मालेगाव स्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंहला जामीन मंजूर

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 एप्रिल 2017

सप्टेंबर 2008 साली मालेगाव येथे झालेल्या बॉम्ब स्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना आज (मंगळवार) मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र या प्रकरणातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांना जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

मुंबई : सप्टेंबर 2008 साली मालेगाव येथे झालेल्या बॉम्ब स्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना आज (मंगळवार) मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र या प्रकरणातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

मालेगाव येथे सप्टेंबर 2008 साली झालेल्या स्फोटात सात जण ठार झाले होते. राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) असलेल्या मालेगाव स्फोट प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायालयात सुरू होती. या न्यायालयाने साध्वी प्रज्ञासिंह आणि पुरोहित यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर या दोघांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान उच्च न्यायालयाने आज साध्वी प्रज्ञासिंह यांना काही अटींवर जामीन मंजूर केला. तर पुरोहित यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

न्यायाधीश रणजीत मोरे यांच्या विभागीय खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. एनआयएनेही या साध्वी यांना जामीन देण्यास कोणतीही हरकत नसल्याचे सांगितले. जामीन मिळाल्यानंतर पुराव्यांशी छेडछाड करू नये आणि पासपोर्ट एनआयएकडे जमा करावा, या अटींवर न्यायालयाने साध्वी प्रज्ञा यांना जामीन मंजूर केला आहे.