बेपत्ता विमानामध्ये निगडीचा अधिकारी

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 5 ऑगस्ट 2016

पिंपरी - चेन्नईकडून पोर्टब्लेअरला जाताना बेपत्ता झालेल्या हवाईदलाच्या विमानात निगडीतील फ्लाइट लेफ्टनंट कुणाल बारपट्टे या तरुण अधिकाऱ्याचा समावेश आहे. त्यामुळे त्याच्या पालकांना मोठा धक्‍का बसला असून ते चिंतेत आहेत. 

पिंपरी - चेन्नईकडून पोर्टब्लेअरला जाताना बेपत्ता झालेल्या हवाईदलाच्या विमानात निगडीतील फ्लाइट लेफ्टनंट कुणाल बारपट्टे या तरुण अधिकाऱ्याचा समावेश आहे. त्यामुळे त्याच्या पालकांना मोठा धक्‍का बसला असून ते चिंतेत आहेत. 

दोन दिवसांपूर्वी "अंतोनोव्ह-32‘ हे हवाईदलाचे विमान 29 जणांना घेऊन चेन्नई विमानतळावरून पोर्टब्लेअरकडे झेपावले. बंगालच्या उपसागरावरून जाताना विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला होता. त्यानंतर हवाईदलाने विमानाचा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली. त्यामध्ये संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर स्वतः उतरले. मात्र, दोन दिवसांनंतरही विमानाचा तपास लागला नसल्यामुळे चिंता वाढू लागली आहे.
 

फ्लाइट लेफ्टनंट कुणाल बारपट्टे (वय 28) या विमानात नॅव्हिगेटर म्हणून कार्यरत आहेत. बारपट्टे कुटुंबीय निगडी प्राधिकरणातल्या एलआयजी कॉलनीत राहत आहेत. काही दिवसांपूर्वी कुणाल सुटीवर आला होता. त्याच्या लग्नासाठी प्रयत्नही सुरू आहेत. कुणालचे वडील राजेंद्र बारपट्टे हे सीआयआरटीमधून अभियंता म्हणून निवृत्त झाले असून, त्याची आई गृहिणी आहे.
 

प्राधिकरणातील त्यांच्या घराचे नूतनीकरण सुरू होते. विमान बेपत्ता झाल्यामुळे चिंताग्रस्त झालेले कुणालचे आई-वडील दोन दिवसांपासून त्यांच्या पुण्यातील नातेवाइकांकडे राहावयास गेले आहेत.
 

दरम्यान, हवाईदलाचे अधिकारी शनिवारी दुपारी कुणालच्या घरी येऊन गेल्याचे परिसरातील रहिवाशांनी सांगितले. कुणालच्या मामांनी हवाईदलाशी या संदर्भात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना माहिती मिळाली नसल्याचे समजते. हवाईदलाचे अधिकारी सातत्याने बारपट्टे परिवाराच्या संपर्कात आहेत. मात्र, त्यांच्याकडून ठोस माहिती मिळत नसल्याने बारपट्टे परिवाराची चिंता वाढली आहे.