'भारत' आणि "गांधी'

श्रीेराम ग. पचिंद्रे
शनिवार, 26 नोव्हेंबर 2016

....आणि चित्रपटातले नेहरू हा शब्द 1930 मध्ये उच्चारतात. किती हा खोटेपणा!
म्हणजे ब्रिटिशांनी आपल्या सोयीनुसार इतिहास मांडायचा आणि आपण तो निमूटपणानं मान्य करायचा?
तरी बरं, श्‍याम बेनेगल यांनी "सुभाषचंद्र बोस अ फरगॉटन हीरो' हा चित्रपट अलीकडच्या काळात काढला.
असे हे दोन चित्रपट एका आशयाचे, वेगवेगळ्या विषयाचे आणि मांडणी करताना आपली कुवत, लायकी आपली वृत्ती- प्रवृत्ती दाखवून देणारे!

वाचलेलं पुस्तक काही वर्षांनंतर पुन्हा पाहणं, पूर्वी पाहिलेला चित्रपट काही वर्षांनंतर पुन्हा पाहणं यात पुनःप्रत्ययाचा आनंद तर मिळत असतोच, पण त्या कलाकृतींचा दीर्घ काळानंतर पुन्हा आस्वाद घेताना त्यांचं आकलन पुन्हा नव्यानं होतं, त्यांची उंची- खोली नव्यानं समजते, उथळपणाही नव्यानं समजतो आणि पूर्वी चित्रपट पाहतानाच्या काही अनुभवांच्या आठवणीही ताज्या होतात.

भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा असाच एक अनुभव देणारा सोहळा असतो. 2016 च्या चित्रपट महोत्सवात (इफ्फी) दोन चित्रपट सलग पाहिले. पहिल्यांदा पाहिला "पूरब और पश्‍चिम' आणि तासाभरानंतर पुन्हा त्याच जागी "गांधी' पहायला जाऊन बसलो.

"पूरब और पश्‍चिम' हा 1970 मधला चित्रपट. तो प्रदर्शित झाला, तेव्हा वडील मला तो बघायला घेऊन गेले होते. तेव्हा मी आठ वर्षांचा होतो. नंतर अधुनमधून त्यातली गाणी छोट्या पडद्यावर लागलेली पहायचो. त्यामुळे त्यातले दृश्‍यांचे तुकडे तुकडे मला माहीत होते. संपूर्ण चित्रपट दुसऱ्यांदा पाहण्याचा योग 1970 नंतर थेट 2016च्या नोव्हेंबर महिन्यात आला. चित्रपटाचा एकूण परिणाम चांगला आहे. मनोजकुमारच्या चित्रपटात गाणी चांगली असतात. देशभक्तीची असोत की, प्रेमाची असोत, गाणी चांगलीच असतात. त्याच्या सगळ्या चित्रपटांचा नायक तोच असतो आणि त्याचं नाव "भारत" असतं. त्याचा "क्रांती' हा चित्रपट मी कळत्या वयात पाहिलेला असल्यामुळं तो मला बऱ्यापैकी समजला होता. त्यातली देशभक्ती आणि क्रांती अतिशय ढोबळ स्वरूपाची आणि बटबटीत वाटली असल्याचं तरुण वयातही मला जाणवलं होतं. अर्धनग्न सुंदरींच्या उन्नत तारुण्याचं प्रदर्शन आणि भारत मातेची मूर्ती दाखवून केलेलं देशभक्तीचं प्रदर्शन आणि अर्थात हे सारं मीठमसाला लावून केलेलं असल्यानं चित्रपट गर्दी खेचत होता. "पूरब और पश्‍चिम' आता प्रौढ वयात पाहिल्यामुळं त्यातली देशभक्ती कशी आहे, हे समजलं. त्यात जी देशभक्ती दाखवलेली आहे, ती खोटी म्हणता येत नसली, तरी अगदीच उथळपणानं ती मांडलेली आहे. अगदी नवापासून सुरुवात करू, देशावर प्रेम करणाऱ्याचं नाव "भारत' असलंच पाहिजे असा काही रिवाज नाही. प्रत्येकाचं नामकरण आई- वडील किंवा अन्य नातलग करतात. फार तर नंतर मोठपणी राजपत्रात जाहीर करून ते बदलून घेता येतं. पण देशभक्त होण्यासाठी "भारत' हेच नाव धारण करायला हवं असं काही नाही. बळवंत, मोहनदास, चित्त्तरंजन सुभाष, जवाहर, भगत, विनायक, वल्लभ इत्यादी नावांपैकी एकही नाव "भारत' नाही, म्हणून ती नावं धारण करणारे लोक देशभक्त नव्हते का?

