेवारी - रखडलेली काही कामेही हातावेगळी होतील, असे संक्रांतीचे फळ आहे. सरकारी नोकरदार आणि राजकारणात असलेल्यांनी काही बाबतीत जपून राहणे आवश्यक आहे.

  • फेब्रुवारी - काही वेळा दुसऱ्यावर छाप पाडण्यासाठी कर्ज काढून काही प्रकरणे करावी लागतात. मंगळ-शुक्र योगावर चैन अथवा आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी बराच खर्च कराल. त्यामुळे काही जणांकडून बोलणी खावी लागतील. रवि-गुरुचा शुभयोग हरवलेल्या व्यक्तीचा अथवा मालमत्तेचा शोध लावून देईल. दुसऱ्याच्या हाती गेलेली काही महत्त्वाची कागदपत्रे तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे.

  • मार्च - मंगळ-शनी अपघात व दुर्घटनादर्शक आहेत. कोणतेही धाडस करू नका. तरुणवर्गाने वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक. शेजारीपाजारी व नातेवाइकांशी किरकोळ कारणावरून खडाजंगी उडू शकते. या महिन्यात कोणाशीही वाकडेपणा येणार नाही, याची काळजी घ्या.

  • एप्रिल - कोणतेही सरकारी काम यशस्वी होईल. भाग्योदयाला सुरुवात होईल. विवाहकार्य, संततीलाभ, धनप्राप्ती, मानसन्मान व आरोग्यात सुधारणा या दृष्टीने हा महिना उत्तम राहील. नवीन नोकरीचे कॉल येतील. सर्व दृष्टीने मोठे यश देणारा हा महिना आहे.

  • मे - काही मिळविण्यासाठी काहीतरी गमवावे लागते, याचा अनुभव या महिन्यात येईल. नोकरी-व्यवसायात जपून राहावे. प्रेम अथवा तत्सम प्रकरणात अडकू नये, पुढे अडचणी येतील. व्यवसाय क्षेत्रात नवे काहीतरी करून दाखवाल. त्याचा पुढे तुम्हाला आर्थिक बाबतीत मोठा फायदा होणार आहे. तुमच्या कामाचे कौशल्य पाहून नव्या ऑर्डरही मिळू शकतात.

  • जून - बुध-शुक्राचे सहकार्य जीवनात आनंद निर्माण करेल. गुरूच्या आशीर्वादाने नोकरी-व्यवसायात उच्चस्थानी राहाल. शनीचे भ्रमण काही बाबतीत त्रासदायक आहे. राहू-मंगळ युतीचे षष्ठातील भ्रमण आरोग्याच्या तक्रारी निर्माण करेल. आग लागणे, दुर्घटना, अपघात यादृष्टीने सावधगिरी बाळगण्यास सुचवित आहे.

  • जुलै - रवि-शनिचा प्रतियोग प्रवासात धोका दर्शवितो. कागदोपत्री व्यवहारात पूर्ण माहिती घेतल्याशिवाय कुठेही सही करू नका. कितीही जवळचा मित्र अथवा नातेवाईक असला तरी त्याच्यासमोर तुमच्या मनातील गुप्त गोष्टी चुकूनही सांगू नका. पुढे-मागे त्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. आवश्यक तेथे मुद्देसूद आणि योग्य असे बोला, तुमचे काम होईल.

  • ऑगस्ट - ग्रहमान बऱ्याच बाबतीत अनुकूल आहे. गुरु-शुक्राचा त्रिकोण योग सर्व बाबतीत चांगली फळे देईल. प्रवासात लाभ, विवाहकार्यात यश, उच्चशिक्षणातील अडचणी दूर होणे, आर्थिक सुबत्ता वाढणे, नवी कामे मिळणे, नोकरीत वरिष्ठांची मर्जी या दृष्टीने हा महिना उत्तम आहे. तसेच, कौटुंबिक जीवनात समाधानी वातावरण राहील.

  • सप्टेंबर - लाभस्थानातील रवी, शुक्र, बुध युतीचा अनेक महत्त्वाच्या कामासाठी मोठा उपयोग होईल. मित्रमंडळींकडे अडकलेली रक्कम वसूल होईल. जर खोटे आरोप असतील, तर त्यातून मुक्त व्हाल. राजकारणात असाल तर तुमच्या काही नव्या कल्पना लोकांना आवडतील.

  • ऑक्टोबर - रवि, बुध, शुक्र, केतूचे भ्रमण व त्याला शनि-राहूची अनिष्ट साथ हा योग चांगला नाही. सर्व तऱ्‍हेचे अपघात, दुर्घटना, मानापमान, वाढते खर्च, काही जणांचे कपटनाट्य, कामाचा फापटपसारा आवरता न येणे इत्यादी प्रकारामुळे मनस्ताप होईल. हा तुमच्या कसोटीचा काळ समजावा. हा काळ कठीण असला, तरी पुढे तो तुमच्या जीवनाला नवे वळण लावेल.

  • नोव्हेंबर - शुक्रामुळे आर्थिक स्थिती उत्तम राहील. शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. खर्चाचे प्रमाणही वाढणार आहे. इतरांनी काहीही सांगितले, तरी स्वतःच्या मनाने निर्णय घ्या. त्यात नुकसान होणार नाही.

  • डिसेंबर - काही ग्रहांच्या शुभयोगामुळे वास्तूसंदर्भातील महत्त्वाची कामे होऊ लागतील. नोकरी-व्यवसायात नवीन जबाबदाऱ्या टाकल्या जातील. कर्ज असेल तर ते फिटू लागेल. बेकारांना नोकरी मिळण्याचे योग. पूर्वी काही कारणामुळे नकार दिलेले स्थळ पुन्हा येऊन गयावया करू लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com