म्हैसूरच्या दसऱ्याचा शाही थाट

म्हैसूरच्या दसऱ्याचा शाही थाट

देशात म्हैसूरच्या शाही दसऱ्याला विशेष महत्व आहे. कला, क्रीडा, प्रशासन आणि पर्यटन या दृष्टीने दसरा विशेष मानला जातो. सतराव्या शतकात सुरू झालेल्या दसरोत्सवाची कीर्ती उत्तरोत्तर वाढतच गेली आहे. वडेयार राजघराणे आणि राज्य सरकारतर्फे साजरा होणारा दसरोत्सव लोकांसाठी विशेष पर्वणी देणारा ठरत आहे.

चामुंडेश्‍वरी (दुर्गा) देवीने महिषासुराचा वध केल्याच्या पार्श्‍वभूमीवर दसरोत्सव सुरू झाला. अन्यायावर मिळविलेला विजय, अशी ही भावना आहे. म्हैसूरचा दसरा दहा दिवसांचा सोहळा असतो. म्हैसूर पॅलेस सुमारे एक लाख दिव्यांनी सजविला जातो. राजघराण्याकडून विशेष पूजा करण्यात येते. शहर सुशोभित करण्यात येते. प्रसिद्ध कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम होतात.

क्रीडा, अन्नोत्सव, चित्रपट महोत्सव अशा अनेक कार्यक्रमांची रेलचेल असते. यावर राज्य सरकार एक कोटी रुपये खर्च करते. या काळात रोज लाखो लोकांची पावले म्हैसूरकडे वळत असतात. विदेशी पर्यटकांची संख्याही लक्षणीय असते. यंदाच्या दसरोत्सवाचे उद्‌घाटन शाही परिवारासह मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ विचारवंत, कवी प्रा. के. एस. निसार अहमद यांच्या हस्ते झाले आहे.

इतिहास असा
विजयनगर साम्राज्यात पहिल्यांदा पंधराव्या शतकात म्हणजे १४७० मध्ये दसरा साजरा करण्यात आला. त्यानंतर म्हैसुरातील वडेयर राजघराण्याने पहिल्यांदा सतराव्या म्हणजे १६१० मध्ये दसरोत्सवाची प्रथा सुरू केली. तिसरा कृष्णराज वडेयर राजाने १८०५ पासून दसऱ्याला विशेष दरबार आयोजनास सुरुवात केली. स्वातंत्र्यानंतर राज्य सरकार आणि शाही घराणे मिळून दसरोत्सव साजरा करण्यात येतो. गेल्या ४०७ वर्षांपासून शाही दसरोत्सव साजरा होत आहे.

खास आकर्षण जंबो सवारी
म्हैसूरच्या शाही दसरोत्सवात खास आकर्षण असते ते जंबो सवारीचे. म्हैसूर पॅलेसपासून बन्नीमंडपपर्यंत हत्तींची मिरवणूक निघते. त्यावर सोन्याच्या अंबारीत चामुंडेश्‍वरी देवीची मूर्ती असते. मूर्तीची शाही घराण्याकडून पूजा केली जाते. सजवलेले हत्ती, घोडे, उंट, वाद्यांचा गजर आणि लोकनृत्य असा हा सोहळा पाहण्यासाठी हजारो लोक जमलेले असतात. यंदा ही जंबो सवारी शनिवारी (ता. ३०) दुपारी अडीच वाजता निघणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com