"पूरब और पश्‍चिम' याचा अर्थ काढताना पूर्व म्हणजे अर्थात भारत देश असाच काढला पाहिजे. कारण चीनही पूर्वेकडचा देश आहे, पण पूर्वेकडचा आहे म्हणून तो काही भारत नाही आणि भारताचा भक्त नाही किंवा तिथला एकही माणूस भारत देशाचा भक्त नाही, भारतावर प्रेम करत नाही. तीच गोष्ट जपान, दुबई, अबुधाबी इत्यादी सर्व पूर्वेकडील देशांची. पण "पूरब और पश्‍चिम' असं म्हणताना पूर्वेकडील ते सर्व चांगलं, उदात्त, पवित्र इत्यादी इत्यादी असं गृहित धरलेलं आहे. आणि पश्‍मिकडील ते ते सारं भोगवादी, चंगळवादी आणि वाईट असं गृहित धरलेलं आहे. इंग्लंडमधले सगळे लोक रात्रंदिवस मद्यपान आणि धूम्रपान करतात, स्त्रिया चवचाल असतात असं मानून त्याची मांडणी केलेली आहे. चित्रपटाची नायिका प्रीती (सायरा बानू) ही सतत अर्धनग्न राहून एका हातात मद्याचा प्याला आणि दुसऱ्या हातात धूम्रकांडी (सिगारेट) घेऊन त्या दोन गोष्टी पीत असते. तसेच एच. आर.- हरनाम (प्राण) हा एकेकाळी भारतात इंग्रजांना फितूर होऊन स्वातंत्र्यसैनिकाच्या बलिदानाला कारण ठरलेला इसम इंग्रजांनी दिलेल्या पैशावर इंग्लंडमध्ये जाऊन स्थायिक झालेला दाखवलंय. ब्रिटिश सरकार फितुरांना एवढं मोठं पारितोषिक देत होतं? तो आणि त्याचा बदमाश मुलगा ओ.पी.- ओमप्रकाश (प्रेम चोप्रा) हेही एकसारखे मद्यपान अणि धूम्रपान करतात. हरनामची पत्नी नवरा फितूर झाल्यामुळं त्याच्या जिवंतपणीच आपलं कुंकू पुसते आणि मुलाला घेऊन इंग्लंडला गेल्यानंतर मात्र चाळीस वर्षं त्याची वाट पाहते. आपल्याकडे आपल्या परागंदा नवऱ्याची पन्नास- पन्नास वर्षं वाट पाहून मरून जाणाऱ्या पतिव्रता स्त्रिया खरोखरच असतात. त्यामुळं तो मुद्दा बरोबर आहे. पण हरनाम आणि ओमप्रकाश इंग्लंडला गेल्यावर आपलं नाव एच. आर. आणि ओ. पी. आणि असं लावतात, कारण काय, तर आपलं भारतीयत्व त्यांना लपवायचं असतं. पण मग त्यांनी सरळ इंग्लिश नावंच का लावली नाहीत? ते तर अगदी सोपं होतं की. तसेच वाईट संगत काय फक्त परदेशी गेल्यावर आणि परदेशात जन्माला येणाऱ्यांनाच लागते का? भारतात काय कोणाला वाईट संगत लागत नाही? असो.

मनोजकुमारच्या अभिनयाबद्दल यापूर्वी बरंच वाईट छापून आलेलं आहे, म्हणून मी आता तसं काही म्हणणार नाही. चित्रपट एकूण चांगलं मनोरंजन करतो. गाणी खरोखर अर्थपूर्ण आणि श्रवणीय. "भारत का रहनेवाला हूँ , भारत की बात सुनाता हूँ ' ह्या गाण्यात शून्याचा शोध भारताने लावला आणि जगाला तो उपकारक ठरला असा उल्लेख आहे, तसेच भारतीय संस्कृतीची महती योग्य प्रकारे गायिलेली आहे, हे गीत आणि इतर सर्व गाण्यांसाठी कवी इंदीवर, संगीतकार कल्याणजी- आनंदजी, सर्व गायक कलाकार आणि मनोजकुमार यांना मानाचा मुजरा!

"गांधी' हा रिचर्ड अटेनबरोचा चित्रपट 1982 चा. तो हिंदीतच आला. बेन किंग्जले यांनी गांधीजींचीे आणि रोहिणी हट्टंगडी यांनी कस्तुरबांची भूमिका केलेली आहे. चित्रपट चांगला आहे. पण...पण..पण.....

