आयकर विभागाकडून शशिकलांच्या कु़टुंबीयांची चौकशी 

वृत्तसंस्था
शनिवार, 18 नोव्हेंबर 2017

''जयललिता यांच्या निवासस्थानी काही कारणांसाठी छापेमारीची कारवाई केली जात आहे. मुख्यमंत्री ई पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम  यांच्यामध्ये झालेल्या 'डिल'नंतर ही कारवाई करण्यात आली. हे अम्मांचा आत्मा कधीही विसरणार नाही'       ( टी. टी. व्ही. दिनाकरन )

चेन्नई : आयकर विभागाकडून व्ही. के. शशिकला आणि त्यांच्या कुटुंबीयांची रात्री उशिरापर्यंत चौकशी करण्यात आली. तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या 'पोज गार्डन' या निवासस्थानी ही चौकशी केली गेली. यामध्ये आयकर विभागाच्या दहापेक्षा जास्त अधिकारी सहभागी झाले. 

बेहिशेबी मालमत्ता आणि भ्रष्टाचारप्रकरणी अण्णा द्रमुकच्या नेत्या शशिकला यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र, सध्या त्या जामिनावर बाहेर आहेत. काही दिवसांपूर्वी शशिकला आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा आयकर विभागाकडून चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान तपास पथकाने शशिकला वापरत असलेला लॅपटॉप, संगणक आणि चार पेन ड्राइव्ह ताब्यात घेतले आहेत. 

तसेच काही दिवसांपूर्वी आयकर विभागाकडून सलग तीन दिवस चौकशी करण्यात आली होती. या कारवाईमध्ये शशिकला आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित 140 रहिवासी आणि कार्यालयात कारवाई केली गेली. या कारवाईनंतर शशिकला आणि त्यांचा भाचा टी. टी. व्ही. दिनाकरन यांच्या समर्थकांनी या केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती.

''जयललिता यांच्या निवासस्थानी काही कारणांसाठी छापेमारीची कारवाई केली जात आहे. मुख्यमंत्री ई पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम  यांच्यामध्ये झालेल्या 'डिल'नंतर ही कारवाई करण्यात आली. हे अम्मांचा आत्मा कधीही विसरणार नाही'', असे दिनाकरन म्हणाले. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी जयललिता यांचे सचिव एस. पुंगुंद्रन आणि विवेक जयरामन यांचीही चौकशी करण्यात आली होती. तसेच पुंगुंद्रन यांच्या घरावरही छापेमारीची कारवाई करण्यात आली होती. याशिवाय त्यांना आयकर विभागाकडून दोनदा समन्सही बजावण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.

Web Title: आयकर विभागाकडून शशिकलांच्या कु़टुंबीयांची चौकशी