हुतात्मा जवानांच्या नातेवाइकांना 1 कोटी 

पीटीआय
रविवार, 21 मे 2017

प्रत्यक्ष कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेल्या निमलष्करी दलातील जवानांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई सरकारकडून दिली जाईल, अशी घोषणा गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज(शनिवारी)  केली.

नथुला (सिक्कीम) : प्रत्यक्ष कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेल्या निमलष्करी दलातील जवानांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई सरकारकडून दिली जाईल, अशी घोषणा गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज(शनिवारी)  केली.

सरकारने देशभरातील 34 हजार कॉन्स्टेबलच्या जागांचा दर्जा वाढत तो हेडकॉन्स्टेबल असा केला असल्याचेही त्यांनी नमूद केले. राजनाथसिंह भारत तिबेट सीमा पोलिसांच्या सैनिक संमेलनामध्ये बोलत होते. निमलष्करी दलातील जवानांच्या बलिदानाचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचेही त्यांनी सांगितले. 

सध्या देशाच्या मध्य आणि पूर्व भागामध्ये निमलष्करी दलांचा नक्षलवाद्यांशी संघर्ष सुरू असून जम्मू आणि काश्‍मीरमध्ये देशाच्या सीमेचे संरक्षण करण्याची जबाबदारीही त्यांनी समर्थपणे पेलली आहे. आमच्या जवानांचे बलिदान हे पैशातून भरून निघणारे नाही, पण त्यांच्या कुटुंबीयांना त्रास होऊ नये म्हणून त्यांना एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळावी, याची दक्षता आम्ही घेऊ, असेही त्यांनी नमूद केले. 

हल्ल्यानंतर जाग 
महिनाभरापूर्वी छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यामध्ये नक्षलवाद्यांनी "सीआरपीएफ'च्या जवानांवर हल्ला केला होता, त्यात 25 जवान हुतात्मा झाले होते. या हल्ल्यानंतर केंद्र सरकार खडबडून जागे झाले आहे. गृहमंत्र्यांनी केलेली ताजी घोषणा केंद्राच्या नक्षलविरोधी रणनीतीचाच एक भाग असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, कार्यक्रमापूर्वी गृहमंत्र्यांनी भारत- चीन सीमेला भेट घेऊन तेथील परिस्थितीचाही आढावा घेतला. 

'ऍप' वापरण्याचे आवाहन 
'सीआरपीएफ' जवानांच्या कल्याणासाठी सरकारने खूप काही केले असून भविष्यामध्ये यासाठी आणखी उपाययोजना करण्याची गरज आहे. जवानांना आपल्या तक्रारी नोंदविता याव्यात म्हणून गृहमंत्रालयाने नुकत्याच लॉंच केलेल्या ऍपचाही त्यांनी वापर करावा असे आवाहनही त्यांनी केले. अत्युच्च ठिकाणांवर काम करणाऱ्या जवानांना दिल्या जाणाऱ्या भत्यात समानता आणली जावी, अशी मागणी "आयटीबीपी'कडून करण्यात आली असून याचाही गांभीर्याने विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 

 

Web Title: 1cr to Martyr's family