भारतीय स्वातंत्र्य चळवळ म्हणजे फक्त महात्मा गांधी आणि त्यांची प्रभावळच का? आणखी कुणी नव्हतेच? आता, गांधीजींच्या चित्रपटात खुदीराम बोस, चाफेकर बंधू, भगतसिंग-राजगुरू इत्यादी क्रांतिकारक येणार नाहीत हे मान्य. कारण ह्या मंडळींनी गांधीजींच्या सोबत कधीही काम केलेलं नव्हतं. पण सुभाषबाबूंचं काय? ब्रिटिशांनी ज्या भारतीयांचा मनापासून द्वेष केला, तिरस्कार केला, ज्यांना आपला शत्रू मानलं, त्यात नेताजी सुभाषचंद्र बोस हे पहिल्या क्रमांकार होते. चित्रपटात गोपाळ कृष्ण गोखले दिसतात, कारण ते मवाळांचे नेते होते. लोकमान्य टिळक का दिसत नाहीत? लोकमान्यांच्या तिरडीला गांधीजींनी खांदा दिला होता. ही गोष्ट मोठी सूचक होती. लोकमान्यांच्या आणि गांधीजींच्या गाठीभेटी झाल्या होत्या. आपले मार्ग वेगळे आहेत हे त्या दोघांनाही समजलं आणि उमजलं होतं. लोकमान्यांचे विचार आणि त्यांचं कार्य, भारतीय स्वातंत्र्य चळवळीतलं त्यांचं योगदान याची गांधीजींना चांगली जाणीव होती. आणि सुभाषबाबू जेव्हा भारतीय नागरी सेवेची (आय. सी. एस.) पदवी जाणीवपूर्वक लाथाडून, चैनविलासाची, ऐश्वर्य प्राप्त करून देणारी सोन्याची संधी विचारपूर्वक झिडकारून भारतात परत आले, तेव्हा पहिल्यांदा गांधीजींनाच भेटले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत ते अपघातानं आले नव्हते, तर जाणीवपूर्व आले होते. आझाद हिंद सेना घेऊन ब्रिटिश सेनेशी लढ्यासाठी देश सोडून जाईपर्यंत त्यांनी गांधीजी आणि पंडित नेहरू यांच्या बरोबर काम केलं होतं. पण चित्रपटात अगदी कृपलानीसारखा दुय्यम दर्जाचा नेता दिसतो, गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसे तीन-चार वेळा दिसतो, पण सुभाषबाबू कुठं एकाही दृश्‍यात दिसत नाहीत. असं का? कारण तो चित्रपट ब्रिटिशांनी बनवलेला होता. इतिहास किती खोटा करून सांगावा याचा चांगला नमुना म्हणजे अटेनबरो यांचा हा "गांधी' चित्रपट होय. चित्रपटातले नेहरू (रपशन सेठ) गांधीजींना म्हणतात, ''लोग तुम्हें राष्ट्रपिता कहते है..राष्ट्र के पिता...'' गांधीजींना राष्ट्रपिता लोकांनी वगैरे कुणी नव्हे, तर सुभाषबाबूंनी म्हटलं होतं. रंगूनमधून आझाद हिंद नभोवाणीवरून 22 फेब्रुवारी 1944 या दिवशी केलेल्या भाषणात सुभाषबाबूंनी गांधीजींना "राष्ट्रपिता' असं संबोधलेलं आहे. ते भाषण आणि ते वाक्‍य असं आहे-

Father of our Nation in this holy war for India's liberation, we ask for your blessings and good wishes"
"......Nobody  would be more happy than ourselves if by any chance our countrymen at  home should succeed in liberating  themselves through their own efforts  or by any chance, the British Government accepts your `Quit India'  resolution and gives effect to it. We are, however proceeding on the  assumption that neither of the above is possible and that a struggle is  inevitable.
 Father of our Nation in this holy war for India's liberation, we ask for your blessings and good wishes"
आणि चित्रपटातले नेहरू हा शब्द 1930 मध्ये उच्चारतात. किती हा खोटेपणा!
म्हणजे ब्रिटिशांनी आपल्या सोयीनुसार इतिहास मांडायचा आणि आपण तो निमूटपणानं मान्य करायचा? तरी बरं, श्‍याम बेनेगल यांनी "सुभाषचंद्र बोस अ फरगॉटन हीरो' हा चित्रपट अलीकडच्या काळात काढला. असे हे दोन चित्रपट एका आशयाचे, वेगवेगळ्या विषयाचे आणि मांडणी करताना आपली कुवत, लायकी आपली वृत्ती- प्रवृत्ती दाखवून देणारे! 

Web Title: Shriram Pachindre Blog