'त्या' आदेशांवर मुलायमसिंहाच्या बनावट सह्या

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 जानेवारी 2017

लखनौ- मुलायमसिंह यादव यांचे दोन वेगवेगळे आदेश असलेल्या 1 जानेवारी रोजीच्या दोन पत्रांवर मुलायमसिंह यांच्या बनावट सह्या असल्याचा दावा समाजवादी पक्षाचे उपाध्यक्ष किरणमय नंदा यांनी केला आहे. 

लखनौ- मुलायमसिंह यादव यांचे दोन वेगवेगळे आदेश असलेल्या 1 जानेवारी रोजीच्या दोन पत्रांवर मुलायमसिंह यांच्या बनावट सह्या असल्याचा दावा समाजवादी पक्षाचे उपाध्यक्ष किरणमय नंदा यांनी केला आहे. 

राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित राहिल्याबद्दल पक्षाचे उपाध्यक्ष नंदा यांना निलंबित करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील सत्ताधारी समाजवादी पक्षामध्ये वर्चस्व मिळविण्यावरून राजकीय उलथापालथ सुरू आहे. 
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी बोलावलेली पक्षाची बैठक घटनाबाह्य असल्याबद्दल पहिल्या पत्रातून जाहीर केले होते. तसेच, नंदा यांना निलंबित करण्यात येत असल्याचे दुसऱ्या पत्रातून जाहीर करण्यात आले होते. 

या दोन्ही पत्रांमधील मुलायमसिंह यांच्या सह्या वेगळ्या आहेत. एका पत्रावरील स्वाक्षरीत मुलायमसिंह यादव यांचे संपूर्ण नाव आहे, तर दुसऱ्या पत्रावर त्यांचे पूर्ण नाव नाही, असे नंदा यांनी म्हटले आहे. 
यापूर्वी, मुलायमसिंह यांच्या नावाचा गैरवापर करण्यात येत असून, ही पत्रं शिवपाल यादव हेच देत आहेत, असा आरोप अखिलेश यादव यांनीदेखील केला होता. शिवपाल यादव हे अखिलेश यांचे काका आहेत.