इटानगरमधील काँग्रेसचे 23 नगरसेवक भाजपमध्ये

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 एप्रिल 2017

इटानगर नगर परिषदेतील काँग्रेसच्या 25 नगरसेवकांनी मुख्यमंत्री प्रेमा खांडू यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

इटानर (अरुणाचल प्रदेश) : इटानगर नगर परिषदेतील काँग्रेसच्या 23 नगरसेवकांनी मुख्यमंत्री प्रेमा खांडू यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

इटानगर नगर परिषदेत एकूण 30 नगरसेवक आहेत. त्यापैकी 26 काँग्रेसचे होते. एका सदस्याला निलंबित करण्यात आल्याने आता तेथे काँग्रेसचे 25 नगरसेवक होते. त्यापैकी 23 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अरुणाचल प्रदेशमधील भाजपचे अध्यक्ष तापिर गाव यांनी भाजपमध्ये नव्याने प्रवेश केलेल्या सर्व नगरसेवकांचे स्वागत केले आहे.

आपण सारे मिळून राज्याचा विकास करू, अशा प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केल्या आहेत. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप हा सर्वात वेगळा पक्ष असून येथे देश सर्वात प्रथम असून इतर साऱ्या गोष्टी त्यानंतर आहेत', अशा प्रतिक्रिया मुख्यमंत्री खांडू यांनी यावेळी व्यक्त केल्या.

प्रवेश केलेल्या सर्व नगरसेवकांनी खांडू यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत त्यांच्यावर विश्‍वास असल्याच्या भावना व्यक्त केल्या.