उद्धवजी, 'ये भी तो होना ही था'
उद्धवजी, 'ये भी तो होना ही था'

उद्धवजी, 'ये भी तो होना ही था'

‘ए दिल है मुश्‍कील‘ चित्रपटाच्या प्रदर्शनाचा वाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "मनसे‘ मिटविल्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळाचा नारा देणाऱ्या शिवसेनेने पुन्हा एकदा युतीचा राग आळविला आहे. "युती करायची असेल तर संपूर्ण राज्यात करा, केवळ फायदा असेल त्या ठिकाणी करू नका‘ असे वक्तव्य शिवसेना नेतृत्वाने केले आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही पक्षात युती होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

राज्यातील नगरपरिषद निवडणुकीची तारीख जाहीर निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर शिवसेनेने आमदार, खासदार व पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईत बोलावली होती. त्यात लोकप्रतिनिधींचा कानोसा घेत शिवसेना नेतृत्वाने नगरपरिषद निवडणुकीत स्वबळाचा नारा देत मुंबईसह इतर महापालिकांबाबत आपले पत्ते राखून ठेवले होते. शिवसेनेच्या घोषणेनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री फडणवीस यांनी युतीबाबत सबुरीची भूमिका घेतली. युतीसाठी तयार असल्याचे संकेत त्यांनी दिले. याच दरम्यान, फडणवीस यांनी ‘ए दिल है मुश्‍कील‘ या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून निर्माण झालेला वाद सोडविण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पाचारण केले. पाकिस्तानी कलाकाराला चित्रपटात घेतल्याने त्याचे प्रदर्शन रोखण्याचा इशारा राज यांनी दिला होता. खरेतर पाक कलाकारांना अगर खेळाडूंना भारतात येऊ न देण्याची मूळ भूमिका शिवसेनेची! परंतु, उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर हा मुद्दा मनसेने उचलला. त्यांच्या भूमिकेने चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत संभ्रम निर्माण झाला. अखेरीस खुद्द मुख्यमंत्र्यांनीच या वादात मध्यस्थी करण्याचा निर्णय घेत हा प्रश्‍न मार्गी लावला. त्यावर ‘ये तो होना ही था‘ असा शेरा उद्धव ठाकरे यांनी मारला होता.

या मुद्यावरून राज्यातील वातावरण तापले असताना शिवसेनेला ‘मनसे‘ दूर ठेवत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला एक प्रकारे इशाराच दिला होता. त्यांची ही मात्रा बरोबर लागू पडली. दोनच दिवसांत शिवसेनेने मवाळ सूर आळवत युतीबाबत तयार असल्याचे सूतोवाच केले. तसेच युती करायची असेल तर सर्वत्र करा असेही सांगण्यास शिवसेना नेतृत्व विसरले नाही!

शिवसेनेला काही करून मुंबई व ठाण्यावरील आपली मांड कायम ठेवायची आहे. विधानसभा निवडणुकीनंतर दोन्ही ठिकाणी भाजपची ताकद वाढली आहे हे नाकारून चालणार नाही. राज्यात तसेच केंद्रातही भाजपचेच सरकार आहे. त्यामुळे जरी स्वबळाचा नारा दिला असला तरी सत्तेचा फरक शेवटी पडतच असतो. सर्जिकल स्ट्राईकमुळे पंतप्रधान मोदी यांचे जनमानसातील स्थान पुन्हा वाढले आहे. याबरोबरच भाजप नेतृत्वाने मनसेशी जवळीक साधत वेगळी समीकरणे होऊ शकतात असा इशाराच दिल्याने शिवसेना पुन्हा एकदा केलेल्या घोषणेपासून एक पाऊल मागे आली. फडणवीसांच्या डावपेचांमुळे उद्धवजींबाबत ‘ये भी तो होना ही था‘ असेच पुन्हा म्हणावे लागेल.. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com