रामगोपाल यांचे भाजपशी साटेलोटे 

रामगोपाल यांचे भाजपशी साटेलोटे 

लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी राज्य मंत्रिमंडळातून काका शिवपाल आणि त्यांच्या समर्थक मंत्र्यांची हकालपट्टी केल्यानंतर शिवपाल यांनी याचा राग चुलत बंधू रामगोपाल यादव यांच्यावर काढला आहे. शिवपाल यांनी रामगोपाल यांच्यावर निलंबनाची कारवाई तर केलीच; पण त्याचबरोबर पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर जोरदार टीकाही केली. आपल्या कुटुंबीयांवर कारवाई होऊ नये म्हणून रामगोपाल यांनी भाजपशी हातमिळवणी केली आहे, असा आरोप त्यांनी केला. 


रामगोपाल यांनी नेहमीच पक्षाला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला, गैरव्यवहारामध्ये अडकलेला आपला मुलगा आणि सुनेस वाचविण्यासाठी त्यांनी भाजपशी हातमिळवणी केली. रामगोपाल यांनी कोणाचेच दु:ख समजून घेतले नाही. ते नेताजी, अखिलेश आणि पक्षाला कमकुवत करत राहिले. मी जेव्हा याविरोधात आवाज उठविला तेव्हा माझ्यावर सूडबुद्धीने कारवाई करण्यात आली, असेही शिवपाल यांनी सांगितले. रामगोपाल यांनी खोटी माहिती प्रसारित करून महाआघाडी तोडण्याचे काम केले. आम्ही मुलायमसिंह यांचा अवमान कधीच सहन करू शकत नाही. प्राध्यापक असणाऱ्या रामगोपाल यांनी आपले ज्ञान समाजवादी विचारधारा पुढे नेण्यासाठी वापरले असते तर अधिक चांगले झाले असते. त्यांनी आपले ज्ञान नेहमी गटबाजी आणि राजकारणामध्ये वाया घातले. मुलायम यांच्या आदेशानंतरच त्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी हाकलण्यात येत असून, त्यांच्याकडील राष्ट्रीय सरचिटणीस हे पददेखील काढून घेतले जात असल्याचे शिवपाल यांनी नमूद केले. 

अमरसिंह यांच्या लॉबीस धक्का 
शिवपाल यादव यांच्यावरील कारवाईने अमरसिंह यांच्या लॉबीस मोठा धक्का बसल्याचे बोलले जाते. समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझमखान यांनीदेखील या पक्षांतर्गत संघर्षासाठी अमरसिंह यांना जबाबदार ठरविले आहे. एका बाहेरच्या व्यक्तीमुळे या सगळ्या दुर्दैवी घडामोडी घडल्याचे त्यांनी सांगितले. त्या व्यक्तीवर वेळीच कठोर कारवाई करण्यात आली असती तर ही वेळ आलीच नसती, असा टोला त्यांनी अमरसिंह यांचे नाव न घेता लगावला. मुख्यमंत्र्यांनी केलेली कारवाई कठोर असली तरीसुद्धा ती उशिरा झाल्याचेही त्यांनी नमूद केले. 

अखिलेश यादव यांनी विधिमंडळात बहुमत सिद्ध करावे, सध्या सरकार अल्पमतात असल्याने त्यांनी कोणतेही धोरणात्मक निर्णय घेऊ नयेत. 
केशवप्रसाद मौर्य, भाजपचे प्रदेशाध्यक्ष 

समाजवादी पक्षाचे सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले असून, आपले पाप झाकण्यासाठी हा सगळा तमाशा सुरू आहे. सध्या राज्यामध्ये माफियाराज आहे. 
श्रीकांत शर्मा, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस 

पक्षामध्ये राहिलो अथवा नाही राहिलो तरीसुद्धा नेहमी अखिलेश यांच्यासोबत असेन. पक्षातून हकालपट्टी झाल्याचे मला दु:ख असून, माझ्यावरील खोट्या आरोपांमुळे मी व्यथित झालो आहे. 
रामगोपाल यादव, समाजवादी पक्षाचे नेते 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com