लग्न समारंभात भिंत कोसळून 25 ठार; 28 जखमी

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 मे 2017

राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले असून, त्या घटनास्थळाला आज भेट देण्याची शक्यता आहे. 

जयपूर : एका लग्न कार्यालयाची भिंत कोसळल्याने 25 लोकांचा मृत्यू झाला, तर इतर 28 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. राजस्थानातील भरतपूर जिल्ह्यात ही दुर्घटना घडली. 

मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 8 महिला आणि 5 बालकांचा समावेश आहे. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अचानक वादळासह आलेल्या मुसळाधार पावसामुळे सेवर रोडवरील अन्नपूर्णम कार्यालयाची भिंत कोसळली. पाऊस अचानक सुरू झाल्याने वऱ्हाडातील लोक भिंतीच्या कडेला उभे राहिले होते. वादळाच्या तडाख्यामुळे ती भिंतच कोसळल्याने त्याखाली अनेकजण सापडले. या दुर्घटनेमुळे सभारंभाच्या ठिकाणी गोंधळ उडाला, लोकांनी धावाधाव केल्याने चेंगराचेंगरी झाली.
 
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. चेंगराचेंगरी झाल्यामुळेही काहीजणांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे, असे पोलिसांतील सूत्रांनी सांगितले. 
दरम्यान, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले असून, त्या घटनास्थळाला आज भेट देण्याची शक्यता आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपये, तसेच गंभीर जखमी असलेल्यांना 50 हजार रुपयांची मदत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केली आहे.